महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवजीवन देणारा प्रशिक्षणार्थी डॉक्टर - विपीन खडसे शनिवार, ०६ मे, २०१७
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कठीणातील कठीण शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आपण ऐकल्या असतील. थ्री इडियट्स या चित्रपटात देखील अशीच एक अवघड परिस्थितीतील प्रसुती अगदी सहज झाल्याचे आपल्यापैकी अनेकांनी बघितली आहे. चित्रपटाच्या याच प्रसंगाला अनुरूप एक वास्तवातील प्रकार अहमदाबाद – पुरी या रेल्वेत वर्धा स्टेशनच्या दरम्यान घडला. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या विपीन खडसे याने धावत्या रेल्वेत व्हॉटस ॲपच्या मदतीने तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेऊन प्रसुती पार पडली. या प्रसंगाविषयी अनुभवकथन करणारी खास मुलाखत नेटभेटच्या वाचकांसाठी...

त्या दिवशी ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं हे आम्हाला तुझ्याकडूनच जाणून घ्यायला आवडेल...
तो दिवस माझ्यासाठी आयुष्यातील अविस्मरणीय दिवस होता. झालं असं की, मी अकोल्याहून नागपूरला अहमदाबाद - पुरी ट्रेनने जात होतो. रेल्वे जशी वर्ध्याच्या पुढे निघाली तशी ती थांबवण्यात आली. काहीतरी गोंधळ असल्याचं लक्षात आलं. पण नेमकं काय झालं हे कळायला मार्ग नव्हता. थोड्या वेळाने समजलं की कुणीतरी गर्भवती महिला अवघडलेल्या स्थितीत आहे आणि तिचे नातेवाईक तिच्यासाठी डॉक्टरची विचारणा करत होते. सुरुवातीला मी शांत राहिलो कारण मला वाटलं की कुणी व्यावसायिक डॉक्टर मिळाले तर ते अधिक चांगलं होईल. ते चांगल्या प्रकारे ही केस हाताळू शकतील. पण त्या संपूर्ण ट्रेनमध्ये कुणीच डॉक्टर उपलब्ध नसल्याने शेवटी मी पेशंटला बघण्याची तयारी दर्शविली. मी पेशंटजवळ गेलो तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत होती. मग आम्ही ट्रेनमध्येच प्रसुती रूम तयार केली. तोपर्यंत मी रेल्वे सुरू करायला सांगितली होती, म्हणजे लवकरात लवकर पुढच्या स्टेशनवर पोहचून तिला योग्य ते वैद्यकीय उपचार घेता येतील हा विचार माझ्या डोक्यात सुरु होता. दरम्यान मी माझं काम सुरु केलं होतं. नागपूरमधील निवासी डॉक्टरांच्या सल्ल्याने मी उपचार करीत होतो. अखेर नागपूरला पोहचण्यापूर्वीच आई आणि बाळ दोघांनाही वाचविण्यात यश आलं.

ही प्रसुती करताना तुला व्हॉटस्अॅप सारख्या माध्यमाची देखील मदत झाली असं समजलं, त्याबद्दल काय सांगशील...?
हो, हे खरंय. मी ज्यावेळी पेशंट महिलेपाशी पोहचलो त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती आणि खूप रक्तस्त्राव सुरु होता. साधारणतः प्रसुतीच्या वेळी बाळाचे डोके सर्वप्रथम बाहेर येते. इथे मात्र बाळाचा खांदा बाहेर आला होता, त्यामुळे बाळाला बाहेर काढताना अडचणी वाढल्या होत्या. त्यावेळी मी माझ्या संपर्कात असणाऱ्या निवासी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेत होतो. त्यांनी मला त्यांच्या व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये सामिल केलं, त्यात साधारणतः २५० डॉक्टरांचा समावेश होता. त्या डॉक्टरांचे या डिलिवरीदरम्यान मार्गदर्शन लाभले. त्या स्थितीतले पेशंटचे फोटो डॉक्टरांशी शेअर केल्याने त्यांना परिस्थितीचा बरोबर अंदाज आला आणि ते मला योग्यरित्या मार्गदर्शन करू शकले.

तुझ्या आयुष्यात तू पहिल्यांदाच प्रसुतीचा रुग्ण हाताळत होतास, आणि ते ही या अशा विचित्र परिस्थितीत. तर त्यावेळी तुझी मानसिक स्थिती कशी होती..?
मी आधीच म्हटलं तसं सर्वप्रथम तर मी शांतच होतो. ही प्रसुती मी हाताळू इच्छित नव्हतो. कुणीतरी व्यावसायिक डॉक्टर मिळावा अशी माझी मनोमन इच्छा होती. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की, पेशंटला बघणं आणि प्रसुती पार पाडणं माझ्यासाठी अपरिहार्य होऊन बसलं होतं. कारण त्या परिस्थितीत काहीही होऊ शकलं असतं. रेल्वेमधील इतर प्रवासी देखील रेल्वेकडे त्यांचा डॉक्टर का नाही या प्रश्नावर आक्रमक झाले होते. निवासी डॉक्टरांच्या मी संपर्कात होतोच आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये असंही वाटत होतं. शेवटी द्विधा मनःस्थितीतून बाहेर पडतं मी रुग्णाला बघण्याचा निर्णय घेतला.

...आणि हे सगळं यशस्वीरित्या पार पडल्यानंतरची तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती...?
खरं तर हे सगळं यशस्वीरित्या पार पडल्यानंतर मला यातून आपली सुटका झाल्यासारखं वाटत होतं. सुरुवातीचा अर्धा तास तर हे सगळं काय घडलंय आणि आपण हे काय केलंय हे माझं मलाच समजत नव्हतं. मला स्वतःला पुर्वपदावर यायला अर्धा तास लागला. प्रसुती करत असताना काहीच लक्षात नाही आलं, कारण मला मिळत जाणाऱ्या सूचना मी अनुसरत होतो. पण मग हे सगळं घडून गेल्यानंतर त्यावर विश्वास ठेवणं अवघड जात होतं, सगळं काही चांगलं झाल्याने तो एक वेगळाच आनंद देखील होता.

घरच्यांची- मित्रमैत्रिणींची या सगळ्यावर काय प्रतिक्रिया होती..?
खरं तर घडल्या प्रकाराबद्दल संध्याकाळपर्यंत मी घरी काही बोललोच नव्हतो. संध्याकाळच्या वेळी प्रसिद्धीमाध्यमांकडूनच घरी ही बातमी समजली, तेव्हा त्यांनीच मला फोन करून असं काही झालंय का? याविषयी विचारणा केली. तेव्हा कुठे मी त्यांना त्याबद्दल सांगितलं. अर्थात माझ्याप्रमाणेच त्यांना देखील हे सगळं अनपेक्षित होतं. प्रशिक्षणाच्या काळात अशा प्रसंगाला सामोरे जायला लागेल असा त्यांना कधीच वाटलं नव्हतं. पण असा काही प्रसंग उद्भवलाच तर कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याइतपत मी सक्षम आहे, असा त्यांना माझ्याविषयी विश्वास होता. तो खरा ठरल्याचा त्यांना आनंदच झाला. मित्र-मैत्रिणी देखील खूप खुष झाले होते. कॉलेजमध्ये तर हे समजल्यानंतर आनंदोत्सव सुरु झाला होता. हा अनुभव माझ्यासाठी अद्भुत आणि खूप काही शिकवणारा होता.

(डॉ. विपीन खडसे संपर्क 9552099700)

 अजित बायस
९९७०६६२२२०
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा