महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
हिंगलजवाडीत घडली राष्ट्रीयस्तरावरील उद्योजिका...! सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

कमल कुंभार यांना ‘वुमन ट्रान्सफार्मींग ऑफ इंडिया’ सन्मान

उस्मानाबाद जिल्ह्यातील अगदी छोटेसे गाव हिंगलजवाडी या गावातील एक महिला, स्वत:च्या कार्य कर्तत्वाच्या जोरावर घरातील दारिद्र्यावर मात करित आज आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या उत्कृष्ठ सन्मानाने सन्मानित होत आहे. त्यांचा प्रवास नक्कीच ग्रामीण भागातील महिलांना प्रेरणादायी आहे. स्वत:च्या विकासासाठी तर प्रत्येक जण धडपडतच असतो पण आपल्या स्वयं विकासाबरोबरच आपण समाजाचे काही ऋणी आहोत, या भावनेतून इतरांचाही पर्यायाने समाजाचा विकास करणारे हे थोडेच. ही विचारधारा घेवून स्वयंप्रेरणेने एक महिला स्वत: तर आत्मनिर्भर बनतेच पण आपल्या जवळ जवळ चार हजाराहून आधिक भगिनींना स्वत:चा पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनवते. ती स्वयंपुर्ण व्यक्ती म्हणजे श्रीमती कमल कुंभार…
नुकतेच त्यांना दिल्ली मध्ये केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या वुमन ट्रान्सफार्मिंग इंडिया-2017 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापुर्वी 27 एप्रिल 2017 ला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते देशातील उत्कृष्ठ महिला शेतकरी उद्योजक म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या प्रवासाविषयी केलेला संवाद….

प्रश्न - आपल्याला राष्ट्रपतीच्या हस्ते तसेच नुकताच केंद्र शासनाच्या निती आयोगाचा शेतीपूरक व्यवसायामधील कडकनाथ कोंबडी पालनाबद्दल ‘वुमन ट्रान्सफार्मींग ऑफ इंडिया’ या सन्मानाने सन्मानित करण्यात आले याविषयी आपण काय सांगाल ?.
 उस्मानाबाद सारख्या मराठवाड्यातील एक छोटाश्या शहरामधून प्रथमच मी दिल्ली येथे हा सन्मान घेण्यासाठी गेले होते. मला सन्मान मिळाल्याने खुप आनंद झाला, पण हा सन्मान देशपातळीवर सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामांचे चीज झाले याचा जास्त आनंद झाला. विशेष: मी खेड्यातील वातावरणातून मी देशपातळीवर एक शेतकरी उद्योजक म्हणून समोर आले. आयुष्याचा सर्वांत आनंदाचा हा क्षण आहे.

आपल्या शिक्षणाविषयी सांगा ?
माझे शिक्षण 10 वी पर्यंत झाले असून ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर जवळ हिंगलजवाडी या गावातील महाराष्ट्र संत विद्यालय येथे झाले आहे.

या व्यवसायाची सूरवात कशी झाली आणि हा व्यवसाय करण्याची प्रेरणा आपणास कशी मिळाली ?
1999 साली मी हिंगलजवाडी यागावात प्रथम बचत गटाची स्थापना केली. त्यासाठी मला स्वयंशिक्षण संस्थेचे मार्गदर्शन लाभले. यापुर्वी मी अंगणवाडी सेवीका म्हणून सहा महिने काम केले होते. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मी दुस-याच्या शेतावर शेतमजूर म्हणून रोजाने शेतात काम करत होते. पण यावर आमची रोजीरोटी भागत नव्हती. बचत गटातील सहभागामुळे तसेच अनुभव, कार्यशाळा, मेळावे, यामधुन शेती विषयक विविध पुरकव्यवसायांची माहिती मिळाली. यामध्ये घरच्यांनी विशेष: आई-वडीलांनी मला खुप सहकार्य केले.

शेतीपुरक उद्योगामधून महिलांना सक्षम बनवण्यात आपला अनुभव कसा आला ?
शेतीपुरक उद्योगामध्ये सेंद्रीय शेती (1 एकर मॉडेल) यांअंतर्गत मी सुरवातील माझ्या शेतात प्रयोग केला यामध्ये मूग, साळ, तीळ, भगर, मूग यासारखे वेगवेगळे पिके घेतली यासाठी घरातीलच बियाणे वापरले तसेच सेंद्रीय खताचा वापर केल्यामुळे बियाणे आणि खतांवर होणारा खर्च खुप कमी आला. यामधून मला ती शेती आर्थिक दृष्ट्या फायद्याची ठरली. आता हे मॉडेल मी इतर बचत गटामार्फत महिलांना राबविण्यास सांगत आहे. जोडीला मी शेळीपालन, तसेच लग्ण समारंभात लागणारी घोडी हीचेही पालन करत आहे. यामधून महिन्याला मला साधारण: 2 लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.

कडकनाथ कोंबडी या कुक्कुटपालन व्यवसायाविषयी काय सांगाल ?

कडकनाथ कोंबडीचे वेगवेगळ्या आजारावर या कोंबडीची अंडी, मांस उपयोगी आहे. यामुळे बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात या कोंबडीच्या अंडी व मांसाची मागणी भरपूर प्रमाणत आहे. ही कोंबडी तुळजापूर येथील कृषि विज्ञान केंद्राने विकसीत केलेली प्रजात असून प्रथम मी या कोंबडीचे पालन केले होते. यासाठी मला कृषि विज्ञान केंद्र तुळजापूर यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती. या कोंबडीला सध्या कोल्हापूर, अमरावती, परभणी , मुंबई, या ठिकाणी मागणी आहे. या कोंबडीची एक अंडे 50 रुपयाला विकले जाते. तर 1 जिवंत कोंबडा 1 हजार पाचशे ते 2 हजार पर्यंत विकला जातो. यामधुन महिन्याला 1 लाख 50 हजार पर्यंत उत्पन्न मिळते. आणि उत्पादन खर्च साधारण मला 50 हजारांपर्यंत येतो.

आपण हा खडतर प्रवास करतांना अडचणीवर मात कशी केली ?
 मी सुरवातीला स्वत: पासून शेती करण्याची सुरुवात केली. प्रथमत: मी 1 एकरवर प्रयोग केला. यानंतर करार पध्दतीवर शेती घेवून या ठिकाणी कुक्कुट पालन व शेळी पालनाचे प्रकल्प उभारले . या मध्ये प्रामुख्याने मजुरांची अडचण येते. तसेच घरातून सर्वांनी सहकार्य केल्यामुळे विशेष अडचणी जाणवल्या नाहीत. गरीबीही एक अडचण होती ती मी माझ्या कष्ठ आणि प्रयत्नातुन सोडवीली.

अन्य शेती पुरक आणखी कोणते व्यवसाय करता ?
शेतीपुरक व्यवसायांमध्ये मी उस्मानाबादी शेळीचे पालन करत आहे. यामधुन मला महिन्याला साधारण: दोन लाखांचे उत्पन्न मिळते.

ग्रामीण महिलांना कोणता संदेश द्याल  ?
मी ग्रामीण भागातील महिलांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करते . शासन खुप चांगल्या प्रकारे ग्रामीण भागातील शेतक-यांना मदत करत आहे. फक्त आपण स्वत: या यंत्रणेपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण घ्यावे. सर्व जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक MSRLM केंद्राचा लाभ घेण्याचेही आवाहन यावेळी मी करते. आपण स्वत: यंत्रणेपर्यंत गेलो की आपल्यालाही प्रतिसाद मिळेल पण आपली भावणाही सकारात्मक हवी. शेळीपालन, कुक्कुटपालन या विषयी मार्गदर्शन हवे असेल तर माझ्याशी भ्रमणध्वनीवर (7038879434) या क्रमांकावर संपर्क साधावा.

- श्रीमती मीरा ढास, सहाय्यक संचालक (माहिती),
विभागीय माहिती कार्यालय, लातूर


'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा