महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
ग्रामीण महाराष्ट्र मार्च पर्यंत हागणदारी मुक्त होणार : बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला विश्वास सोमवार, ०१ जानेवारी, २०१८
महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे नवी दिल्लीत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे आयोजित बैठकीस उपस्थित होते. या बैठकीची अध्यक्षता केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री यांनी केली. या बैठकीत श्री. लोणीकर यांनी संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र मार्च 2018 पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचे सविस्तर नियोजन मांडले. यावेळी त्यांनी महान्यूजसाठी मुलाखत दिली.

प्रश्न : संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र मार्च 2018 पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचा जो संकल्प शासनाने घेतला आहे त्याबाबत माहिती द्याल ?
उत्तर : संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र मार्च 2018 पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. प्रत्येक ग्रामपंचायत हागणदारी मुक्त बनविण्यात लोकसहभाग मिळविण्यासाठी सर्व ग्राम पंचायतीचा ‘हागणदारी मुक्त ग्राम पंचायत कृती आराखडा’ तयार करण्यात येत आहे. त्यानुसार संबधित ग्राम पंचायतीमध्ये स्वच्छतेचे काम पूर्ण करण्यासाठी लोकसहभाग मिळविण्यात येत आहे. सदर काम विविध ग्राम पंचायतींमध्ये सुरू आहे.

प्रश्न : राज्यभरात किती जिल्हे, तालुके आणि ग्रामपंचायती आतापर्यंत हागणदारी मुक्त झालेले आहेत ?
उत्तर : देशातील हागणदारी मुक्त ग्राम पंचायतींच्या संख्येत महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकाचे आहे. आतापर्यंत राज्यातील 11 जिल्हे, 204 तालुके आणि 22,310 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषित करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील ग्रामीण भागात शौचालय असलेली एकूण 1,06,08,776 इतकी कुटुंबे आहेत. उर्वरित जिल्हे, तालुके आणि ग्रामपंचायतीही 31 मार्च पुर्वी हागणदारी मुक्त होतील यासाठी माहिती, शिक्षण आणि संवाद अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

प्रश्न : हागणदारी मुक्त गावांची स्थिती जाणून घेण्यासाठी कोणती प्रक्रिया राबविण्यात येते ?
उत्तर : हागणदारी मुक्त गावांची अद्ययावत स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हास्तरावर 83 आणि राज्य स्तरावर 22 अशा एकूण 105 मुख्य संसाधन संस्थांची निवड करण्यात आली आहे. या संस्थांच्या मदतीने हागणदारी मुक्त ग्राम पंचायतींची पडताळणी करण्यात येत आहे. वर्ष 2017-18 चे पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण 27,667 ग्राम पंचायतीपैंकी 22,310 ग्रामपंचायती जिल्हास्तरावरून हागणदारीमुक्त ग्राम पंचायत म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 15,380 ग्राम पंचायतींची 120 तालुक्यांची व नऊ जिल्ह्यांची पडताळणी मुख्य संसाधन संस्थाकडून पूर्ण करण्यात आली आहे. अन्य ग्राम पंचायतींच्या पडताळणीचे काम प्रगती पथावर आहे.

प्रश्न : हागणदारी मुक्त गावांसाठी आणखी कोणकोणते कार्यक्रम राबविले जातात ?
उत्तर :
हागणदारी मुक्त ग्रावांमध्ये विविध कामकाजाची नोंद करण्यासाठी ग्राम पंचायत स्तरावर नोंदवही व महिना प्रगती अहवाल रजिस्टर उपलब्ध करण्यात येते. त्याद्वारे गावातील प्रत्येक कुटूंबांची स्वच्छतेबाबतची माहिती प्राप्त होत आहे. अभियानांतर्गत होणाऱ्या कामकाजाचा लेखाजोखा जिल्हा व राज्यस्तरावर यामार्फत प्राप्त होतो.

यासोबतच ‘स्वच्छ महाराष्ट्र’ कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारीत केला जातो. सर्व जिल्ह्यांचे व विभागाचे तसेच राज्याचे विविध व्हॉट्सॲप ग्रूप बनविण्यात आलेले आहेत. दररोज या ग्रूपवर राज्यांमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात येते.

राज्यात दरवर्षी आषाढी एकादशीचे औचित्य साधून स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात येते. यामुळे दर वर्षी लाखो भाविकांमध्ये स्वच्छतेचा प्रचार व प्रसार केला जातो. दिंडीमध्ये सर्व जिल्ह्यांतून स्वच्छतेचे रथ व कलापथकांमार्फत शौचालय बांधण्याचे व वापर करण्याचे महत्व पटवून देण्यात येते.

केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेचा प्रसार-प्रचार करणे जनतेमध्ये स्वच्छतेच्या सवयी रूजविणे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. माहिती, शिक्षण संवाद अंतर्गत आंतरव्यक्ती संवादाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, शौचालय बांधकाम, परिसर स्वच्छता यासाठी ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात येत आहे.

शासनामार्फत केल्या जाणाऱ्या या सर्व प्रयत्नांतून ग्रामीण महाराष्ट्र मार्च 2018 पर्यंत पुर्णत: हागणदारी मुक्त होणार हा विश्वास मंत्री श्री.लोणीकर यांनी मुलाखती दरम्यान व्यक्त केला.

शब्दांकन : अंजू निमसरकर-कांबळे
माहिती अधिकारी, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
9899114130
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा