महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
भावी पिढीचे सर्वांगीण प्रशिक्षण आणि पुनर्वसन हे सेवाव्रत्त- शांतीलाल मुथा बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७
नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या मुलांना शैक्षणिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवून भावी आयुष्यात आपल्या पायावर सर्वार्थाने उभं राहण्याचं बळ पुण्यातील शांतीलाल गुलाबचंद फाऊंडेशन गेल्या 25 वर्षापासून करीत आलेले आहे. मेंटल हेल्थ विभागाची स्थापना करून विशेष मार्गदर्शन, राज्य सरकारच्या मूल्यवर्धन कार्यक्रमाची व्याप्ती 107 तालुक्यातील 20 हजार शाळांमधून दहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात शांतीलाल मुथा यांचा महत्वाचा सहभाग आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसाठी ते ही सेवा विनामूल्य करीत आहेत.

मुलांची शैक्षणिक प्रगती आणि 73 हजार 625 मुलींचं स्मार्ट बालिका उपक्रमांतर्गत सशक्तीकरण करण्यात आले. आपत्तीत सापडलेल्या चार हजार मुलांचं शैक्षणिक आणि मानसिक पुनर्वसन केल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकतेच दिल्ली येथे राजीव गांधी मानवसेवा या पुरस्काराने व्यक्तीगत सेवाभावी कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानिमित्ताने शांतीलाल मुथा यांच्याशी केलेला संवाद.

प्रश्न : बालकांसाठी केलेल्या उत्तम कार्यासाठी आपणाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, यावेळी आपल्या भावना काय होत्या ?
उत्तर : गेल्या 25 वर्षांपासून भूकंपग्रस्त, त्सुनामीग्रस्त, आपद्ग्रस्त, आदिवासी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे शैक्षणिक पुनर्वसन त्याचबरोबर त्यांना मानसिक धक्यातून सावरण्याचे काम आमच्यामार्फत करण्यात आले. या कार्याची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. याबद्दल राजीव गांधी मानवसेवा पुरस्काराने व्यक्तीगत सेवाभावी कार्याचा गौरव झाला, याबद्दल मला आनंदच वाटतो.

प्रश्न : मुथा फाऊंडेशन बालकांच्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे सहकार्याच्या स्वरुपाचं सेवाभावी काम करते?
उत्तर : 1993 सालापासून भारतात ज्या ज्या ठिकाणी भूकंप, त्सुनामी, पूर अशा प्रकारची संकटे आली आहेत अशा सर्व ठिकाणी मुलांना त्या संकटातून बाहेर काढून त्यांचे शिक्षण बंद पडू नये म्हणून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यात आले आहे.

यामध्ये प्रामुख्याने 1993 मध्ये लातूर भूकंपातून 1200 मुलांना पुणे येथे आणून त्यांचे इयत्ता पाचवी ते पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांना स्वावलंबी बनविण्याची संधी आम्हाला मिळाली. 1997 पासून आजतागायत महाराष्ट्रातील आदिवासी दुर्गम परिसरातील मेळघाट व ठाणे-कोसबाड भागातून मुलांना पुणे येथे आणून त्यांचे इयत्ता पाचवी ते 12 वी पर्यंतचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यात येत आहे.

2001 मध्ये गुजरात मधील भूकंपग्रस्त भागात केवळ 90 दिवसात 368 शाळांच्या Semi-Permanent स्वरुपातील इमारतींची उभारणी करून एक लाख विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

2004-05 मध्ये अंदमान निकोबारमधील सुनामीग्रस्तांसाठी विविध बेटांमध्ये उध्वस्त झालेल्या शाळांची पुनर्बांधणी करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच 2005 च्या जम्मू-काश्मीर भूकंपग्रस्त भागातील 500 आपद्ग्रस्त मुलांना पुणे येथे आणून त्यांना सहकार्य करण्याची संधी मिळाली.

विशेष करुन मला येथे नमूद करावेसे वाटते, महाराष्ट्रात निर्माण झालेल्या शेतकरी आत्महत्यांमुळे त्यांच्या मुलांचं शैक्षणिक आणि मानसिक पुनर्वसन करण्याचे काम 2013 पासून महाराष्ट्रात हाती घेण्यात आले आहे. आत्महत्या केलेल्या या शेतकऱ्यांच्या 650 मुला-मुलींना संपूर्ण महाराष्ट्रातून पुणे येथे आणून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यात येत आहे.

अशाप्रकारे वरील सर्व नैसर्गिक आपत्तीमध्ये बालकांसाठी 25 वर्षे सातत्याने कार्य करण्याची आम्हाला ऊर्जा मिळाली आहे.

प्रश्न : सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा आपणास कशी मिळाली ?
उत्तर : माझा जन्म बीड जिल्ह्यातील डोंगरकिन्ही या अतिशय छोट्या गावामध्ये झाला. घरची आर्थिक परिस्थती अतिशय बेताची, सहा महिन्यांचा असतानाच आईचे आकस्मिक निधन झाले. बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा असल्यामुळे तेथील ऊस तोडणारे कामगार प्रवरानगर साखर कारखान्यावर जात असताना त्यांच्याबरोबर प्रवरानगर साखर कारखान्यावर जाऊन त्यांचे वडील त्या छोट्या वस्तीमध्ये किराणा दुकान चालविण्याचे काम करीत होते.आईचे निधन झाल्यामुळे शांतिलाल मुथ्था यांचे 11 वी पर्यंतचे शिक्षण बीड जिल्ह्यातील कडा येथे अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळ या वसतिगृहामध्ये झाले. वसतिगृहामध्ये शिक्षण घेत असताना जैन समाजातील मोठ्या विवाह सोहळ्यामध्ये वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांना वाढपी म्हणून बोलाविले जात होते व त्यातून वसतिगृहाला देणगी मिळत होती. अशाप्रकारच्या मोठ्या लग्नसोहळ्यातील वाढपीचे काम त्यांनी चार वर्षे केले. त्यावेळी जैन समाजातील विवाहप्रसंगी होणारा अवाढव्य खर्च पाहून त्यांचे मन विचलित होत होते. त्याच वेळी त्यांनी लग्नातील खर्च कमी करण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार केला. यानंतर मी महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे येथे आल्यानंतर वसतिगृहात प्रवेश घेऊन खाजगी नोकरी करत 1976 साली बी.कॉम. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भांडवल न लागणारा इस्टेट एजेंटचा व्यवसाय सुरु केला. त्यातून जनसंपर्क वाढल्यामुळे त्यांनी बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. 7-8 वर्षे बांधकाम व्यवसाय अतिशय सचोटीने केला. त्यानंतरही बांधकाम व्यवसायात संधी उपलब्ध असताना वयाच्या 31 व्या वर्षी आयुष्यभर सामाजिक कार्य करण्याचा निर्धार करून व्यवसायातून निवृत्त झाले.

प्रश्न : आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याविषयी थोडक्यात सांगा ?
उत्तर : सन 2003 मध्ये भारतातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी व मूल्य शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला. यासाठी Accreditation, शिक्षक प्रशिक्षण, मुख्याध्यापक प्रशिक्षण, पालक व इतर घटकांबरोबर संवाद असे वेगवेगळे मोड्यूल्स तयार करून महाराष्ट्र, गोवा, अंदमान-निकोबार, गुजरात, मध्यप्रदेश, मेघालय या राज्य सरकार बरोबर करार करून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ठोस काम करण्याची संधी प्राप्त झाली. या सर्व अनुभवातूनच मूल्य शिक्षणावर आधारित मूल्यवर्धन या कार्यक्रमाची निर्मिती 2009 मध्ये झाली. बीड जिल्हा परिषदेच्या 500 शाळांतील 35 हजार विद्यार्थ्यांबरोबर या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली. सात वर्षात या कार्यक्रमाचे Impact Assessment, NCERT, Cambridge University व Oregon University यांच्या माध्यमाने करण्यात आले. यावरून विद्यार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडत असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व अनुभवावरून 2015 मध्ये मूल्यवर्धनचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने मूल्यवर्धन कार्यक्रमाचा आराखडा व इयत्ता पहिली ते चौथीच्या कृती पुस्तिका याचे अवलोकन करून त्यास मान्यता दिली. 2016 पासून 34 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका केंद्रात सुरु करण्यात आला. एका वर्षात याचे मोठ्या प्रमाणावर बदल दिसून आल्यामुळे 2017 मध्ये राज्य सरकारने मूल्यवर्धन कार्यक्रमाची व्याप्ती 107 तालुक्यातील 20 हजार शाळांमधून दहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. या कामी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन शासनाला विनामुल्य सहकार्य करीत आहे. मूल्यवर्धन हा कार्यक्रम म्हणजे जिल्हा परिषद शाळांतील मोठे परिवर्तन ठरणार आहे. महाराष्ट्रा बरोबरच गोवा राज्याच्या सर्व शासकीय व खाजगी शाळांमध्ये मूल्यवर्धन दोन वर्षांपासून सुरु आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातील जिल्हा परिषदेच्या शाळांतून यशस्वी झालेला हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे.

प्रश्न : भारतातील बालकांच्या कोणकोणत्या समस्येवर आणखी काम होणं अपेक्षित आहे ?
उत्तर : संपूर्ण भारतामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने दरवर्षी एक लाख लोक आत्महत्या करतात. म्हणजेच याचा अर्थ भारतामध्ये अंदाजे दोन लाख मुला-मुलींनी स्वतःच्या वडिलांची आत्महत्या बघितलेली आहे. अशा परिस्थितीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या कोणकोणत्या समस्या असतात हे जाणून घेऊन मोठ्याप्रमाणावर संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. त्यावरून असे निदर्शनास आले आहे की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं खूपच जास्त तणावाखाली असतात. त्यांना योग्य पद्धतीने हाताळणे आवश्यक आहे. कारण जागतिक संशोधक असे सांगतात की अशा मुलांच्या पैकी 1/3 मुलं आत्महत्या करण्याची शक्यता असते. अशा वेळी या मुलांच्या संदर्भातील सर्वात मोठा गहन प्रश्न आहे असे माझे मत आहे.

या प्रश्नाच्या खोलवर गेले असता, यावर आपणच कार्य केले पाहिजे हा विचार करून आम्ही ‘मेंटल हेल्थ डिपार्टमेंट’ची स्थापना आमच्या वसतिगृहामध्ये केली. मेंटल हेल्थचा एक आराखडा तयार करण्यात आला, पुण्यातील मानसोपचारतज्ञांची नियुक्ती करण्यात आली, त्यांना यामध्ये 2-3 वर्षे कशाप्रकारे काम करावयाचे आहे याची सविस्तर आखणी करण्यात आली. मानसोपचारतज्ञांच्या वसतिगृहात भेट आयोजित करण्यात आल्या, प्रत्येक मुलाची एक फाईल तयार करण्यात आली, सर्व मुलांच्या प्रगतीचा सातत्याने मागोवा घेतला जात आहे. संशोधनासाठी हा डाटाबेस वापरला जात आहे. यातून अनेक अनुमान काढण्यात येत आहेत. हळूहळू याचे सर्व अहवाल तयार होत आहेत. प्रत्यक्ष कार्याचा अनुभव विचारात घेऊन या सर्व संशोधनाचा पुढील काळात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना या मोठ्या संकटातून बाहेर काढण्याची नीती आखण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांना सोपे जाईल.

- मीरा ढास
सहायक संचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय, लातूर
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा