महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
राष्ट्रीय युवा पुरस्कारामुळे नव्याने काम करण्याची ऊर्जा- जव्वाद पटेल गुरुवार, १८ जानेवारी, २०१८
प्रत्येकाच्या आयुष्यात युवाकाळ हा अत्यंत महत्वाचा. काही करून दाखविण्याचा व आपल्या व्यक्तीमत्वाची वेगळी छाप सोडण्याचा. असेच एक व्यक्तीमत्व, आपल्या कर्तृत्वाची छाप राष्ट्रीय स्तरावर उमटविणारा अकोला येथील युवा संशोधक जव्वाद पटेल. त्यांनी सामाजिक भान आणि संशोधक वृत्ती यांची उत्तम सांगड घालून संशोधन कार्य केले. आरोग्य, उर्जा, कृषी आणि जल क्षेत्रात केलेल्या संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल म्हणून २३ व्या वर्षीच या संशोधकाला राष्ट्रीय युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते हा पुरस्कार नुकताच ग्रेटर नोएडा येथील गौतमबुद्ध विद्यापीठात आयोजित २२ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात प्रदान करण्यात आला. त्यांनी आतापर्यंत दोन हजारांहून अधिक संशोधन केले असून त्यातील दोन संशोधनाला पेटंट मिळालेली आहेत. तसेच ३९ रिसर्च पेपर्सही सादर केले आहेत. या युवा संशोधकाची नेट भेट सदरासाठी घेतलेली खास मुलाखत.

सर्वप्रथम आपले अभिनंदन, राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल पहिली प्रतिक्रिया काय?
धन्यवाद. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने देशातील युवकांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी देण्यात येणारा हा मानाचा पुरस्कार मिळाल्याचा अत्यानंद आहे. या पुरस्कारामुळे नव्याने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.

आपले मूळ गाव आणि शैक्षणिक प्रवास याविषयी थोडक्यात काय सांगाल?
मी मूळचा अकोल्याचा. जुना अकोला भागात काळा मारोती रोड येथे मी राहतो. दहावी पर्यंतचे शिक्षण अकोला येथे नंतर अकरावी आणि बारावी औरंगाबाद येथे आणि आता हैद्राबाद येथील एलआयटी संस्थेतून मी बी.टेक. करीत आहे.

तुमच्यातील संशोधक वृत्तीची सुरुवात कशी झाली?
साधारणत: चार वर्षाचा असताना पासूनच माझा संशोधनाकडे कल सुरु झाला. घरातील विविध उपकरणे एकमेकांपासून वेगळे करणे व ते पुन्हा जोडून पाहणे अशी ही सुरुवात झाली. जसजसा मोठा होत गेलो आणि संशोधनातील समज आणि आवड वाढत गेली, तसा माझ्यातील संशोधक घडत गेला. हा प्रवास आतापर्यंत मी केलेले दोन हजारांहून अधिक संशोधन, विविध ठिकाणी मी सादर केलेले ३९ रिसर्च पेपर इथपर्यंत येऊन पोहचला आहे. ‘ड्युड्रॉप डिवाईस’ आणि ‘स्मार्ट हेल्मेट’ या माझ्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे.

राष्ट्रीय युवा पुरस्काराविषयी काय सांगाल?
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय विकास व समाजसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींना याशिवाय स्वयंसेवी संघटनांना प्रदान करण्यात येतो. समाज सेवा, आरोग्य, संशोधन, मानवाधिकार आदि क्षेत्रांसाठी २५ व्यक्तीगत व १० संस्थागत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. व्यक्तीगत पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रूपये, पदक आणि मानपत्र असे असून संस्थात्मक पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रूपये चषक आणि मानपत्र असे आहे.

आपणास ज्या संशोधन कार्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे, त्याविषयी काय सांगाल?
मला समाजोपयोगी संशोधनात विशेष रस आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची आवड आणि संशोधकवृत्ती यांची सांगड घालून आरोग्य, उर्जा, कृषी आणि जल क्षेत्रात मी केलेल्या संशोधनाची दखल राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी घेण्यात आली. आरोग्य क्षेत्रातील संशोधनात मी छातीचा कर्करोग शोधून काढणारे इपीडम्सी डिवाईस आणि रक्त नमुना न घेता मधुमेह चाचणी करणारे नॉन इनव्हेसीव शुगर डिटेक्शन डिवाईस तयार केले आहे. उर्जा क्षेत्रात सौर उर्जेवर चालणारी कार तयार केली आहे. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर १०० कि.मी. पर्यंत आरामात चालू शकते. जल क्षेत्रात हवेच्या आर्द्रतेपासून पाणी तयार करणारे ड्युड्रॉप डिवाईस तयार केले आहे. कृषी क्षेत्रातील संशोधनात मी रोपट्यांना योग्य प्रमाणात पाणी आणि खत पुरविण्यासाठी उपयोगी पडणारे ॲग्रीटेक हे तंत्र विकसीत केले आहे, ज्या माध्यमातून रोपट्यांना योग्य प्रमाणात व वेळेत पाणी व खत देऊन उत्पादन क्षमता वाढविता येते.

देशभरातील युवकांचे प्रेरणास्थान असणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरी करण्यात येते. देशातील प्रतिभावान युवा शक्तीच्या उल्लेखनीय योगदानासाठी याच दिवशी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कर्तृत्वाच्या जोरावर जव्वाद पटेल यांनी हा मानाचा पुरस्कार मिळवून देशाच्या राजधानीत महाराष्ट्राची मुद्रा उमटविली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

-रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा