महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
प्रसार माध्यमांमध्ये महिलांना उत्कृष्ट संधी- वैशाली आहेर शुक्रवार, १२ मे, २०१७
श्रीमती वैशाली आहेर या गेल्या नऊ वर्षांपासून एका साप्ताहिकाच्या कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत. एक महिला स्वत:च्या हिमतीच्या जोरावर यशस्वी संपादक म्हणून कसे प्रभावी कार्य करु शकते, हे त्यातून समजते. दिवसेंदिवस प्रसार माध्यमे झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे मुलींना, महिलांना प्रसार माध्यमांमध्ये उत्कृष्ट संधी आहे, असे त्या सांगतात. त्यांची घेतलेली नेटभेट...

पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल आजपर्यंत वैशाली आहेर यांना जिजाऊ पुरस्कार, पुणे, अहिल्या पुरस्कार, नाशिक, जीवनाश्रम फाऊंडेशन, अ.भा. नवोदित साहित्य संमेलन तुळजापूर, उमेद पुरस्कार, मीनल फाऊंडेशन पुरस्कार, भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचा पुरस्कार, शारदा बहुउद्देशिय संस्था, नाशिक, एम.जे. एफ. दि प्राईड ऑफ महाराष्ट्र, आदर्श महिला संपादिका पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

श्रीमती आहेर यांच्या जीवनात आलेले विदारक अनुभव त्यांच्याच शब्दात... औरंगाबादहून आम्ही पुणे येथे आलो..सुरुवातीला छोट्या मोठ्या कंपनीत काम करत असताना स्वत:चा व्यवसाय करण्याची कल्पना आमच्या मनात आली ..आणि आम्ही स्टेशनरी, झेरॉक्स, असा छोटा व्यवसाय सुरु केला..रात्रंदिवस मेहनत करत असताना काही दिवसातच आमचा छोटा व्यवसाय मोठा झाला. पुणे जिल्ह्यात 24 तास सेवा देणारे आमचं एकमेव दुकान होतं. व्यवसाय स्वत:चा होता पण जागा भाड्याची होती. ध्यानीमनी नसताना अचानक 2004 ला आमच्या दुकानाच्या शेजारीच जागेच्या मालकाने आमच्या व्यवसायाची कॉपी केली अन् व्यवसाय सुरु केला. पूर्वसूचना न येता एका दिवसात आम्ही रस्त्यावर आलो. तरीही न डगमगता आम्ही दुसऱ्या ठिकाणी व्यवसाय सुरु केले. तिथेही तीच पुनरावृत्ती झाली. मग मात्र एका वर्षात झालेल्या या दोन भयंकर आघातांनी आम्ही पूर्णपणे खचलो.....काहीच पर्याय दिसत नव्हते, काही सुचत नव्हतं. नातेवाईकांनी पाठ फिरवली. आत्महत्येचे विचार मनात येऊ लागले. मे महिन्याच्या सुट्टीत मुलांना गावी पाठवलं आणि आम्ही आत्महत्या करायच ठरवलं. एका मित्राला सांगून रात्री एक वाजता घर सोडून आम्ही निघालो. कुठे जायचं, काय करायच, काहीच मार्ग नव्हता...दुर कुठेतरी जायचं. मेलो तरी कोणाला दिसायचं नाही एवढच मनात होतं. घर सोडलं ..पुणे स्टेशनला आलो.. कन्याकुमारी गाडीत बसलो, बुद्धी भ्रष्ट झाली होती. तिकडे गेल्यावर मरण्यापूर्वी मुलांचा आवाज ऐकावा वाटला म्हणून गावी फोन केला, मुलांच्या आवाजाने आतडे तुटत होते. माझा पाच वर्षांचा मुलगा रडत रडत बोलत होता, आई लवकर ये..ना.. तुझी खूप आठवण येतेय. त्याचं बोलणं ऐकून मी तर कासाविस झाले होते...कदाचित नियतीला आमचं मरण मान्य नसावं....

आम्ही मुंबईला बाई-नानां (आई-बाबा) कडे आलो.... झाला प्रकार आई वडिलांना सांगितला..त्यावेळेस वडील खूप रागावले आणि म्हणाले, "मी जीवंत आहे तोपर्यंत कुठेही जाल तेव्हा मला सांगून जायचं ..मी तुमच्या पाठिशी आहे. झालं गेलं विसरुन नवीन आयुष्य जगा" वडिलांच्या या आपुलकीच्या शब्दांनी जगण्याचं बळ मिळालं...आम्ही मुंबईत स्थायीक झालो...आई वडिल माझ्या मुलांना सांभाळत होते. मुंबईत नव्याने संसाराला सुरुवात झाली...पण..आमचं कुटूंब पूर्णपणे विस्कळीत झालं होत .!!..मिस्टरांच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता. त्यांना काहीच करायची इच्छा राहिली नव्हती...त्यांनी घराबाहेर जाणंच बंद केलं. सहा महिने ते घराबाहेर पडलेच नाहीत...मी छोटीमोठी काम करुन घर चालवत होते. दोन/तीन वर्षांचा काळ खूप अवघड गेला. ते दिवस शब्दात व्यक्त करणं शक्यच नाही..वनवास कमी होत होता. आमच्या अथक परिश्रमाने आणि परमेश्वर कृपेने 2009 मध्ये आमचे "रामदीप" वृत्तपत्र सुरु झाले. खरे, पण ते समाजापर्यंत पोहोचवणं तेवढं सोपं नव्हतं. माझे मिस्टर पूर्णवेळ वृत्तपत्रासाठी देत होते. वृत्तपत्र चालू ठेवायचं आणि समाजातील गोरगरिबांना न्याय द्यायचा हे मात्र निश्चित होत. कुटूंब आणि वृत्तपत्र चालू राहण्यासाठी मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. कुटुंब आणि जॉब सांभाळताना खूप संघर्ष होत होता. पण पर्यायही नव्हता. त्यातचं मी जॉब करत असलेली कंपनी पालघरला गेली...आणि मी जॉब सोडला... 2011 पासून पूर्ण वेळ वृत्तपत्राला द्यायचा ठरलं आणि स्वत:च्या वृत्तपत्रात कार्यकारी संपादिका म्हणून मी काम पाहू लागले. त्याचबरोबर रक्तात असलेलं समाजकार्य चालूच होतं.

वृत्तपत्राच्या माध्यमातून खूप लोकांना न्याय देण्यात यश मिळालं. मान्यवरांच्या ओळखी होत होत्या. लेखण, वाचन या आवडीबरोबरच मान्यवरांच्या मुलाखती घेणं ही माझी प्रमुख आवड आहे. म्हणूनच मी 50/55 मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. त्यात नगरसेवक ते मंत्री महोदय, उद्योजक, साहित्यिक, कलाकार अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. पत्रकारिता करताना खूप चांगल्या वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. कधी मान मिळतो तर कधी अपमानही सहन करावा लागतो. पण माध्यम क्षेत्रातील मुलींना मी जाणीवपूर्वक सांगू इच्छिते की, संपूर्ण अभ्यासपूर्वक, निर्भीड राहून, स्वसंरक्षणाने आपण आपलं काम केलं तर कोणीही आपल्याला अडवू शकत नाही... पत्रकारितेबरोबरच समाजातील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचं माझं काम चालूच आहे....ते मी करतच राहील...कारण समाजातील लहान मुली ते सत्तर वर्षांच्या आजीवर होणारे अत्याचार थांबवायचे असतील तर मुलींना स्वसंरक्षण गरजेचं आहे. माझं संघर्षमय जीवन आता कुठे तरी स्थिरावलं आहे...खूप काही नाही माझ्याकडे आणि मला नकोही आहे. पण आहोत तोपर्यंत कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये आणि आपली मेहनत समाजाच्या गरजू लोकांच्या सत्कारणी लागावी एवढीच इच्छा...

समाज आणि शासन यांच्यातील दुवा बनून त्यांचे वृत्तपत्र कार्यरत आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे ही सदिच्छा. वैशालीताई आहेर यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...

- देवेंद्र भुजबळ,
संचालक (माहिती) (वृत्त).
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा