महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार आवश्यक - डॉ. शारदा निर्मळ महाडुंळे सोमवार, ०८ मे, २०१७
आपल्या वेगवान जीवनशैलीमुळे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आपण आपल्या आहाराकडे जितके लक्ष द्यायला हवे, तितके लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतो. म्हणून आपला आहार संतुलित असला पाहिजे, त्यात भाज्या, फळे यांचा पुरेसा वाटा असणे आवश्यक आहे, असे डॉ. शारदा निर्मळ महाडुंळे आवर्जून म्हणतात.

अहमदनगरच्या डॉ.शारदा निर्मळ महाडुंळे या स्त्रीरोग तज्ज्ञ व आहारतज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध आहे. एका वृत्तपत्रातील वर्षभर आहारविषयावर लिहिलेल्या लेख मालेवर आधारित ‘आहारवेद’ हे त्यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. यापूर्वी त्यांची ‘कर्मयोगी’, ‘आयुर्वेदिक’ गर्भसंस्कार, आरोग्यसखी, ‘एकटीच या वळणावर’ अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या‍शिवाय विविध ठिकाणी लेक वाचवा, शिकवा या विषयावर, गर्भसंस्कार या विषयावर, आहार स्वास्थपूर्ण जीवन कसे जगावे, मुलींचे आरोग्य याविषयावर व्याख्याने देत असतात. तसेच त्या विविध नियतकालींकामध्ये आहार व आरोग्य विषयक लेखन नियमितपणे करीत असतात. त्यांच्याशी झालेली ही थेट-भेट

पूर्वा श्रमीच्या डॉ. शारदा निर्मळ यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पिंपरी-निर्मळ या गावी झाला. वडिलांची शेती होती तसेच ते भारत सरकारच्या दूरसंचार विभागात अहमदनगर कार्यरत येथे होते. त्यामुळे त्यांचे बालपण, शिक्षण नगर येथेच झाले. मुलींच्या कन्या विद्या मंदीर येथून त्या दहावी तर न्यू आर्टस् कॉमर्स आणि सायन्य कॉलेज मधून बारावी सायन्स झाल्या. लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचे त्यांचे स्वप्न होते. पाचवी ते बारावी पर्यंत संस्कृत विषय घेतल्याने आयुर्वेदाचा अभ्यास करताना त्याचा खूप उपयोग झाला, असे त्या म्हणतात. शाळेतील थिगळे मॅडम यांचा त्यांचे संस्कृत पक्के होण्यास फार उपयोग झाला. त्यामुळे आयुर्वेदाची ओढ लागली. केंद्रीय प्रवेश परीक्षेत त्यांचा क्रमांक संगमनेर येथील संगम सेवाभावी आयुर्वेद महाविद्यालयात लागला. तेथून 1999 साली त्यांनी बी.ए.एम.एस पदवी प्राप्त केली. स्त्रीरोग विषयात त्या नगर जिल्ह्यात प्रथम आल्या पुढे त्यांची पोस्ट ग्रॅज्युएशन साठी निवड झाली. पण त्याच दरम्यान डॉ. प्रशांत महाडुंळे यांच्याशी 2000 साली विवाह झाल्याने त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करता आले नाही. पण ही उणीव त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनची सर्व पुस्तके अभ्यासून भरून काढली. पुढे योगा पदविका अभ्यासक्रमात त्या महाराष्ट्रात पहिल्या आल्या.

विवाहानंतर 5 एप्रिल, 2000 पासून त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. स्त्रीयांविषयी तळमळ असल्यामुळे व विशेषत: ग्रामीण भागातील स्त्री आरोग्याच्या समस्येमुळे त्यांनी नगर जवळील केडगांव भागात वैद्यकीय सेवा सुरु केली. पहिल्या महिन्यातच 4 हजार मिळाले, त्यातून आई-वडील, सासू-सासऱ्यांना भेटी दिल्या.

2002 साली दगदगीमुळे त्यांची पहिली मुलगी दुर्वा सातव्या महिन्यातच झाली. तिची अतोनात काळजी घेतली पुढे ती सुदृढ झाली. तर 25 सप्टेंबर 2005 रोजी मुलगा अंकुरचा जन्म झाला. सासू-सासरे यांच्यासह घरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी वैद्यकीय सेवा सुरुच ठेवली.

पहिल्या बाळंपणाच्या स्वत:च्या अनुभवातून त्यांना गर्भसंस्काराचे महत्त्व कळले आणि 2004 पासून त्यांनी गर्भसंस्काराविषयी मोफत कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली आतापर्यंत त्यांनी नगर जिल्ह्यात 200 हून अधिक कार्यशाळा घेतल्या. पुढे त्यांनी पुणे, नाशिक जिल्ह्यातही त्यांनी कार्यशाळा घेतल्या. आता कार्यशाळा घेण्याऐवजी त्यांनी आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

लोकांपर्यंत गर्भसंस्काराचे महत्त्व पोहचण्यासाठी त्यांनी एप्रिल 2012 मध्ये ‘आयुर्वेद गर्भस्ंस्कार’ हे पुस्तक लिहले. यादरम्यान 2011 साली वडील रस्ते अपघातामध्ये दुर्देवाने मृत्यूमुखी पडले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पहिल्या स्मृतीदिनी ‘कर्मयोगी’ या पुस्तकाचे नोव्हेंबर 2012 मध्ये प्रकाशन केले. त्यानंतर 2014 मध्ये आरोग्यसखी, 2016 मध्ये ‘एकटीच्या वळणावर’ हे पुस्तक तर दि. 2 मे, 2017 रोजी आहारवेद हे पाचवे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

रुग्ण तपासत असतांनाच त्यांना योग्य आहार घेण्याचे महत्त्व सांगत असताना एका प्रख्यात वृत्तपत्राने त्यांना याच विषयावर लेखमाला लिहण्याचे सूचविले. त्यानुसार वर्षभर चाललेली ही लेखमाला फारच लोकप्रिय झाली. त्या लेखांचे संकलन करून आहारवेद हे पुस्तक तयार झाले. दरम्यान वंध्यत्वाच्या समस्येचा अभ्यास करून त्यांनी अशा महिलांसाठी विशेष उपचार पद्धती सुरू केली. त्यातून अशा महिलांना त्यांनी यशस्वीपणे मातृत्वाचा आनंद मिळवून दिला आहे.

प्रारंभी घराच्या पडवीत वैद्यकीय सेवा केल्यावर पतीच्या साथीने त्यांनी 2006 साली प्रणव हॉस्पीटल उभारले. या हॉस्पीटलामध्ये पंचकर्म, प्रसूतीगृह आणि विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. या हॉस्पीटलमुळे केडगाव परिसरातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे. पतीची पूर्ण साथ असल्यानेच हे सर्व शक्य होत आले, असे त्या कृतज्ञतेने नमूद करतात.

आतापर्यंत त्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी कन्या, लोकसत्ताचा नवदूर्गा, राष्ट्रीय स्त्री वैद्या, लोकमत तर्फे सखी सम्राज्ञी पुरस्कार, सकाळचा मधुरांगण स्त्री गौरव पुरस्कार, आयुर्वेद भूषण पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. डॉ. शारदा निर्मळ महाडुंळे यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...!

देवेंद्र भुजबळ
(संचालक(माहिती)(वृत्त/जनसंपर्क)
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा