महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
प्रत्येक व्यक्ती पर्यावरण रक्षणाचा सेनापती व्हावा (भाग-१) मंगळवार, २७ जून, २०१७
राज्यात 1 जुलै ते 7 जुलै 2017 या वनमहोत्सवाच्या काळात 4 कोटी वृक्ष लागवड होत आहे. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम केवळ एक शासकीय उपक्रम नाही. हे आहे पर्यावरण संतुलनासाठी हाती घेतलेलं एक मिशन. या मिशनमध्ये सहभागी होऊन प्रत्येक व्यक्ती पर्यावरण रक्षणाचा सेनापती व्हावा, ही अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. या मिशनबाबत माहिती जाणून घेण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घेतलेली ही नेटभेट.

आपण नेहमी सांगता की वृक्ष लागवड एक शासकीय कार्यक्रम किंवा उपक्रम नाही तर एक मिशन आहे. हे मिशन हाती घेण्याची गरज का भासली?

जग भौतिक सुखाच्या मागं लागलं असून परकॅपिटा इनकम, जीडीपी ग्रोथ ही त्याची भाषा झाली आहे. ‘हर व्यक्ती धन की बात सुनता है लेकीन आवश्यकता है मन की बात सुननेकी. इथं एक पर्यावरणवादी म्हणतो, जगण्यासाठी प्रत्येकाला प्राणवायू लागतो की पैसा? हे एकदा श्वास बंद करून नोटा मोजा.. म्हणजे मग पर्यावरणशास्त्र महत्वाचं की अर्थशास्त्र महत्वाचं हे लक्षात येईल. खरं तर साधं सूत्र आहे. जिथे वनसृष्टी तिथे जीवसृष्टी. वन है तो जल है, जल है तो कल है.. आपण पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास करत असतांना ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंजसारखे शब्द शब्दकोशातून बाहेर पडले, आता आपण त्याची चिंता करत आहोत. ज्या वसुंधरेने मनुष्याचे पोषण केले तो मनुष्य मात्र वसुंधरेचे शोषण करण्यात धन्यता मानत आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हे प्रश्न सोडवायचे असतील, पर्यावरणाचे संतुलन टिकवायचे असेल तर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे वृक्षलागवड.

एका माणसाला रोज 2100 रुपयांचा प्राणवायू लागतो. तो जर 80 वर्षे जगला तर त्याचे दिवस होतात 29200. या पूर्ण आयुष्यात त्याने घेतलेल्या प्राणवायूची बाजारभावाप्रमाणे किंमत काढली तर तो 6 कोटी 13 लाख 20 हजार रुपयांचा प्राणवायू पूर्ण आयुष्यात घेतो. माझं म्हणणं आहे की त्याने 6 कोटीची नाही, 13 लाखाची नाही, 20 हजार रुपयांची नाही पण किमान 20 रुपयांचे एक झाडं तरी आयुष्यात लावावे आणि पर्यावरणाच्या ऋणातून मुक्त व्हावे.

राज्याचं सध्याचं वनक्षेत्र किती आणि ते वाढविण्यासाठी कशाप्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत?

वृक्ष लागवड हे लोकसहभागातून हाती घेतलेले मिशन आहे. हे काम फक्त सरकारी राहाता कामा नये. हे फक्त वन मंत्री, वन सचिव किंवा वन विभागांच्या 27 हजार कर्मचाऱ्यांनी करावयाचे काम नाही. हे वृक्षधनुष्य प्रत्येकाने उचलण्याची गरज आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्र हे वनक्षेत्र असलं पाहिजे असं आपली राष्ट्रीय वननीती सांगते. आज राज्याचं वनक्षेत्र 20 टक्क्यांच्या आसपास आहे ते 33 टक्क्यांपर्यंत न्यायचं असेल तर वनजमीन पुरेशी नाही. वनेत्तर जमिनीवरही आपल्याला मोठ्याप्रमाणात वृक्षलागवड करावी लागेल. बरं फक्त वृक्ष लावणे हे ही या मिशनचे उद्दिष्ट नाही तर वृक्ष लावण्याच्या मानसिकतेचे बीजारोपण करणे हा त्याचा हेतू आहे. मागच्यावर्षी आपण 2 कोटी झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवलं… यावर्षी 4 पुढच्या वर्षी 13 आणि त्याच्या पुढच्यावर्षी 33 कोटी अशी तीन वर्षात 50 कोटी झाडं आपल्याला लावायची आहेत. ज्याला वृक्ष लावायचे आहेत त्याला प्रत्येकाला यात सहभागी होता येणार आहे.

भारतीय संस्कृती आणि वृक्षांचं खूप जुनं नातं आहे ते विविध प्रसंगांमधून दिसून येतं. हा सांस्कृतिक सेतू पुढे जाऊन मजबूत करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत?

भारतीय संस्कृती ही पर्यावरणावर प्रेम करणारी, वन आणि वृक्षांशी नातं जोडा असं सांगणारी संस्कृती आहे. आपल्या प्रत्येक धर्मात वृक्षांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे आपण साद घातली तर लोक पुढं येतात हा माझा मागच्या दोन कोटी वृक्ष लागवडीचा अनुभव आहे. आम्ही 1 कोटी लोकांची ग्रीन आर्मी तयार करत आहोत. राज्यातला प्रत्येक नागरिक हरितसेनेचा सदस्य व्हावा आणि तो पर्यावरण रक्षणाचा सेनापती व्हावा हा आमचा प्रयत्न आहे. मला सांगायला आज आनंद होतो की, महाराष्ट्रात आज हरित सेनेमध्ये 31 लाख लोकांनी सदस्यत्व स्वीकारले आहे. ज्या पृथ्वीने आपल्याला भरभरून दिलं त्या पृथ्वीचंच आपण शोषण करत आहोत. हे कुठं तरी थांबवलं पाहिजे.. त्यात ही हरित सेना नक्कीच योगदान देईल.

आपल्या संतांनी ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे’ असं म्हणत वृक्षांशी नातं जोडण्याचा संदेश दिला तर ‘वृक्ष भेद नही करते है गरिब और धनवान मे, देते सभीका साथ अंततक, जलकर भी शमशानमे’ असं सांगत कुणी वास्तवाची जाणीव करून दिली गेली आहे. आपली संस्कृती ही पर्यावरणवादी संस्कृती आहे पर्यावरण विरोधी संस्कृती नाही. जो हे जाणून घेणार नाही त्याला पर्यावरणही माफ करणार नाही. ‘मृत्यूका जब खुला तांडव, मनुष्य के सामने आयेगा, क्यूँ नही बचाये हमने वृक्ष, यह सोचकर मानव पछतायेगा’ अशी एक दिवस वेळ येईल. कारण वृक्ष ही जीवन की मत्ता है, जाने हर इन्सान, इनके बिना संभव नही मानव का कल्याण… ही वस्तुस्थिती आहे.

अनेक लोक, स्वंयसेवी-सामाजिक संस्था या वृक्ष लागवडीच्या कामात सहभागी होऊन उत्तम काम करत आहेत. अशी काही चांगली कामं सांगता येतील? जी इतरांसाठी प्रेरणादायी आहेत.


लोक अतिशय छान आणि उत्साहवर्धक प्रतिसाद देत आहेत. रोज कुठून कुठून फोन येतात.. सर आम्ही इतकी झाडं लावत आहोत… ही झाडं लावतताना खूप आनंद वाटतो. सोलापूरमध्ये एक डॉक्टरांचा समूह आहे. त्यांनी झाडांची भिशी हा अनोखा उपक्रम राबविला आहे. दर महिन्याला ते 200 झाडांची भिशी काढतात. ज्याची भिशी निघते तो तितकी झाडं आपल्या साथीदारांच्या मदतीने लावतो. राजगुरुनगरच्या रानमाळा गावचे पी.टी. शिंदे नावाचे माजी सरपंच आहेत, त्यांनी सगळा गाव हिरवागार करून टाकला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने अब जीडीपी, पर कॅपिटा इनकम की बात बहोत हुई अब पर कॅपिटा सॅटिसफॅक्शन की बात करते आहे असं म्हणत 2030 साठी 17 उद्दिष्ट्ये निश्चित केली त्यात 5 मुद्दे पर्यावरणाशी संबंधित निवडले. त्यांनी भूतान देशाला सर्वात समाधानी देश म्हणून जाहीर केलं. मला प्रश्न पडला.. का? त्यांच्यापेक्षा जास्त सोयी सुविधा तर आपल्या देशात आहेत मग असं का? कारण त्यांनी सर्वात जास्त वृक्ष लावून ते जगवण्याचं काम केलं. राणीचा वाढदिवस असेल लावा वृक्ष, राजकुमाराचा जन्म झाला लावा वृक्ष, पास झालात लावा वृक्ष- नापास झालात लावा वृक्ष असं करत त्यांनी निसर्गाशी अनुकूल वागण्याची वृत्ती वाढविली.

फॉरेस्ट या शब्दात जीवन आहे ते कसं?

हो, फॉरेस्ट या शब्दातच जीवन आहे. एफ स्टॅण्डस फॉर फ्रुट ॲण्ड फुड, ओ फॉर ऑक्सीजन, आर फॉर रेन, ई फॉर एनर्जी, एस फॉर सॉईल, टी फॉर टिक. जन्मापासून अखरेच्या श्वासापर्यंत वन आणि वनांशी आपला संबंध येतो. ‘जीवन’ या शब्दातच जीव आणि वन आहे म्हणजे जिथे वन आहे तिथे जीव आहे. अमेरिका आणि चीनमध्ये ऑक्सीजन बार आहेत. आपल्या देशात तरी ऑक्सीजन विकत घेण्याची वेळ येऊ नये.. ज्या दिवशी ही वेळ येईल त्यादिवशी आपल्या देशाचा तो पराभव असेल, आपल्या पर्यावरणीय शिक्षणाचा तो पराभव असेल असं मला वाटतं.

शब्दांकन : डॉ.सुरेखा म. मुळे,
वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा