महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
नवी दिल्लीतही मराठीचा लौकीक जपणारे....चौगुले पब्लिक स्कूल शुक्रवार, ०४ ऑगस्ट, २०१७
दिल्लीत शासकीय, तसेच खाजगी संस्थ्यांच्या उत्तम दर्जाच्या अनेक शाळा आहेत. या शाळांच्या यादीमध्ये आवर्जून नाव घेतले जाते, ते चौगुले पब्लिक स्कुलचे. चौगुले पब्लीक स्कूल या मराठी अल्पसंख्याक दर्जा असणाऱ्या शाळेचा 1976 पासून करोल बागेतून प्रवास सुरु झाला. मराठा मित्र मंडळाच्यावतीने चालविण्यात येणाऱी शाळा म्हणून या स्कुलचा लौकीक आहे. गत बारा वर्षापासून या स्कुलमध्ये मुख्याध्यापिका म्हणून पूजा साल्पेकर कार्यरत आहेत. नवी दिल्लीतील मराठी शाळेच्या या प्रवासाविषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न..त्यासाठी त्यांच्याशी केलेली बातचीत..

मराठा मित्र मंडळाशी निगडीत या शाळेचे नाव चौगुले पब्लिक स्कूल असे कसे पडले ?
दिल्लीत मराठा मित्र मंडळ संस्था 1956 पासून अस्तित्वात आहे. सुरूवातीला संस्थेककडून शिशू विहार सुरू करण्यात आले होते. एका उपक्रमाच्या निमित्ताने उद्योजक विश्वासराव चौगुले यांनी १९७३ मध्ये मराठा मित्र मंडळाला पन्नास हजार रुपयांची देणगी दिली. मराठा मित्र मंडळाचे स्वप्न होते, दिल्लीत एक मराठी शाळा असावी आणि त्यासाठी उद्योजक श्री. चौगुले यांची देणगी महत्त्वपुर्ण ठरली. या देणगीतून शाळा उभारणे सोपे झाले असल्यामुळे शाळेला “चौगुले पब्लिक स्कूल” असे नाव देण्यात आले.
सुरवातीला 1956 मध्ये शिशू विहाराची सुरवात झाली, नंतर 1976 मध्ये प्राथमिक शाळा सुरू केली, दिल्ली महानगर पालिकेची शाळेला मान्यता मिळाली. दिल्ली शिक्षण मंडळाकडूनही 1981 मध्ये माध्यमिक शाळेला परवानगी मिळाली, त्यानंतर सीबीएससीकडून 1986 मध्ये दहावीपर्यंतच्या वर्गांना मान्यता मिळाली. पुढे 1989 मध्ये बारावीपर्यंत मान्यता मिळाली. आज स्कुलमध्ये नर्सरीते ते बारावीपर्यंतचे अभ्यासक्रम चालविले जातात. सर्वात एक महत्वाचे म्हणजे आमच्या या स्कुलमध्ये पहीली ते आठवीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य आहे.

शाळेच्या एकूण रचनेविषयी सांगा ?
चौगुले पब्लिक स्कुल आता मोठी विस्तारली आहे. आमच्याकडे आता हजारावर विद्यार्थीं संख्या आहे. स्कुलमध्ये चाळीस वर्गखोल्या, सुसज्ज अशा पाच प्रयोगशाळा, दृकश्राव्य कक्ष, स्मार्ट शिक्षण वर्ग अशा सुविधा आहेत. शाळेचे उपाहारगृहही वैशिष्ट्यपुर्ण आहे. आहारापासून, पिण्याच्या शुध्य पाण्यापर्यंत आम्ही कटाक्षाने काळाजी घेतो. सूसज्ज आणि मोठे ग्रंथालय हे आमचे वेगळेपण आहे. ग्रंथालयात आठ हजारच्या जवळपास ग्रंथ संपदा आहे. अभ्यासक्रमाशी निगडीत तसेच मान्यवर साहित्यिकांची ग्रंथही उपलब्ध आहेत. क्रिडा क्षेत्रातील नैपुण्यासाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. स्केटिंग, व्हॅाली बॉल, बास्केट बॉल, बॅडमिंटन, बुद्धीबळ यासाठी प्रशिक्षण दिले जाते. यामुळेच स्कुलच्या विद्यार्थ्यांनी या विविध क्रिडा प्रकारातील स्पर्धांत शाळेचे नाव उंचावलेले आहे. विशेष बाब म्हणजे शाळेच्या बॅन्ड पथकाने आंतर शालेय स्पर्धेत कित्येकदा सहभाग नोंदविला आहे आणि प्रत्येक वेळी पारितोषिकही पटकाविले आहे.

शाळेतील इतर उपक्रमांविषयी सांगा ?
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना विकसित करणे हे शाळेचे प्राथमिक कर्तव्य आहे, त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. शाळेतर्फे नाटके बसवणे, गीत सादरीकरण, नृत्य शिकविले जाते. आंतरशालेय स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी दिली जाते. यासह शाळेतर्फे आयोजित केले जाणारे गणेशोत्सव, क्रिडा दिन, सांस्कृतिक कार्यक्रम‍ांत, बालदिनी, शिव जयंती तसेच थोर पुरूषांच्या स्मृती निमित्त आयोजित करणाऱ्या येणाऱ्या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जाते.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी काही खास आयोजन केले जाते का ?
शाळेच्या विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना ‘सायन्स ऑलिपिंयाड फाऊंडेशनमध्ये मध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सायबर सायन्स सारख्या विषयांची तयारी करून परीक्षेसाठी बसविले जाते. विद्यार्थ्यांमधील कुतूहलाला प्रोत्साहन देण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यासाठी, ऐतिहासीक स्थळी, तसेच विविध प्रदर्शन, अनेकविध संग्रहालयांच्या ठिकाणी भेटींचे आयोजित केले जातात. जेणे करून विद्यार्थ्यांचा आवाका वाढावा. विविध कार्यशाळांचेही आयोजनही केले जाते. यामध्ये व्यक्तीमत्त्व विकास, तणाव विरहीत अभ्यास पद्धती, मातीकाम कला, हस्त-शिल्पाच्या कार्यशाळा वेळोवेळी आयोजित केल्या जातात.
आजचे विद्यार्थी उद्याचे सूजाण नागरीक आहेत, म्हणूनच विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृती विषयीही अवगत केले जाते, जसे ‘प्लास्टीक वापरू नका, पर्यावरण स्वच्छ ठेवा, स्वच्छ अन्न खा, अशा मोहीमांव्दारे विद्यार्थ्यांना तोटे फायदे समजविेले जातात, जेणे करू ते आपल्या दिनचर्येत हे उतरवतील. . माफक शैक्षणीक शुल्क हेही स्कुलचे वैशिष्ट्य आहे. होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना या शुल्कातही सवलत दिली जाते.

शाळेबद्दल आणखी काय सांगाल ?
स्कुलच्या या दीर्घ वाटचालीतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज परदेशात स्थायीक झाले आहेत. विविध क्षेत्रात आणि मानांच्या अशा ठिकाणी चांगल्या पदावर कार्यरत आहेत. या शाळेला विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांनी भेटी दिल्या आहेत. विशेषत: महाराष्ट्रातील संसद सदस्यांना दिल्लीतील मराठी शाळेविषयी नेहमीच अप्रुप वाटते. याशाळेने राजपथावरील पथसंचलनातील सांस्कृतीक कार्यक्रमात नेहमीच अग्रणी भुमिका घेतली आहेत. त्यामध्ये पुरस्कारही पटकाविले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनातील लेझीम पथकाला १९८९ मध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. तर 1991मध्ये मशीनड्रील सादरीकरणाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. 2006 मध्ये प्रजासत्ताक दिनी संचलनात ग्रामस्वच्छता अभियानावर सादरीकरणाची संधी शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे.
चौगुले पब्लिक स्कुलने महाराष्ट्राची सांस्कृतीक पंरपरा येथे देशाच्या राजधानीतही जोपासली आहे. लेझीम या खेळामध्ये चौगुलेने आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे. आज दिल्लीत कुणालाही लेझीम शिकायची असेल तर आमच्या शाळेकडेच विचारणा केली जाते.
या शाळेने ख-या अर्थाने विविधतेत एकता जोपासली आहे. येथे सर्वच स्तरातील विद्यार्थीं आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना मराठी शिकविले जाते. हिंदी शिवाय आणखी एक क्षेत्रीय भाषा शिकत आहेत हे विशेष. या माध्यमातून माय मराठीची सेवा करण्याचे भाग्यही आम्हाला मिळत आहे

- अंजू निमसरकर-कांबळे,
माहिती अधिकारी
9899114130
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा