महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
सायबर सुरक्षित माणसांची साखळीच सायबर गुन्ह्यांना आळा घालेल- अॅड. प्रशांत माळी शुक्रवार, १९ मे, २०१७
अलिकडेच सायबर हल्ल्यांमुळे जगातील सर्वच राष्ट्रांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. डिजीटल युगाचा प्रारंभ होणे ही अभिमानास्पद बाब असली तरी त्यातील अपप्रवृत्तींशी सामुहिक लढा देणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षा व सायबर कायदातज्ज्ञ अॅड. प्रशांत माळी यांच्याशी केलेली बातचीत खास नेटभेटसाठी.

सायबर हल्ला ही जगासमोरील मोठी समस्या आहे त्याबद्दल काय सांगाल ?

सायबर गुन्हे हल्ली अधिक बोकाळत आहेत. आर्थिक नुकसान करणारा आणि गरीब भोळ्या भाबड्या जनतेने मेहनतीने कमावलेले पैसे नकळत गायब करणारे हे सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. आर्थिक सायबर गुन्हा जेव्हा एखाद्याबरोबर घडतो तेव्हा त्याची मानसिक स्थिती आणि आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होतो. सायबर गुन्ह्यांमुळे मी कुटुंब, जोडप्यांचे आयुष्य उध्वस्त होताना पाहिलेत. सायबर गुन्ह्यांमुळे अनेक तरुणांची करिअरही उध्वस्त झालेली आहेत.

सायबर गुन्ह्यांचा परिणाम थेट लोकांच्या मानसिकतेवर होतो ते खरे आहे का ?

हो अगदी खरे आहे. सायबर गुन्ह्यांमुळे मानसिक आजार होण्याची संख्याही वाढलेली दिसून येते. सामान्यत: एखादा गुन्हा झाला तर त्या गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्तीला सहानुभूती मिळते. परंतु सायबर गुन्हा तुमच्याबरोबर झाला तर तुम्ही भोळे भाबडे आहात असे गृहीत धरले जाऊ शकत नाही. कारण सायबर गुन्हा हाताळताना माझ्या असे लक्षात आले आहे की, कुठेतरी तुमच्या हलगर्जीपणामुळे किंवा ठरवून केलेल्या दुर्लक्षितपणामुळे सायबर गुन्हा आपल्यावर ओढवून घेतलेला असतो. उदाहरणार्थ पासवर्ड न बदलणे, पासवर्ड इतरांबरोबर शेअर करणे, तोच तोच पासवर्ड वापरणे, पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवणे, अशा गोष्टीमुळे एकार्थी सायबर गुन्हे आपल्यासोबत घडण्यासाठी आपण स्वतःच गुन्हेगाराला आमंत्रण देतो. कार्यालयातही आपण आपल्या सेक्रेटरीकडे आपल्या सोशल मिडीयाचा पासवर्ड युजर नेम, एकूण आपल्या व्हर्चुअल अस्तिवाच्या किल्ल्याच हाताळायला देतो. आपल्या कुटुंबात एखादा मोबाईल एकापेक्षा जास्त लोकांनी वापरणे हे चुकीचे आहे. जर ऑनलाइन बँकिंग करत असाल तर भलत्या सलत्या इमेलमधील लिंकवर क्लिक करून आपल्या बँक खात्याची माहिती अनाहूतपणे सायबर गुन्हेगारांना पुरवणे ही आपलीच चूक असते. सायबर गुन्ह्यांपासून आपल्याला वाचवायचे असेल तर त्याबाबत तशी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

सायबर हल्ले टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे ?

नेहमीच सायबर गुन्हा हा एका व्यक्तीच्या चुकीमुळे होतो असे नाही. बऱ्याचदा तो सिस्टमच्या चुकीमुळे ही होतो. सगळीच मंडळी आजकाल फेसबुक कर असतात. फेसबुक वर आपण आपले संपूर्ण जीवन मांडलेले असते. परिवारात होणारे समारंभ त्याची माहिती, फोटो, आपला प्रवास त्याच्या लोकेशनबद्दल माहिती. तसेच आपण कुठली गाणी ऐकतो, कुठला चित्रपट पाहायला जातो त्याची माहिती, अगदी काही लोक तर आपली वजन, उंची आवडनिवड अशा प्रत्येक गोष्टी त्यावर लिहितात. सोशल मिडीयावरील सायबर गुन्हे रोखण्यासाठी काही बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे.

• आपले, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे खाजगी फोटो तसेच लहान मुलांचे फोटो शेअर करणे टाळावे.
• आपण जात असलेल्या अथवा भेट दिलेल्या जागांची तंतोतंत माहिती, फोटो प्रसिद्ध करू नयेत. समजा एखादेवेळी तुम्ही तुमच्या प्रवासाची माहिती सोशल मिडीयावर शेअर केली आणि तुमच्या एखाद्या मित्राच्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या एका व्यक्तीने त्या माहितीचा दुरूपयोग करून तुमच्या घरात चोरी अथवा घरातील महिला व्यक्तींशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला तर ? आणि ही केवळ शक्यता नाही तर अशा गोष्टी घडतात.
• फेसबुकवर आपण कुणाबरोबर मैत्री करावी कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारावी याचा एक नियम करून घ्यावा. जर तुम्हाला एखाद्या परदेशातील व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर त्या व्यक्तीच्या प्रोफाईलमध्ये जाऊन त्यांची फ्रेंडलिस्ट तपासून त्यात किती इतर लोक आहेत हे पहावे. जर फक्त तुम्हीच एक असाल तर समजून जावे की हा एक सापळा आहे. कधी असेही होते की परदेशी व्यक्तीच्या फ्रेंड लिस्टमध्ये सर्व भारतीय असतात, तेव्हा धोक्याचा इशारा समजून अशा बोगस परदेशी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, कारण अशा व्यक्ती तुमच्यामार्फत दुसऱ्या लोकांनाही लुबाडू शकतात.
• फेसबुकवरून वर-वधु संशोधन करण्याचा प्रयत्न करू नका. माझ्याकडे अशा अनेक केसेस आल्या ज्यात फक्त तुमचे रिलेशनशिप स्टेटस पाहून त्यांना टार्गेट केले गेलेले होते. तुमची मनस्थिती काय आहे किंवा काय असू शकते याची कल्पना फक्त व्यक्तीच्या रिलेशनशिप स्टेटसवरून कळू शकते. फेसबुकवरून जे सायबर गुन्हे घडतात त्यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या कमकुवतपणाचा फायदा उठवून गुन्हा करणे हे त्यांचे तंत्र असते.

अलीकडे वधु-वर संशोधन मॅट्रीमोनी साईटवर करण्याचे प्रमाण वाढले आहे ते करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
• तुम्ही कुठल्या मॅट्रीमोनीमध्ये नाव रजिस्टर केले असेल आणि तुमचा मोबाईल नंबर तुमच्या प्रोफाईलमध्ये असल्यास, वधू किंवा वराची फ्रेंड रिक्वेस्ट तुमच्या व्हॉटसअॅपवर अथवा फेसबुकवर आली तर प्रत्यक्षात भेटल्या शिवाय त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.
• वधु-वर सूचक वेबसाईटवरून जर तुम्हाला कोणी भेटण्यासाठी बोलवत असेल तर कृपया एकटे जाऊ नका. तुमच्यासोबत मित्र-मैत्रीण किंवा आई-वडील यांच्याबरोबर जाणे गरजेचे आहे, कारण कदाचित तुमच्या प्रोफाईलमधील माहिती वाचून सायबर गुन्हेगार तुम्हाला भेटायला बोलावू शकतात. तसेच शक्यतो पहिल्याच भेटीत आपले जीवन समोरच्या व्यक्तीसमोर उघडून ठेऊ नका.
• वधु-वर सूचक वेबसाईटवरून जर तुम्हाला एखादा वर किंवा वधु परदेशातून गिफ्ट पाठवत असेल तर त्या गिफ्टच्या मोहात पडू नका. माझ्याकडे कित्येक स्त्रियांच्या अशा केसेस आहेत, ज्यात केवळ गिफ्टच्या मोहापायी त्यांनी लाखो रुपये गमावले. एका तर केसमध्ये त्या व्यक्तीने स्वत:चा फ्लॅट विकून गिफ्ट स्वीकारण्यासाठी कस्टम ड्युटी आणि बेकायदेशीर भानगडी करून ६० लाख रुपये दिले. वधुवर सूचक वेबसाईटवर कुठलाही व्यवहार करायच्या आधी वेबवर उपलब्ध असलेल्या लुबाडणुकीच्या केसेस वाचा आणि त्यातून बोध घेऊन, कुठलाही आर्थिक व्यवहार अनोळखी व्यक्तीबरोबर करू नका.

डिजीटल इंडियाच्या माध्यमातून ऑनलाईन आर्थिक व्यवहारास चालना मिळत आहे त्यानुसार आर्थिक फसवणुकीचे धोके टाळण्यासाठी नेमकी काय दक्षता बाळगावी ?

देशात सर्वात जास्त आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन बँकिंग क्षेत्रात होत असतात. तसेच ऑनलाईन खरेदीचे प्रमाणही जास्त आहे. पुढे दिलेले काही मुद्दे ऑनलाईन बँकिंग व्यवहार करताना लक्षात ठेवा.
• फिशिंग(phishing) हे सर्वज्ञात झाले आहे कारण हल्ली सर्वच जण ऑनलाईन बँकिंग वापरतात. फिशिंग म्हणजे तुमच्या बँकेच्या वेबसाईटसारखी दिसणारी दुसरी बँक अथवा तुमचीच बँक आहे अशी भासवणारी वेबसाईटची लिंक इमेल माध्यमातून पाठवली जाते. त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या बँक खात्याची माहिती मागितली जाते आणि पुढे आपल्या खात्यातील रक्कम लंपास केली जाते. फिशिंगपासून बचाव करण्यासाठी तुमचा इंटरनेट ब्राऊजर (गुगल क्रोम, सफारी, इंटरनेट एक्सप्लोरर इत्यादी) हा नेहमी इन कॉग्निटो मोडमध्ये उघडा.
• तुमच्या ब्राऊजरमध्ये जो बुकमार्क असतो त्यात तुमच्या बँकेची वेबसाईट सेव्ह करून ठेवा. प्रत्येक वेळा ती वेबसाईट ओपन केल्यावर त्यावर https आणि त्याच्या डावीकडे कुलुपाचे चिन्ह दिसत आहे का ते पहावे. बँक कधीही तुमची वैयक्तिक माहिती मागत नाही आणि जर कधी मागितली तर ती देताना शंभरवेळा विचार करा. संशय आल्यास आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी करा.
• मोबाईलद्वारा फोन बँकिंग करताना जोपर्यंत तुम्ही तंत्रज्ञानाबरोबर सुसंगत होत नाही, तुम्हाला आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत फोन बँकिंग टाळावे. तंत्रज्ञानाशी संबंधित विविध प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती होत नाही, तोपर्यंत मोबाईलवर येणारे बँकांचे सर्व कॉल्स टाळावे. जो मोबाईल तुम्ही वापरता तो जर घरातील इतरही व्यक्ती वापरत असतील तर मोबाईल बँकिंगचे अॅप ही डाऊनलोड करू नका. एकूणच मोबाईल बँकिंग पूर्णपणे टाळा.

सायबर गुन्हे हे समाज जागृत नसल्यामुळे होत असतात. एकदा का समाजामध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता आली तर सायबर सुरक्षित समाजाची रचना होऊ शकते. प्रत्येक एका घरात, कुटुंबात सायबर सुरक्षिततेबाबत माहिती जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली तर सायबर गुन्ह्यांपासून आपल्याला जपता येईल. सायबर गुन्हे आपल्याबरोबर घडण्यापासून आपण संपूर्णपणे टाळू शकतो. आज तुम्हाला जी माहिती मिळाली ती तुम्ही पाच जणांना तरी सांगा, हे केल्याने सायबर सुरक्षित माणसांची साखळी निर्माण होईल. ही साखळीच तुम्हाला, मला आणि समाजाला सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करेल. घाबरू नका परंतु सुरक्षित रहा.

-अॅड. प्रशांत माळी,
सायबर सुरक्षा व सायबर कायदातज्ज्ञ
(९८२१७६३१५७)
शब्दांकन- सचिन पाटील
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा