महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
…आता जिल्हा परिषदेच्या शाळा सौरशाळा करण्याचे उदिदष्ट – हर्षल विभांडिक सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७


खरे तर आजच्या काळात एकदा मुलगा मायदेशातून शिकून परदेशात गेला की तेथून परत येणे तसे कठीणच... पण हर्षल विभांडिक यांची गोष्ट तशी वेगळीच.. कारण सामान्य कुटुंबातून थेट न्यूयॉर्क गाठणाऱ्या हर्षल यांना आजही आपले गाव आपला जिल्हा आणि आपले महाराष्ट्र याचाच लळा अधिक होता आणि म्हणून महाराष्ट्रात आल्यावर डिजिटल शाळेचा उपक्रम त्यांनी आपल्या धुळे जिल्हयात यशस्वी करुन दाखविला. आता येत्या डिसेंबर 2017 अखेर धुळयातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा सौरशाळा करण्याचे त्यांचे उदिदष्ट आहे. डिजिटल शाळा ते सौरशाळा इथपर्यंतच्या प्रवासाविषयी हर्षल विभांडिक यांच्याशी साधलेला संवाद..

आपण काही महिने धुळयात तर काही महिने न्यूयॉर्क मध्ये असता याविषयी..
मी मुंबई विदयापीठातून बी.टेक केले. आणि मग न्यूयॉर्क येथील पेस विदयापीठातून फायनाशिअल मॅनेजमेंट घेऊन एमबीए केले. सध्या मी न्यूयॉर्कच्या एका कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करतो आहे.त्यामुळे वर्षभरातले तीन ते चार महिने तेथे असतो तर उर्वरित 7 ते 8 महिने धुळयात असतो. परदेशात गेलो तरी माझे मन कायम माझ्या गावीच राहिले. आपल्या गावातील मुलांसाठी काहीतरी करावे हे सतत डोक्यात होते आणि मग तेथूनच डिजिटल शाळांचा प्रवास साधारण 2014 मध्ये सुरु झाला. आणि आज डिजिटल शाळा ते सौरशाळा इथपर्यंत पोहोचला आहे.

एका सामान्य परिस्थितीतून आपण इथपर्यंतचा प्रवास केला आहे याविषयी..
मी उत्तर महाराष्ट्रातील धुळयाचा आहे. सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. माझे वडील सुभाष विभांडिक कापडाच्या दुकानात काम करतात. माझे सर्व शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून झाले आहे. मला लहानपणी संगणकाची आवड होतीच पण पैशाची कमतरता म्हणून लहानपणी मी संगणकाचे शिक्षण घेऊ शकत नव्हतो. मी 1996 साली दहावी पास झालो. परीक्षेत उत्तम गुण होते पण वडीलांची आर्थिक परिस्थिती तशी चांगली नव्हती त्यामुळे कसेबसे पुढच्या शिक्षणासाठीचे पैसे जमवले. शाळेत जेव्हा संगणक आला तेव्हा मग लांबूनच माऊस, डेसटॉप, हे सगळे पाहत होतो. मग मात्र दहावीनंतर जिददीने अभ्यास केला आणि सगळे शिक्षकी पेशा स्वीकार असे सांगत असताना इंजिनिअरींगला प्रवेश घेतला आणि शिक्षण पूर्ण केले. पुढे मग इंजिनिअरींग पूर्ण केल्यावर एमबीए केले आणि मग न्यूयॉर्कमध्ये नोकरी करु लागलो. मी व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. न्यूयॉर्क मध्ये नोकरी करतो. पण ग्रामीण भागाशी अजूनही माझी नाळ जोडलेली आहे. भारतात डिज‌िटल क्रांतीचे वारे वाहू लागले आणि आपण आपल्या मायभूमीत डिजिटल क्षेत्रात काही तरी करावे असे सारखे वाटत होते. आणि मग तेथूनच डिजिटल शाळा करण्याचा प्रवास सुरु झाला.

डिजिटल शाळा ही संकल्पना कशी सुचली ?
सुरुवातीला मला गावांचा विकास करावा, गावे डिजिटल करावी असे वाटत होते. मग मी जेव्हा याबाबत अधिक अभ्यास केला तेव्हा असे लक्षात आले की, गावं डिजीटल करण्यापेक्षा शाळा डिजीटल कराव्यात. कारण भारतातील बहुसंख्य लोक आज फेसबुक, व्हॅाट्स अॅप वापरत असले, ऑनलाईन खरेदी करत असले तरी डिजीटलदृष्ट्या मोठी लोकसंख्या ही अशिक्षित आहे. त्यामुळे गावं डिजीटल करायची आणि त्याचा उपयोगच लोकांना होणार नसेल तर ते करून काही उपयोग नाही. त्यामुळे प्रथम शाळा डिजीटल कराव्यात, हे ठरविले आणि त्यादृष्टीने मी काम सुरू केले.

डिजीटल प्रकारच्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची कौशल्ये वाढण्यास मदत होते आहे. पुस्तकातील धडे त्यांना थेट पडद्यावर चित्रे, चित्रफितींच्या माध्यामातून दिसत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत यायचे प्रमाणही वाढले आहे. सोबतच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादही वाढायला मदत होते आहे.भारतात ग्रामीण मोठ्या प्रमाणात टॅलेंट आहे, मात्र योग्य त्या व्यवस्थेअभावी त्यांना बदलत्या जागतिक प्रवाहांची ओळख होत नाही. परिणामी त्यांच्यातील बुध्दीमत्ता अडगळीत पडते. शिवाय जिल्हा परिषदेच्या शाळा आणि त्यातील विद्यार्थी यांच्याकडे जरा नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. पण डिजिटल शाळांमुळे आता जिल्हा परिषदेत विदयार्थी शाळेत येण्याची संख्या वाढत आहे.मुळात मी सप्टेंबर 2015 पासून डिजिटल शाळांसाठी काम करणे सुर केले. यासाठी मी सर्वांत प्रथम माझा धुळे जिल्हा निवडला. धुळयात मी 198 प्रेरणा सभा घेतल्या. या सभेतून मी शिक्षक, गावकरी यांनी डिजिटल शाळा यासाठी प्रेरित केले आणि त्यातूनच 7 कोटी रुपये जमा झाले. माझ्या या कामाची दखल राज्य शासनाने घेतली. आतापर्यंत मी 22 जिल्हयांमध्ये 36 प्रेरणा सभा घेतल्या आहेत.

आपण आपल्या‍ जिल्हयातल्या शाळा डिजिटल केल्या पाहिजेत हे आपल्याला कसे सूचले ?
याचे श्रेय मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देईन कारण त्यांनी डिजिटल इंडियाचा नारा दिला. ग्रामीण भागातील मुलांपर्यंत डिजिटल विषयाचे शिक्षण पोहचावे आणि डिजिटल इंडियामध्ये आपलाही हातभार लागावा असे मला वाटत होते. शिवाय आपण ज्या जिल्हयात शिकलो त्या शाळेतल्या मुलांना सुध्दा चांगले शिक्षण मिळावे यासाठी आपण आपला सहभाग दयावा याच प्रेरणेतून 2015 मध्ये मी गावागावात जाऊन डिजिटल शाळेचा प्रसार आणि प्रचार करु लागलो आणि तेथूनच ही सुरुवात झाली.

भारताला जर जागतिक पातळीवर एक समर्थ राष्ट्र म्हणून उभे रहायचे असेल तर शिक्षण क्षेत्रात भरीव काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. शिक्षण हे एक असं क्षेत्र आहे, ज्यात अगदी दररोज काहीना काही नवीन घडत असतं. त्या बदलांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतातील शाळांना जगातील प्रगत देशातील शाळांशी जोडण्याची गरज आहे, जेणेकरून बदलत्या जागतिक प्रवाहांशी त्यांची ओळख होईल. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजीटल करणे हा त्यातील एक भाग आहे.

आपण गावकऱ्यांसाठी प्रेरणा सभा घेत होतात याविषयी..
मुळातच एखादा प्रकल्प, योजना किंवा उपक्रम ग्रामपातळीवर राबवायचा असेल आणि यशस्वी करायचा असेल तर तेथील स्थानिक लोकांचा सहभाग मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचमुळे जेव्हा गावोगावी जाऊन मी डिजिटल शाळांविषयी बोलत असे, तेव्हा या शाळा डिजिटल करण्यासाठी लोकसहभाग किती आवश्यक आहे यावर भर देत असे आणि मग त्यासाठीच प्ररेणा सभा घेण्यास सुरुवात केली. या प्रेरणा सभांमध्ये मी डिजिटल शाळांसाठी लोकवर्गणी मागायला सुरुवात केली. 5 रुपयांपासून ते कित्येक हजारांमध्ये वर्गणी आम्हाला मिळू लागली. पण फक्त लोकवर्गणी मिळाली असती तर लोकांना मी त्यांच्याकडूनच पैसे मागतो आणि स्वत:चा सहभाग देत नाही म्हणून मग मी 70 टक्के लोकवर्गणी आणि 30 टक्के माझा त्या शाळेसाठीचा खर्च असे आखून घेतले आणि मग गावोगावी डिजिटल क्लासरूम उभे करण्याची मोहीम सुरु झाली. सुरुवातील धुळयातील 45 शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार केला यामध्ये केंद्रप्रमुख आणि शिक्षण अधिकारी यांचाही आर्वजून सत्कार केला.

डिजिटल शाळा संकल्पना महत्वाची आणि उपयुक्त कशी आहे हे मी गावातील शिक्षकांपासून ते गावातील लोकांना प्रेरणा सभेच्या माध्यमातून पटवून दिले. प्रेरणा सभेत मी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विदयार्थी आणि गावकरी यांची एकत्रित सभा घेऊ लागलो. या प्रेरणा सभेत मी लोकांना आणि विद्यार्थ्यांना डिजीटल माध्यमाचे महत्व, शाळा डिजीटल होण्याचे फायदे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगू लागलो. सोबतच डिजीटल शाळा म्हणजे काय, याचे प्रात्यक्षिकही दाखवू लागलो. डिजीटल वर्ग बनवण्यासाठी गावकऱ्यांकडून देणगी अगदी पाच रुपयांपासूनही देण्याचे आवाहन केले. आणि विशेष म्हणजे मला सर्व गावकरी आनंदाने आणि सढळ हस्ते मदत करु लागले.

आतापर्यंत किती जिल्हयातील शाळा डिजिटल झाल्या आहेत आणि आतापर्यंतच्या प्रवासाविषयी..
आतापर्यंत राज्यातील 67,000 जिल्हापरिषद शाळांपैकी 58,00 शाळा डिजिटल झाल्या आहेत तर आतापर्यंत धुळे, गोंदिया, हिंगोली, ठाणे या चार जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल शाळा झाल्या आहेत. पण शाळा डिजिटल झाल्या म्हणजे काम संपणार नाही. कारण धुळयापुरते बोलायचे झाले तर धुळयातील काही गावात सतत लोडशेडिग असते मग अश्या वेळी शाळा नुसत्या डिजिटल होऊन काय फायदा. त्यामुळे आता या डिजिटल शाळा सौरशाळा करण्याचे उदिदष्ट आम्ही सर्वांनी मिळून ठरवले आहे. येत्या डिसेंबर 2017 पर्यंत हे उदिदष्ट पूर्ण करावयाचे असून आनंद याचा आहे की गेल्याच महिन्यात धुळयातील साक्री तालुक्यातील जिल्हा परिषदेची शाळा पहिली सौरशाळा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. मुळातच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही चांगले शिक्षण दिले जाते हेच मला सांगायचे असून या शाळा मुलांसाठी ब्रेन ड्रेन नसून ब्रेन गेन आहेत.


- मुलाखत : वर्षा फडके,
varsha100780@gmail.com'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा