महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम - राज्यमंत्री दिलीप कांबळे सोमवार, ०९ एप्रिल, २०१८
सगळ्या भारतीय नागरिकांसाठी गीता, बायबल किंवा समग्र धार्मिक ग्रंथापेक्षा पवित्र ग्रंथ असेल तर ती भारतीय राज्यघटना आहे. व या राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 जयंती येत्या 14 एप्रिल रोजी देशभर साजरी होणार आहे. यानुषंगाने सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याशी केलेली बातचीत 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 127 व्या जयंतीनिमीत्ताने सामाजिक न्याय विभागातर्फे काय नियोजन केले आहे?
दरवर्षीप्रमाणेच यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या 127 व्या जयंतीनिमीत्ताने चैत्यभुमी दादर येथे लाखो अनुयायी दर्शनाला येणार आहेत. यावेळी अनुयायांची कोणतीही गैरसोय होणार नाही अशा दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. नुकतीच मुख्यमंत्री महोदयांनी यांनी यासंदर्भात बैठक घेऊन सोयीसुविधांचा आढावा घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने देखील या कार्यक्रमाचे योग्य व सूक्ष्म नियोजन केले आहे.

बाबासाहेबांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्याबाबत काय सांगता येईल?
बाबासाहेब आंबेडकराचे स्थान हे प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. सर्व जाती धर्मातील लोक हे चैत्यभुमीला भेट देतात. इंदू मिल येथे बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावं ही समस्त दलित समाजाची भावना आहे. या भावनेचा आदर राखत आमच्या शासनाने चैत्यभुमी जवळच असलेल्या इंदू मिल येथे बाबासाहेबांचे स्मारक करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्माराकांच्या कामाचे भुमिपुजन केले. जागा ताब्यात घेतली व सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गेल्या दोन महिन्यापासून स्मारकाच्या कामाला सुरूवात झाली आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे.

सोबतच बाबासाहेब विद्यार्थी दशेत असताना वास्तव्य केलेल्या 10 किंग्ज हे किंग्ल हेन्री रोड लंडन येथील निवासस्थान देखील राज्य शासनाने खरेदी केले आहे. या ठिकाणी देखील पंतप्रधान महोदयांनी भेट दिली आहे. राज्यातील ज्या-ज्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भेटी दिल्या, वास्तव्य केले उदा. महाड, येवला या ठिकाणांचा देखील विकास करण्यात येणार आहे. बाबासाहेब अध्यक्ष असलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला विस्तार व विकासासाठी निधी देण्यात आला आहे. दीक्षाभुमीच्या विकासासाठी देखील 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

स्वाधार योजनेबाबत काय सांगता येईल?
बाबासाहेब आंबेडकरांनी कायम शिक्षणासाठी आग्रह केला. विभागीय तसेच जिल्हास्तरावर शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वसतीगृहामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली. यामध्ये वसतीगृह न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाते.

याशिवाय मोठ्या शहरामंध्ये निवासाची समस्या लक्षात घेता मागासवर्गीय समाजातील नोकरी करणाऱ्या महिला व मुलीसाठी मुंबई, औरगांबाद, नागपूर या शहरात प्रत्येकी 100 महिला क्षमतेच्या वर्कींग वुमन होस्टेलची सुरूवात. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल सामाजिक न्याय विभागाने टाकलेले आहे.

समता सप्ताहानिमीत्त कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे?
7 ते 15 एप्रिल दरम्यान समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आपल्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण निर्णय कोणता?
आमच्या शासनाचा महत्त्वाचा व क्रांतीकारक निर्णय म्हणजे रक्तनाते संबंधातील जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय होय. या निर्णयाने अत्यंत महत्त्वाचे म्हणजे उच्च शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र लागायचं मात्र त्या जात प्रमाणपत्राची वैधता प्रक्रिया ही थोडी किचकट व प्रलंबित असायची आता मात्र रक्त नातेसंबंधात वडिलांचे वैधता प्रमाणपत्र असल्यास मुलांला तात्काळ वैधता प्रमाणपत्र मिळणार आहे. यासाठी विभागीस्तरीय समित्यांऐवजी जिल्हास्तरावर समितीचे गठन केल्याने कालमर्यादेत जात वैधता प्रमाणपत्र मिळणार आहे.

त्यासोबच यावर्षीपासून सावित्रीबाई फुले यांची पहिली विद्यार्थीनी असलेल्या व क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या कुटुंबातील राहिलेल्या मुक्ता साळवे घरकुल योजनेंतर्गत त्यांच्या नावे मातंग समाजासाठी विशेष मोहिमेतर्गत 25 हजार घरांची निर्मिती करण्याचे शासनाने ठरवले आहे.

अनुसूचित जातीमधील होतकरू विद्यार्थ्यांची उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आर्थिक अडचणी अभावी अपूर्ण राहु नये यासाठी राज्यातील 100 विद्यार्थ्यांना देशांर्तगत उच्च शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पाठवताना यावर्षी 50 विद्यार्थ्याऐवजी 75 विद्यार्थ्यांना पाठविले व पुढील वर्षीही संख्या वाढवुन दुप्पट करण्याचा आमचा मानस आहे.

सामाजिक न्याय विभागामार्फत क्रांतीवीर लहुजी साळवे यांचे पुणे येथे स्मारकासाठी जागा घेतली असून त्यांचे काम सुरू आहे. तसेच घाटकोपर मधील चिरागनगर येथे अण्णाभाऊ साठे यांचेही आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आपण उभारणार आहोत. या स्मारकांचा विकास करताना ही स्मारक पुढच्या पिढीला या महापुरूषांची प्रेरणादायी विचार सांगणारी जिवंत स्मारक कसे होतील यासाठी तिथे ग्रंथालय, डिजिटल लायब्ररी त्यात या महापुरूषांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी साहित्य संपदा उपलब्ध करून देण्यात येईल.

बाबासाहेबांच्या 127 व्या जयंतीनिमीत्त 332 केंद्रीय आश्रमशाळांना कायमस्वरूपी अनुदान देण्याचा शासनाचा विचार आहे.

शैलजा वाघ दांदळे
विभागीय संपर्क अधिकारी
8381001097
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा