महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
चला, हसत खेळत मनाचा विकास करु या !- वरप्रभ शिरगांवकर शुक्रवार, १७ मार्च, २०१७
श्री. वरप्रभ शिरगावकर हे व्यवसायाने पूर्ण वेळ कलाकार आहेत. चार्ली चॅप्लीनची वेशभूषा, केशभूषा करुन ते गेली 34 वर्षे मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करित आहेत. त्यांच्याशी झालेली ही हसत खेळत नेट भेट....

श्री. वरप्रभ शिरगावकर यांचा जन्म दि. 05 ऑगस्ट, 1961 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडिल सेनादलात होते. त्यानंतर ते एका खाजगी कंपनीत कामाला होते. श्री. वरप्रभ शिरगावकर यांचे शालेय शिक्षण विलेपार्ले येथील शिवाजी विद्यालयात झाले. शाळेतील शिक्षिका सरोजमाई पाटील यांच्या संस्कारांचा आपल्यावर फार परिणाम झाला आणि जीवनाला दिशा मिळाली, असे शिरगावकर कृतज्ञतेने नमूद करतात.

शिरगावकर शालेय शिक्षणानंतर औपचारिक महाविद्यालयीन शिक्षणाकडे न वळता अध्यात्माकडे वळले. इंग्लंडचे धम्माचारी लोकमित्र यांच्या सहवासात राहून त्यांनी आध्यात्मिक विकासाचा मार्ग धरला. स्वत: ध्यानधारणा शिकल्यावर ते इतरांना नियमितपणे ध्यानधारणा शिकवित असतात.

शिरगावकर यांच्यातील कलागुण धम्माचारी लोकमित्र यांनी प्रथम हेरले. त्यांनी तुमचा चेहरा प्रसिद्ध विनोदी नट चार्ली चॅप्लिन सारखा दिसतो, म्हणून त्याचा उपयोग करुन ''मनोरंजनातून समाज प्रबोधन'' करा, असे त्यांनी सुचविले. त्यानुसार 1984 पासून इंग्लंडमधून येणाऱ्या लोकांसाठी शिरगावकर मुक अभिनय करु लागले. जागतिक किर्तीचे कलावंत, अलाहाबाद येथील पद्मश्री निरंजन गोसावी यांच्याकडून ते मूक अभिनय शिकले.

सुरुवातीला, चार्लीची चहा करताना उडणारी गडबड, विस्मृतीतून निर्माण होणारी विनोदी परिस्थिती असे विविध प्रसंग शिरगावकर सादर करित असत. त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला हसत खेळत मनाचा विकास असे नाव दिले. या कार्यक्रमाच्या नावाप्रमाणेच ते हसत खेळत आपला कार्यक्रम आजपर्यंत सादर करित आलेले आहे.

2011 साली त्यांनी रितसर मुक्तविष्कार कल्चरल अँड सोशल युनिट ही स्वयंसेवी संस्था सुरु केली. 'कलेद्वारे मुले आणि पालक यांना नितीमुल्ये, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता' हे या संस्थेचे ब्रीद आहे. या संस्थेत सध्या 10-12 कलाकार आहेत. त्यापैकी श्री. अरुण ओव्हाळ हे हार्डीची भूमिका करतात. वरप्रभ शिरगावकर यांची चार्लीची आणि अरुण ओव्हाळ यांची हार्डीची भूमिका म्हणजे प्रेक्षकांना एक हास्य मेजवानीच असते.

आपल्या कार्यक्रमाद्वारे आपण केवळ मनोरंजन करतो, अशी खंत शिरगावकरांना वाटायची. म्हणून त्यांनी मनोरंजनातून समाज प्रबोधन करायचे ठरविले. याची सुरुवात त्यांनी अनाथ मुलांच्या वसतीगृहातून केली. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे त्यांना प्रारंभी कार्यक्रम देण्यात आले. या कार्यक्रमातून ते मुलांनी संतांच्या आणि शास्त्रज्ञांच्या जीवनाचा आदर्श कसा घेतला पाहिजे, हे सांगायचे. आजही ते हा कार्यक्रम विविध शाळा, महाविद्यालये, वसतीगृहातून करित असतात. याचबरोबर शासनाच्या महसूल, आरोग्य, पर्यावरण, पाणीपुरवठा अशा विविध विभागांसाठी ते कार्यक्रम करित असतात. नुकतेच त्यांनी मतदार जागृतीसाठी विविध ठिकाणी कार्यक्रम केले.

'अहिंसात्मक संवाद' कसा साधायचा यावर शिरगावकर यांचा भर असतो. अहिंसात्मक संवाद म्हणजे चिडलेल्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, त्याचा आतला आवाज ऐकणे, त्याला समजून घेणे हे होय. याविषयी बोलताना ते म्हणतात, आज घराघरात, कार्यालयात, समाजात प्रत्येक ठिकाणी अहिंसात्मक संवादाची नितांत गरज आहे. या प्रयोगाची शंभरीकडे वाटचाल सुरु आहे.

भारतीय संविधानाने स्त्री आणि पुरुषांना समान दर्जा दिला असून सर्वांनी त्याचा कसा चांगला उपयोग करुन घ्यावा, याविषयीही शिरगावकर त्यांच्या कार्यक्रमाद्वारे प्रबोधन करित असतात. सार्वजनिक कार्यक्रमांबरोबरच शिरगावकरांचे आतापर्यंत विविध वाहिन्यांवर, विविध विषयांवर कार्यक्रम झाले आहेत. महाराष्ट्राबरोबरच शिरगावकरांचे गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये कार्यक्रम झाले.

आपला आगामी उपक्रम काय? असे विचारल्यावर शिरगावकर म्हणाले, आगामी दोन महिने आपण इंग्लंडमध्ये कार्यक्रम करणार आहोत. या कार्यक्रमांचा विषय म्हणजे बदलत्या जीवन शैलीमुळे निर्माण झालेल्या ताणतणावांना कसे तोंड द्यायचे हा आहे. आज पाश्चात्य जग भारतीय तत्वज्ञानाकडे मोठ्या आशेने पहात आहे, असे निरीक्षण शिरगावकरांनी या नेटभेट मध्ये नोंदवले.

शिरगावकरांची पत्नी संगिता यांनी संगीत विशारद ही पदवी मिळविली असून त्या पुणे महानगरपालिकेच्या शाळेत मुख्याध्यापिका आहेत. मोठा मुलगा प्रज्योत सीए ची तयार करीत आहे. दुसरा मुलगा सुधांशू अकरावी विज्ञान शाखेत आहे.

शिरगावकरांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

- देवेंद्र भुजबळ
संचालक (माहिती) (वृत्त)
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा