महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
शासन तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी- सुभाष देशमुख गुरुवार, १६ मार्च, २०१७
सर्व सामान्यांच्या रोजच्या जेवणात तुरीला खूप महत्व आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. यावर्षी शासनाने सर्वाधिक तूर खरेदी किमान आधारभूत किंमतीत केली आहे. यामुळे लोकांनी तूर खरेदीसाठी गर्दी केली. एकाच वेळी झालेल्या या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने निरनिराळ्या उपाय योजना राबवल्या आहेत. याच योजनांची माहिती घेण्यासाठी राज्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी नेटभेट च्या माध्यमातून केलेली खास बातचीत..

तुरीचे भरघोस उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्या बाबत काय सांगाल ?
उत्तर- सर्व प्रथम जलयुक्त शिवार सारख्या महत्वकांक्षी योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा झालाय, शिवाय पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आहे. निसर्गाच्या कृपेमुळे यावर्षी कीड न लागता चांगल्या दर्जाची तूर उत्पादित झाली आहे. कृषी विभागाचा १० लाख क्विंटल उत्पादन होईल असा अंदाज होता पण त्यापेक्षा जास्त उत्पादन झाले. १५ मार्च पर्यंत १० लाख क्विंटल खरेदी होईल असा अंदाज होता. मात्र २७ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत १७ लाख २५ हजार क्विंटल तुरीची खरेदी यापूर्वीच झाली होती. अजून शेतकऱ्यांकडे १० लाख क्विंटल माल असू शकतो असा अंदाज आल्याने पुढील काळात अडचण येऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी महत्वाच्या अडचणी लक्षात घेऊन त्या नाफेड कडे मांडल्या आहेत. नाफेडची परवानगी घेऊन गोदामाची संख्या कमी असल्याने खाजगी गोदाम घ्यावीत, कृषी उत्पादन विभागाची गोदामे घ्यावीत, कारखान्याची गोदामे घ्यावीत, अशी उपाययोजना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन करून बारदाना उपलब्ध करून देण्यास सांगितले आणि जवळ जवळ ९९ टक्के बारदाना उपलब्ध झाला आहे.

यावर्षी तुरीचे अभूतपूर्व उत्पादन झाले आहे. मात्र यापूर्वीची परिस्थिती कशी होती?
उत्तर- मी सहकार मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. त्यात असे लक्षात आले की, मागच्या १० वर्षाचा अंदाज घेतल्यास तीन लाखापेक्षा कधीही जास्त खरेदी झाली नव्हती. मात्र आत्तापर्यंत २० लाख २५ हजार क्विंटल खरेदी झालेली आहे. अजूनही १० लाख क्विंटल खरेदी होईल असा अंदाज आहे.

खरेदी केंद्र आणि गोदाम यांच्यातील अंतर वाढवून दिले याचे कारण काय?
उत्तर- खरेदी केंद्र आणि गोदाम यांच्यातील अंतर ५० किलोमीटर होते. वाहतुकीवर जास्त खर्च होऊ नये, शेतकऱ्यांचा जास्त खर्च होऊ नये म्हणून ५० किलोमीटर अंतर असावे ही अट होती. परंतु सर्व गोदामे भरलेली होती. मात्र इतर गोदामे घेऊन तुरीची विक्री व्हावी म्हणून ५० किलोमीटर वरून १२० किलोमीटर अंतर करण्यात आले.

डाळीच्या साठवणीमध्ये तीन पटीने वाढ करण्यात आली. याच्या संदर्भात काय सांगाल?
उत्तर- पूर्वी व्यापारी डाळीची साठवणूक करून ग्राहकाला जास्त भावाने डाळ विकत होते. साठवणुकीची ही एक मर्यादा होती. पण तुरीचे उत्पादन जास्त झाल्याने सरकारी गोदामे कमी पडतील म्हणून डाळ व्यापाऱ्यांना आहे त्यापेक्षा साठवणुकीसाठी मर्यादा तिप्पट वाढवून दिली आहे. तीन महिन्यांची मुदत दिली आहे. डाळ मिलची मर्यादाही वाढवून दिली आहे.

तूर खरेदी केंद्र कधी पर्यंत सुरु राहणार आहेत?
उत्तर- नाफेडने १० लाख क्विंटल अधिक खरेदी करू शकतो अशी परवानगी देऊन १५ एप्रिल पर्यंत मुदत दिली आहे. मात्र मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आहे जर १५ एप्रिल पर्यंत हमी भावापेक्षा तुरीचे भाव वाढले नाही तरीही शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक राहत असेल तर आम्ही तूर खरेदी करू. जो पर्यंत भाव वाढत नाहीत तो पर्यंत खरेदी केंद्र सुरु ठेवण्याचा मुख्यमंत्र्याचा मानस आहे. याद्वारे तूर पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.

तूर पिकवणाऱ्या शेतकऱ्यासाठी आणखी कोणत्या योजना आहेत?
उत्तर- ज्यांना तत्काळ पैसे हवे आहेत त्यांना तूर विक्री करून पैसे मिळवता येतात. परंतु ज्यांना भविष्यात जास्त भाव जास्त मिळण्याची अपेक्षा आहे. त्यांना शेतमाल तारण योजनेत ५००० च्या ७० टक्के रक्कम सहा टक्के व्याज दराने दिली जाते आणि भाव वाढल्यानंतर केव्हाही त्याला सहा महिन्यापर्यंत माल विकून लाभ घेता येतो.

शेतकऱ्यांना काय आवाहन कराल?
उत्तर- शेतकऱ्यांनी घाबरून न जाता हमी भावापेक्षा कमी भावाने बाजारात तूर विकू नये आणि व्यापाराने देखील कमी किंमतीत तूर खरेदी करू नये. अन्यथा यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील. शेतकऱ्यांनी उत्पादन जास्त झाले म्हणून घाबरून न जाता शेती करावी. शासन त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. तूर संपल्यानंतर हरभरा खरेदी केंद्र देखील सुरु करण्याचा विचार आहे. शासन शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबववित असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे.

शब्दांकन : अमृता आनप
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा