महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
कचराकोंडी : नागरिकांचे अमूल्य सहकार्य ! - महापौर नंदकुमार घोडेले बुधवार, १४ मार्च, २०१८
औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या समस्येला औरंगाबाद महानगर पालिका निर्धाराने तोंड देत आहे. महानगर पालिकेच्या पाठिशी शासनही खंबीरपणे उभे राहिले असून नागरिकांचे सहकार्यही लाभत आहे. या संदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांची माहिती व जनसंपर्क मराठवाडा विभागाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी घेतलेली नेट भेट…

कचऱ्याची समस्या कधीपासून व कशामुळे निर्माण झाली?
महानगर पालिकेकडून गेल्या 33 वर्षांपासून नारेगाव, मांडकी या ठिकाणी कचरा नेऊन टाकण्यात येत होता. पंचक्रोशीतील लोकांनी या ठिकाणी कचरा टाकण्यास विरोध केला होता. 4 महिन्यांपूर्वी नारेगाव येथील नागरिकांनी कचरा टाकु नये यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी 16 फेब्रुवारी 2018 रोजी आंदोलन सुरू केले. तसेच कचरा वाहून नेणाऱ्या महानगरपालिकेच्या वाहनांना प्रवेश बंदी केली. त्यामुळे महानगर पालिकेसमोर कचऱ्याची समस्या निर्माण झाली. या कचऱ्याच्या समस्येला निर्माण होऊन एक महिन्याचा कालावधी होत असून यातून मार्ग काढण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्न करीत आहे.

ही समस्या दूर करण्यासाठी महानगरपालिका काय उपाययोजना करीत आहे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी कचरा प्रश्नसंदर्भात मदतीचा हात देऊन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तातडीने निधी मंजूर केला आहे. त्यासोबतच कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी 9 नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. विशेष अधिकारी रामदास कोकरे, विक्रम मांडोरगे यांच्यासारखे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणारे सक्षम अधिकारी यांनाही नेमण्यात आले आहे. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाविषयी जनजागृती करण्यात येत असून कचऱ्यावर प्रक्रिया करणे सुरू केले आहे. कचरा प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येत आहे.

महानगर पालिकेच्या दीर्घकालीन योजना काय आहेत?
महानगर पालिकेने दीर्घकालीन योजनांच्या संदर्भात आराखडा तयार केला असून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. साठ ते सत्तर वार्डांमध्ये जागेवरच कचरा प्रक्रिया सुरू केली असून त्याठिकाणी सुका आणि ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नऊ यंत्रे मनपाच्या वतीने खरेदी करण्यात येत असून ठाणे, पुणे यासारख्या मोठ्या शहरांच्या धर्तीवर कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा मोठा प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे.

अस्वच्छतेमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहे?
कचराकोंडीमुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो. यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. शहरातील विविध भागात तसेच रस्त्यावर साठलेल्या तीन हजार टन कचऱ्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात येत असून त्यावर बायोट्रिक पावडर फवारणीसुद्धा करण्यात येत आहे. माशांवर नियंत्रण मिळविण्यासाठी फवारणी करण्यात येत असून नागरिकांना उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहनही मनपातर्फे करण्यात येत आहे. साठलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी लहान मुलांना खेळू देऊ नये, तसेच आरोग्याच्या दृष्टीने सर्व नागरिकांनी योग्य ती दक्षता घेऊन अफवांवर विश्वास ठेऊ नये. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत महानगरपालिका प्रशासन सदैव तत्पर असून नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे. शहरातील हॉटेल व्यावसायिकांना नगर विकास खात्याच्या माध्यमातून तसेच महसूल प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात येत असून कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कचरा प्रश्नी आपण नागरिकांना काय आवाहन कराल?
नागरिकांनी ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण करुन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याचे सेंद्रीय खत तयार करावे त्याचप्रमाणे सुका कचरा हा पुनर्प्रक्रियेसाठी द्यावा. जेणे करुन त्यापासून पुन्हा टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करता येतील व शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन करण्यास मदत होईल. शहरातील नागरिक खूप समजदार असून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांचे आम्हाला चांगले सहकार्य लाभत अाहे. शहरातील प्रत्येक नागरिक या कचराकोंडीतून मार्ग काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

शहरातील नागरिकांनी कचरा प्रश्नी आतापर्यंत जसे सहकार्य केले तसेच सहकार्य भविष्यातही करतील अशी अपेक्षा आहे. नागरिकांनी कचरा प्रश्नावंर कायमस्वरुपी तोडगा निघेपर्यंत संयम बाळगावा. प्रशासन हा प्रश्न मिटविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या आरोग्याबाबत कोणताही धोका पत्करणार नाही. यासाठी शासकीय रुग्णलयांसोबतच खाजगी डॉक्टरांचीही मदत घेण्यात येत आहे. शहरातील कचराकोंडी लवकरच सुटेल अशी आम्हाला खात्री आहे. महानगर पालिकेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा