महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक बहुआयामी व्यक्तीमत्त्व - डॉ. गंगाधर पानतावणे रविवार, ११ डिसेंबर, २०१६
डॉ.गंगाधर पानतावणे हे दलित साहित्य व दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे संस्थापक संपादक आहेत. औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजात ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यांचे पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दलित वैचारिक वाङ्मय, अर्थ आणि अन्वयार्थ या समीक्षा, चैत्य लेणी, स्मृतिशेष, दुसऱ्या पिढीचे मनोगत, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज ही पुस्तकं प्रकाशित आहेत. अनेक कवि-लेखकांच्या पुस्तकांना विवेचक प्रस्तावना त्यांनी लिहिलेल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवडक लेखांचे संपादन त्यांनी केले आहे. २००९ मधील ‘सान होजे’ येथील पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, १८ सप्टेंबर २०११ रोजी महाराष्ट्रातील शिक्षण, साहित्य व तत्त्वज्ञान क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या विचारवंताना, मत्स्योदरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (जालना) यांच्याद्वारे दिला जाणारा मत्स्योदरी शिक्षण पुरस्काराने सन्मानित आणि सन २००६ मध्ये वाई येथील रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचा 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. एक थोर समाजसुधारक, द्रष्टे विचारवंत, श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ, महान कायदेतज्ज्ञ अशा विविध पैलुंनी बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व असामान्य ठरले आहे. भारतीय संविधानाच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय बाबासाहेबांचे आहे. आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य जाणून घेण्यासाठी डॉ. गंगाधर पानतावणे यांची घेतलेली ही नेट भेट....


१. बाबा साहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाला होणारी ६ डिसेंबरची गर्दी कमी होत नाही यामागचे प्रमुख कारण काय?
डॉ. बाबासाहेब हे दलित शोषितांचे उद्धारकर्ते तर होतेच परंतु भारत नावाच्या देशाला एक नवीन राष्ट्र म्हणून कसे निर्माण करता येईल, त्याची प्रतिमा नव्याने कशी उभी राहील, यासाठी संविधानाच्या रूपाने आणि अन्य विचारांच्या माध्यमातून, तत्वज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी जी शिकस्त केली त्याला तोड नाही. ते आता कुठल्या एका जातीपुरते राहिलेले नाही. ते सबंध देशाचे आणि जगाचे झालेले आहेत. मी बघितले आहे त्यांची स्मृती भारतातच नव्हे तर अमेरिका, इंग्लंड आणि पोलंडमध्ये केली जाते. त्यांनी केलेले कार्य न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे होते. म्हणून ६ डिसेंबरला त्यांचं स्मरण केल्या जात.

2.विविध गुण वैशि्ष्ट्यांनी संपन्न असणाऱ्या या व्यक्तिमत्वाची जडण-घडण बालपणात कशी झाली?
बाबासाहेबांचे वडील रामजी हे लष्करात सुभेदार होते. ते कबीर पंथी होते. त्यांची कौटूंबिक परिस्थिती कमकुवत होती. मुलांनी शिकले पाहिजे ही जाणीव मुलत: त्यांच्यात होती. बाबासाहेबांना ते अनेक थोरा – मोठ्यांचे पुस्तके ते वाचायला देत. बाबासाहेबांचा जन्म मध्यप्रदेशातील महुमध्ये झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले आणि पुढील शिक्षण मुंबईतील एलफिस्टन कॉलेज आणि परदेशात झाले. हा बाबासाहेबांचा प्रवास ध्येयनिष्ठेने प्रेरित झालेला आहे. आपला समाज हजारो वर्ष ज्ञानापासून वंचित राहिलेला आहे. “नत शुद्राय मती विध्यत्यात” अशी धर्मवाणी एकेकाळी होती आणि म्हणून शुद्रांना अति शुद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याची प्रथा आपल्याकडे होती याचं भान बाबासाहेबांना होते म्हणून शिकलं पाहिजे असे ते मानत. स्वत: बाबासाहेबांना सयाजीराव महाराजांनी सहकार्य केलं म्हणून ते कोलंबिया विद्यापीठात जाऊ शकले. तिथचं त्यांनी ज्ञानार्जन केलं. या विद्यापीठात कायदाविषयक स्वतंत्र ग्रंथालय आहे बाबासाहेबांच्या स्मरणार्थ त्यांचा पुतळा तिथे उभारण्यात आला आहे. आत्मज्ञान आणि नंतर समाजाचे भान राखून समाजाला ज्ञान देणं ही प्रक्रिया बाबासाहेबांच्या जीवनात अखंड दिसून येते.

३.सामाजिक, आर्थिक प्रश्नांकडे पाहण्यासाठी हा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना कसा उपयुक्त ठरला?
भारतीय समाजव्यवस्थे मध्ये अर्थ आणि समाज हे अभिन्न स्वरूपाचे घटक आहेत. अस्पृश्याची सामाजिक स्थिती ही त्याच्या अर्थकारणावरच ठरलेली आहे. त्यांना ज्ञानापासून वंचित ठेऊन कुठलेही आर्थिक साधन दिल गेलं नाही. यातून त्यांना मुक्त करायचे असेल तर प्रथम त्यांना ज्ञान दिलं पाहिजे. त्यांना त्यांच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची जाणीव बाबासाहेबांनी त्यावेळी करून दिली. सामाजिक आणि आर्थिक हे दोन्ही विषय त्यांच्या अभ्यासाचे होते.

4.बाबासाहेबांनी विदेशात राहून केलेल्या संशोधनाच वेगळेपण कसं आहे?
बाबासाहेब हे भारतीय संस्कृतीचे आणि समाजाचे पुनर्रचनाकार म्हणून उभे राहिले. “अनॅहिलेशन ऑफ कास्ट”या ग्रंथात मुलभूत प्रश्न सामाजिक जाणिवा त्यांनी मांडल्या आहेत. देशाच्या विकासाचा एकुणच विचार बाबासाहेबांच्या मनात आहे. जगातील जे इतर तत्वज्ञानी आहेत बर्टनर सेल असतील किंवा एग्मन बर्क असतील यांचा अत्यंत बारकाईने त्यांनी अभ्यास केला. भारतीय समाजातील जो अतिशय हिन मानला गेलेला समाज आहे त्याची आणि अमेरिकेतील निग्रो लोकांची तुलना त्यांनी केली. अमेरिकेत निग्रोंचा छळ होतो ती गुलामी आहे असे त्यांनी सांगितले. त्या गुलामी पेक्षाही भारतातील अस्पृश्यता ही भीषण आहे. त्यांना आत्मसन्मानाची जाणीव करून दिली पाहिजे.

5.भारतात परतल्यावर दलितांच्या उद्धारासाठी चळवळ उभारण्यासाठी त्यांचे सुरूवातीचे प्रयत्न कसे होते?
बाबासाहेब हे पहिल्यांदा एक पत्रकार होते. त्यांनी 1916 मध्ये बॉम्बे क्रॉनिकल मध्ये एक पत्र लिहिलं होतं, फिरोज शाह मेहता यांचा मृत्यू झालेला होता आणि मुंबईत चर्चा सुरू होती की, त्यांचा पुतळा उभारण्यात यावा. बाबासाहेबांनी त्या पत्रात सांगितलं की, पुतळे उभारून काहीही होणार नाही. त्याऐवजी नेत्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय स्वरूपाच ग्रंथालय उभारावं. त्यात अभ्यासकांना विविध विषयांच्या अनुषंगाने प्रवृत्त करावं. १९२० साली त्यांनी स्वत:च वर्तमानपत्र काढलं. १९२४ मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. १९२७ मध्ये महाडचा सत्यागृह केला. १९३० मध्ये नाशिकचा सत्यागृह केला. मी तर त्यांना संस्कृती पुरूषच म्हणतो. हे करत असताना त्यांचा अपमान झाला उपेक्षा झाली तरी ते पुढे गेले. कुसुमाग्रज म्हणाल्याप्रमाणे “अपेक्षा कशाची उपेक्षे वाचून.”

6. शिक्षण क्षेत्रात बाबासाहेबांनी केलेले कार्य सिद्धार्थ कॉलेज ते मिलिंद महाविद्यालय असे असले तरी त्यामागील त्यांची नेमकी भूमिका आणि दिशा काय होती?
शिक्षण क्षेत्र हे संस्कार केंद्र झाल पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. शिक्षक पालक झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना आणि स्त्रियांना उच्च शिक्षण दिलं पाहिजे. स्त्री-पुरूष समानता निर्माण झाली पाहिजे. यावर त्यांचा विश्वास होता. चार भिंतीतलं शिक्षण त्यांना मान्य नव्हतं. जगातलं जे ज्ञान आहे ज्याच्यांशी जीवनाच्या अनेक शाखा संलग्न आहेत ते शिक्षण दिलं पाहिजे. माणसाला स्व अस्तित्वाची जाणीव व्हायला पाहिजे असा माणूस बाबासाहेबांना घडवायचा होता. ‘शिका संघटित व्हा संघर्ष करा’ हे त्याचं वचन होत.

7.बौद्ध धर्माच्या अभ्यासाचा प्रवास कसा आहे?
दलित समाज हजारो पिढ्या अस्मिता शून्य आणि दारिद्र्यात खितपत पडला होता. याची बोचरी जाणीव बाबासाहेबांच्या मनामध्ये होती. या समाजाला उन्नत करण्यासाठी परिवर्तन झाले पाहिजे. अस्पृश्य जर गुलाम असेल तर स्पृश्यांनी परिवर्तन केलं पाहिजे. त्यांच्यात हे आपलेच बांधव आहेत अशी जाणीव निर्माण झाली पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून एक प्रचंड उत्क्रांती जीवनात निर्माण केली पाहिजे. लोकमान्य टिळक अस्पृश्य समाजात जन्माला आले असते तर ते म्हणाले असते की, अस्पृश्यता निर्मूलन करणे हा माझा आद्य धर्म आहे आणि तो मी पूर्णत्वाला नेईल. त्यासाठी बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. शेवटी या समाजाचा उद्धार व्हायचा असेल तर, 1927 साली त्यांनी एक विचार मांडला, मला सामाजिक क्रांती करावी लागेल पण समाजक्रांतीने जर हे सर्व सुटले नाही तर मला धर्मक्रांती करावी लागेल. नंतर 1933 साली त्यांनी लिहीलं की, मला माणूस म्हणून जगता येत नाही, माझ्या हजारो पिढ्यांना जगता येत नाही मला धर्मांतर करायचं आहे. त्यांनी 1935 साली येवल्याला धर्मांतराची घोषणा केली. 21 वर्ष थांबून 14 ऑक्टो 1956 ला त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. केवळ बुद्धांचे तत्वज्ञान मानणारा जातीविहीन हा एकमेव धर्म आहे. अशी त्यांची जाणीव झाली आणि त्यांनी धर्मांतरण केले.

8.महिलांच्या सक्षमीकरणाबाबत आपण आज चर्चा करतो परंतू बाबासाहेबांनी त्याचा विचार खूप पुर्वीच करून ठेवला होता, याबद्दल आपणास काय सांगता येईल?
स्त्री –पुरूषांना शिक्षण दिलं पाहिजे. वेगवेगळं नाही तर समान शिक्षण द्या. समाजातील तळागाळातली सगळी माणसं जी वंचित आहे शोषित आहे अशा समाजातल्या स्त्रियां सगळ्यांच्या उद्धाराच्या नुसत्या कल्पना त्यांनी मांडल्या नाही तर वास्तव मांडलय.

9. नदीजोड प्रकल्प आणि ऊर्जा विषयक बाबासाहेबांचे विचार सांगा?
1942 मध्ये बाबासाहेब श्रममंत्री झाले. तेव्हा ब्रम्हपुत्रानदीला महापूर आला की, प्रचंड हाल होत असे. वित्तहानी, पशुहानी, मनुष्यहानी असे दरवर्षी होते. ते पाणी वाया जातं. त्यावेळी जलसंपदा, विद्युत आणि श्रम असं या खात्याचे काम ते बघत. ते स्वत: तिथे जाऊन आले. त्या पाण्याचा विनियोग व्हावा म्हणून नदीच्या दोन्ही बाजुला तलाव खोदा आणि ते पाणी त्या तलावाकडे वळवा म्हणजे महापुराच नियोजन करता येईल. त्यावेळी बाबासाहेबांनी राष्ट्रीय जलआयोग पहिल्यांदा स्थापन केले. आणि त्या तलावात नौकानयन करावं. परदेशातून, भारतातून येणाऱ्या लोकांसाठी पर्यटनस्थळ निर्माण होईल. या पाण्याचा वापर विद्युत निर्मितीसाठी करा. एवढे ते द्रष्टे पुरूष होते.

10. बाबासाहेबांचे देशासंबंधीचे विचार सांगा?
बाबासाहेब हे अखंड भारताचे सर्मथक होते. हा एकसंध देश रहायला हवा. आणि एकसंध व्हायचा असेल तर, कास्टलेस सोसायटी निर्माण झाली पाहिजे. त्यांची जातीविहीन समाजाची कल्पना होती. माणसाचं विभाजन करणारे धर्म त्यांना मान्य नव्हते. आम्ही सर्वसमान आहोत सारखे आहोत असे त्यांचे म्हणण होत.

11. तुम्ही बाबासाहेबांकडे कसे आकर्षित झालात?
बाबासाहेब हे क्रांतीकारक होते. क्रांती समाजात झालीच पाहिजे. त्यामुळे ते धर्मशास्त्रावर अतिशय कठोरपणे बोलतात. मी त्यांची अनेक भाषणे जवळून ऐकलीत. एकदा ते ज्या ठिकाणी थांबले होते. तिथे आम्ही घोषणा देत होतो बाबासाहेबांचा विजय असो अशा. आम्ही विद्यार्थी होतो त्यावेळेस त्यांनी मला प्रश्न केला घोषणा का देता? विद्यार्थी आहात मग अभ्यास करा. चांगले वाचा 14 ऑक्टोबर 1956 ला त्यांनी स्वत: आम्हाला दीक्षाभूमीवर दीक्षा दिली. सार्थकी जीवनाचे हे क्षण आहेत.

12. आपण बाबासाहेबांवर एक पत्रकार म्हणून ग्रंथ लिहिला त्याबद्दल सांगा ?
बाबासाहेब एक दुर्लक्षित पत्रकार होते. ते श्रेष्ठ विचारवंत होते. प्रबोधनकार ठाकरे यांनी “खरा ब्राम्हण” नावाच एक नाटक 1936 ला लिहिलं तेव्हा त्या नाटकाचं परिक्षण बाबासाहेबांनी केलं होत. 1920 मध्ये मुकनायक, 1926 बहिष्कृत भारत, 1930 मध्ये जनता पत्र काढलं. त्याचच रूपांतर पुढे 1956 मध्ये प्रबुद्ध भारत असं झालं. मी माझ्या ग्रंथात म्हटलं आहे की, बाबासाहेब आंबेडकर नावाच्या मुकनायकाने बहिष्कृत भारतातील जनतेला प्रबुद्ध भारताकडे नेले. ते महान पत्रकार होते. अस्पृशासंबंधीच त्यांनी लिहिलं असं नाही तर स्पृश्यांना अस्पृश्य समाजाला सारखी चेतावणी दिली. तुम्ही बदला. वैचारिक सौंदर्याने ओतप्रत भरलेली त्यांची पत्रकारिता होती. मी 1987 साली हा शोध प्रबंध लिहिला. भारतात पहिल्यांदा बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर मी PHD केली.

जयश्री श्रीवास्तव
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा