महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
मानवतेच्या बंध जतनाचे लातूर पोलीस प्रशासनाचे बळीराजा सबलीकरण अभियान गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७
ʿ सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ʾ हे ब्रीद वाक्य असणापे महाराष्ट्राचे पोलीस प्रशासन नेहमीच कायदा आणि सुरक्षेच्या बाबतीत अहोरात्र झटत असते. गुन्हेगारीचे निर्मूलन आणि समाजातील विघातक कृतीना आळा घालण्याचे काम होत असतेच . परंतु कायदा आणि सुव्यवस्थेबरोबर समाजातील विविध समस्यांवर उपाय शोधण्याचे काम देखील पोलीस यंत्रणा करीत असते. याचाच भाग म्हणून मराठवाड्यातील लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेले ʿबळीराजा सबलीकरण अभियानʾ मानावे लागेल..

गणेश उत्सव काळात डॉल्बीमुक्त गणेश उत्सव साजरा केला गेला. विविध गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, अन् ʿ बळीराजा सबलीकरण ʾ या अभियानास सढळ मदत केली. गणेश मंडळांनी केलेल्या सहकार्यांनी आणि माणुसकी जपण्याच्या पोलीस प्रशासनाच्या प्रयत्न नक्कीच अभिमान वाटावा असा आहे. बळीराजा सबलीकरण या अभियानाच्या माध्यमातून व पोलीस प्रशासनाच्या मदतीतून आतापर्यंत 23 लाख रुपयाचा निधी जमा झाला आहे. ही एक कौतुकाचीच बाब आहे.

या अभियानाची संकल्पना , अंमलबजावणी व याचा शेतकऱ्यांच्या सबलीकरणात असलेली भूमिका याविषयी डॉ. शिवाजी राठोड यांच्याशी साधलेला संवाद .

प्रश्न :- बळीराजा सबलीकरण हे अभियान राबविण्याची संकल्पना कशी सुचली याविषयी थोडक्यात सांगा ?
गणेशोत्सव व इतर उत्सवामध्ये वाजविण्यात येणाऱ्या डॉल्बी/डी.जे. संदर्भात आवाजाची मर्यादा, होणारे ध्वनी प्रदुषण याबाबतीत मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने गणेश मंडळांचा डॉल्बी/डी.जे.वरील होणाऱ्या खर्चाची रक्कम ही गणेश मंडळांनी त्यांच्या इच्छेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना तसेच शेतकऱ्यांना दयावी या विचारातुन ही संकल्पना उदयास आली आहे.

प्रश्न :- बळीराजा सबलीकरण अभियानास विविध गणेश मंडळांनी कसा प्रतिसाद दिला ?
बळीराजा सबलीकरण अभियानाचे अनुषंगाने गणेश मंडळांनी त्यांच्या इच्छेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना आर्थीक मदत करावी याबाबत त्यांची मानसिकता तयार करणेसाठी समुपदेशन व मार्गदर्शन करणे करीता आम्ही स्वत: लातूर आणि उदगीर येथे गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे समवेत बैठका घेतल्या तसेच लातूर जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांचे मार्फतीनेही बैठका आयोजीत केल्या. त्यामध्ये बहुतांश गणेश मंडळांनी अत्युत्कृष्ट प्रतिसाद दिला.

प्रश्न :- या अभियानाच्या माध्यमातुन जमा झालेल्या रकमेचा शेतकऱ्यांचे हितासाठी कसा वापर करणार आहात ?
जिल्हा परिषदेमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना मदतीसाठी एच.डी.एफ.सी.बँकेमध्ये खाते उघडण्यात आलेले आहे. अभियानाच्या माध्यमातुन जमा झालेली रक्कम ही स्वतंत्र खात्यामध्ये जमा करण्यात येत असून, समितीच्या निर्णयानुसार आत्महत्यागृस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत करण्यात येईल.

प्रश्न :- शासन आणि प्रशासन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी एक सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतुन आणखी कोणते उपक्रम हाती घेऊ इच्छित आहात ?
हुंडा देणे व घेणे हा कायदयाने गुन्हा आहे याबाबत जनजागृती करुन मुलीचे लग्न कमी खर्चामध्ये करणे याबाबत आणि दारु चे दुष्परीणाम याबाबत जनजागृती करणे तसेच समुपदेश करणे असे व ईतर सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतुन उपक्रम आयोजीत करावयाचे विचाराधिन आहे.

प्रश्न :- प्रथमच राज्यात अशा प्रकारच्या अभियानातुन आपण सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. काय सांगाल आपण इतरांना मार्गदर्शनात्मक ?

लातूर जिल्हयातील गणेश मंडळे, स्वयंसेवी संघटना यांनी बळीराजा सबलीकरण अभियानास थोडक्यात ''आमच्या हाकेला'' प्रतिसाद दिला. अभियान यशस्वी करण्याकरीता पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी मेहनत घेतली याचा शेतकरी कुटूंबींयाना निश्चीतच फायदा होईल. या अभियानाच्या यशामुळे जनमानासात पोलीसांप्रती असलेली भावना उज्वल होण्यास मदत झाली आहे. या अभियानाचा सकारात्मक दृष्टीकोन प्रत्येक विभागाने अंगीकारुन प्रयत्न करावे अशी अपेक्षा आहे.

प्रश्न :- शेतकऱ्यांना मानसिक आधार आणि सकारात्मक गोष्टीविषयी काय सांगाल ?
शेतकरी आत्महत्या संदर्भात गांव पातळीवर समुपदेशन होणे गरजेचे असुन त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबुन न राहता जोड व्यवसाय जसे कुकुट पालन, दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, रेशीम उदयोग, नर्सरी, शेवगा लागवड, चंदन लागवड वैगेर सारखे जोड व्यवसाय करणे अपेक्षित आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन मानसीक आधार मिळुन सकारात्मक दृष्टीकोन वृंध्दीगत होण्यास निश्चीत मदत होईल.

प्रश्न :- याअभियानासंदर्भात आणखी कोणाला मदत करायची असेल अथवा मार्गदर्शनासाठी कोठे संपर्क साधावा?
बळीराजा सबलीकरण अभियाना अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना यथोच्छीत मदत करावयाची असेल तर त्यांनी एच.डी.एफ.सी. बँकेत धनादेशाव्दारे मदत करु शकता. अभियानाचे समन्वय अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री मेघमाळे हे काम पाहतात त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8888009071 असा आहे.

- मीरा ढास
सहायक संचालक (माहिती),
विभागीय माहिती कार्यालय, लातूर


'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा