महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
विदर्भातील पारंपरिक मत्स्यव्यवसायाला गती देऊन राज्यातील मासळीची आयात बंद करायची : महादेव जानकर सोमवार, ११ जून, २०१८
महाराष्ट्राच्या विस्तीर्ण समुद्र किनारपट्टीनंतर गोड्या पाण्यातील मासेमारी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे अशा प्रदेशातील मासेमारीचे संरक्षण करण्यासंदर्भात राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी चंद्रपूर येथे केले. ते चंद्रपूर येथे आले असता त्यांनी विदर्भ दौऱ्यामागील कारण विषद करताना पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमध्ये विदर्भात मोठ्या प्रमाणात काम होऊ शकते, अशी आशा व्यक्त केली.

गोड्या पाण्यातील मत्स संवर्धनाची पारंपरिक पार्श्वभूमी असणाऱ्या चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये या व्यवसायाला गती देण्यासाठी राज्य शासनाने आराखडा तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूक्ष्म नियोजनात आगामी काळामध्ये पूर्व विदर्भातील पाण्याचे साठे असणाऱ्या भागात मत्स्यव्यवसायाला सोन्याचे दिवस येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेतील काही प्रश्न उत्तरे...

प्रश्न : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय व मत्स्यसंवर्धन मंत्र्यांच्या नियमित विदर्भ दौऱ्याचे नेमके कारण काय?
राज्याला मोठ्या प्रमाणात रोजच्या जेवणामध्ये अंडी, दूध आणि मासोळी मोठ्या प्रमाणात लागते. त्यासाठी आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. यासाठी दर महिन्याला साडेचारशे कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडतो. त्यामुळे या खात्याचा मंत्री म्हणून अंडी ,दूध आणि मासोळी उत्पादनात हे राज्य स्वयंपूर्ण करण्याचे आपले ध्येय असून त्यासाठी गोड्या पाण्यातील मासोळीची वाढती मागणी विदर्भातून पूर्ण करण्याचा आराखडा राज्यशासन तयार करत असून यातून विदर्भातील भूजल साठा असणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचाही प्रयत्न राज्य सरकार करणार आहे.

प्रश्नः विदर्भातल्या कोणत्या जिल्ह्यांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे?
प्रामुख्याने भूजलसाठा ज्या भागांमध्ये आहे त्या भागाला मत्स्यव्यवसायामध्ये प्राधान्य दिले जाईल. तर अन्य भागांमध्ये दुग्ध उत्पादन आणि पोल्ट्री उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागपूर विभागामध्ये अर्थात पूर्व विदर्भामध्ये भूजलसाठा मोठ्या प्रमाणात आहे. विशेषत: धान उत्पादक शेतकऱ्यांना पारंपरिक मामा तलावाचा वापर मत्स्यव्यवसायाला करता येण्यासारखा आहे. याशिवाय या भागातील मोठ्या नद्या व काही तलाव व धरणे यामध्ये देखील मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यासाठीच या भागातील पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या अनेक संघटनांची चंद्रपूरमध्ये बैठक घ्यायला आपण स्वतः आलो असून दर महिन्याला किमान दोनदा या भागात येऊन आढावा घेण्याचा मानस आहे.

प्रश्नः चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या प्रकल्पात कशाप्रकारे मदत करीत आहेत?
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळेच पदुम सारख्या खात्याचे बजेट 350 कोटीवरून 1200 कोटी पर्यंत वाढले आहे. सुधीरभाऊ म्हणजे प्रचंड क्षमता असणारे ऊर्जावानमंत्री आहेत. त्यांचा पाठपुरावा मंत्र अफलातून आहे. एकदा हाती घेतलेल्या कामाचा किती पाठपुरावा करावा यासाठी सुधीरभाऊंची तमाम महाराष्ट्रात आठवण केली जाते. विदर्भाच्या लोकांना सुधीरभाऊच्या रूपाने एक मोठे नेतृत्व भेटले आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या महत्त्वाच्या खात्यामुळे विदर्भात मोठ्या प्रमाणात अनेक प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मत्सव्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वात आम्ही प्रयत्न करीत आहोत.

प्रश्नः चंद्रपूर जिल्ह्यासाठी आपल्या मंत्रालयातर्फे भविष्यातील नेमके नियोजन काय आहे?
मत्स्यव्यवसायामध्ये चंद्रपूर जिल्ह्याला भरपूर वाव आहे. याठिकाणी मत्सव्यवसायिकांचे चांगले संघटन असून अनेक तरुण सक्रियपणे या व्यवसायामध्ये नवनवीन प्रयोग करीत आहेत. यापैकी 200 तरुणांचा एक गट तयार करून त्यांना आम्ही प्रशिक्षित करणार आहोत. त्यांना व्यवसायाचे आधुनिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. चंद्रपूरमध्ये मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. अशा प्रकारचे केंद्र हे महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील पहिले केंद्र आणि गोड्या पाण्यातील एकमेव केंद्र असेल. या ठिकाणी मत्स्य व्यवसायाचे संशोधन आणि प्रशिक्षण दिल्या जाईल. या संशोधन केंद्रामध्ये वेगवेगळ्या मत्स्यबीजांची निर्मिती ते गोड्या पाण्यातील मासळीचा विक्री केंद्र पर्यंतच्या सर्व विषयांवर प्रशिक्षण मिळेल. अशा प्रकारचे नियोजन करण्यात येत आहे. या भागात बंद पडलेले मत्सबीज निर्मिती केंद्र सुरू करण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन ज्या ठिकाणी आहे त्या भागामध्ये आधुनिक पद्धतीचे फिश मार्केट उभारण्याचे देखील नियोजन आगामी काळात केले जाणार आहे. याशिवाय चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या नद्यांच्या प्रवाह लक्षात घेतात आधुनिक पद्धतीच्या बोटींना अनुदानावर देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत.

प्रश्न :चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्र कुठे उभारण्याबाबत विचार सुरू आहे?
यासंदर्भात पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पाण्याचा मुबलक साठा असणाऱ्या भागामध्ये हे केंद्र उभारले जावे अशी सूचना आपणही केली आहे. गोड्या पाण्यातील मासोळी उत्पादन, मत्स्यबीज उत्पादन व अन्य व्यवसायाच्या शिक्षणाचे महाराष्ट्रातील हे एकमेव केंद्र असेल .त्यामुळे आगामी काळात हे केंद्र उभे झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातील तरुणाला मत्स्य व्यवसायात आपले करिअर करायचे असेल तर त्याला या ठिकाणी योग्य प्रशिक्षण मिळाले पाहिजे अशा पद्धतीची रचना या केंद्राची करणार आहे. एखाद्या विद्यापीठाप्रमाणे या ठिकाणच्या प्रशिक्षणाला महत्त्व राहील व त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात मत्स्य व्यवसायाला चालना मिळेल असे नियोजन आम्ही करीत आहोत .या ठिकाणी एखाद्या चांगल्या विश्रामगृहाची निर्मितीदेखील करावी, अशी सूचना मी केली आहे. यामुळे प्रशिक्षकांना देखील योग्य सुविधा मिळतील.

प्रश्न : किती दिवसांमध्ये मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्राला चंद्रपूर मध्ये सुरुवात होऊ शकते?
यासंदर्भात महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर व मत्स्यव्यवसाय आयुक्त मुंबई यांच्यामार्फत या भागात अशा पद्धतीच्या केंद्राची आवश्यकता आहे का ? व त्यातून या भागातील मत्स्यव्यवसायाला नेमकी कोणती दिशा मिळेल ? खरोखर केंद्राची आवश्यकता आहे का ? याबाबतचा अभ्यास केला होता. अभ्यासाअंती या भागातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन हे केंद्र शेतकरी व मत्स्यव्यवसाय उत्पादकांना आर्थिक स्त्रोताचे माध्यम बनू शकते असे लक्षात आले. त्यामुळे यासंदर्भात निर्णयाप्रती आल्यावर राज्य शासनाकडे मत्स्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्ताव पाठवला आहे .यावर लवकरच निर्णय होईल, अशी अपेक्षा असून आठ ते दहा महिन्यांच्या विक्रमी वेळेत याबाबतची कार्यवाही पूर्ण होईल अशी अपेक्षा आम्ही करीत आहोत. त्यासाठी आमची धडपड सुरू आहे.

प्रश्न: मत्स्यव्यवसायाला आकार देताना बँक किंवा अन्य पतसंस्थांमार्फत कर्ज मिळत नसल्याची समस्या आहे त्यामुळे मत्स्यव्यवसायाला उद्योगाचा किंवा शेतीचा दर्जा देण्याबाबतची मागणी कायम होत असते. या संदर्भात आपण काही निर्णय घेतला आहे का?

अतिशय योग्य प्रश्न आहे, आणि मला सांगायला आनंद होतो की, या खात्याचा मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याबाबत माझा प्रयत्न आहे. लवकरच फिशरीला कृषी व्यवसायाचा दर्जा राज्य शासनाकडून दिला जाईल, अशी आपल्याला आशा आहे. त्यामुळे व्यवसायात येणाऱ्या तरुणांना कर्ज मिळण्यास मदत होईल.

प्रश्न : विदर्भात आपल्या विभागामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमाबद्दल आपल्या काय भावना आहे ?
शेतकरी आणि त्यांच्या समस्या याचा जवळून अभ्यास असल्यामुळे आणि गरिबीचे चटके काय असते हे माहिती असल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविणे किती आवश्यक आहे. याची जाण आपल्याला आहे. विदर्भामध्ये शेतकऱ्यांना आश्वासक अशा जोडधंदा देण्याची गरज आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादन, मत्स्यव्यवसाय, पोल्ट्री फॉर्म अशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करणे व त्यांच्या अर्थार्जनात दुपटीने वाढ करणे हे आपले लक्ष असून विदर्भातील जनता त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब व सुधीरभाऊ मुनगंटीवार हे अतिशय आग्रही आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात धवलक्रांती, निलक्रांती आकारास येत असल्याचे लवकरच दिसून येईल. शिवाय ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी काम करायला मिळत असल्याचा खरोखर आनंद होत आहे. त्यामुळे विदर्भातील कामाबद्दल मी अतिशय समाधानी आहे.

-प्रवीण टाके
जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा