महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
जिल्हा पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करणार - जिल्हाधिकारी उदय चौधरी गुरुवार, २६ एप्रिल, २०१८
मराठवाड्याला ऐतिहासिक असा समृद्ध वारसा लाभला आहे. या भागातील औरंगाबाद जिल्हा राज्याची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाते. या जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या पर्यटन राजधानीला पाणीदार करण्यासाठी येत्या चार महिन्यात टंचाईमुक्त आराखडा तयार करण्यात येणार असून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे तसेच पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यावर भर देणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी चौधरी यांच्याशी साधलेला संवाद…

प्रश्न : जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काय उपाययोजना करणार ?
औरंगाबाद जिल्हा हा ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध असून या ठिकाणी पर्यटन विकासाला वाव आहे. परंतु काही वर्षांपासून या भागात पाणी टंचाईची बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे तसेच पाण्याचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवारची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून काही गावांमध्ये वॉटर कपसाठीची स्पर्धा सुरू आहे. वॉटर कपच्या माध्यमातून गावातील नागरिक एकत्र येऊन पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवित आहे. आगामी चार महिन्यांमध्ये संपूर्ण जिल्ह्याचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येणार आहे. जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन जलयुक्त शिवारची कामे अधिक जलदगतीने करण्यावर भर देण्यात येईल.

प्रश्न : औरंगाबाद जिल्ह्यातील आपल्यासमोरील प्रमुख आव्हाने कोणती ?
टंचाईग्रस्त गावे ही प्रमुख समस्या आहे. या समस्यांना आधी प्राधान्य द्यावे लागणार आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाभराचा दौरा करणार आहे. नागरिकांशी संवाद साधून टंचाई निवारणाबाबत जनजागृती करण्यात येईल. सर्वांच्या साथीने पाणीटंचाईवर मात करणे सहज शक्य आहे. शासकीय यंत्रनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल. विहिरी, तलाव हे पाण्याचे स्त्रोत जीवित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शेतकऱ्यांना देखील कमी पाण्यात आधुनिक पध्दतीने शेती कशी करायची याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करणार असून पाणीटंचाईचे आव्हान जरी समोर असले तरी त्यावर समन्वयातून मात करत टंचाईमुक्त जिल्हा करण्याचा प्रयत्न आहे.

प्रश्न : जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवारबाबत काय सांगाल ?
जिल्हाभरातील काही गावांचा दौरा केला असून काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू आहेत. लोकसहभागाच्या माध्यमातून यंत्राच्या सहाय्याने जलसंधारणाची कामे करण्यात येत आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारच्या माध्यमातून खडकाळ जमिनींना देखील काळापोत आला असून मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या शेतात गाळ टाकून घेत आहे. शासनाच्या वतीने गाळ काढून देण्यात येत असल्याने या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वॉटरकप स्पर्धेत देखील अनेक गावे सहभागी झाली असून ग्रामस्थांची पाणीटंचाईवर मात करण्यासाठीची असलेली एकजूट नक्कीच कौतूकास्पद आहे.

प्रश्न : धान्य वाटपातील वितरण प्रणाली बळकटी करणासाठी आपण काय करणार ?
धान्य वाटपातील काळा बाजार रोखण्यासाठी शासनाने ई-पॉस मशिनद्वारे धान्य वाटप सुरू केले आहे. परंतु त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्याने त्या दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशीन वापराबाबत काही अडचणी येत आहे. परंतु त्या सोडविण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना योग्य प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी लाभार्थ्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड आदी कागदपत्रांची पाहणी करून धान्य वाटप करण्यात येईल, त्यामुळे कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

प्रश्न : औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी काय करणार ?
अजिंठा व वेरूळ यांच्यासह शहरात बिबिका मकबरा आणि आजुबाजूला अनेक पर्यटन स्थळे आहेत. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करीत असताना त्या भागातील पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले होते. या जिल्ह्यात काम करण्याचा अनुभव गाठीशी असल्याने त्याचा उपयोग औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी होईल. औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी वेगळ्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे.

प्रश्न : समृध्दी महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणार का ?
समृध्दी महामार्ग हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाचे काम शेतकऱ्यांशी समन्वय आणि चर्चा करुन पूर्ण केले जाईल. काही गावातील शेतकऱ्यांचा अजुनही समृध्दी महामार्गास विरोध आहे. या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील.

प्रश्न : कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपली भूमिका काय असणार ?
शहरातील रस्त्यावर असणारा कचरा ही मोठी समस्या असून त्यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. इतर भागात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येणार असून यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दीर्घकालीन उपाययोजनेसाठी नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करायला हवे. यामुळे चांगले कंपोस्टींग केलेले खत देखील मिळेल. प्लास्टिक, कागद आदी कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुर्नवापर करता येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वत:पासून सुरूवात करायला हवी.

-रमेश भोसले
संहिता लेखक
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
मराठवाडा विभाग, औरंगाबाद
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा