महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
वाचनामुळे विचार स्पष्ट होण्यास मदत होते- साहित्यिक श्रीकांत देशमुख गुरुवार, ०४ जानेवारी, २०१८

‘बोलावे ते आम्ही’ या श्रीकांत देशमुख लिखित मराठी काव्यसंग्रहाला नुकताच 2017 चा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. त्या अनुषंगाने श्रीकांत देशमुख यांच्या साहित्याविषयी व त्यांच्या जीवन कार्याविषयी त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

 

बळीवंत, आषाढ माती, बोलावे ते आम्ही हे काव्यसंग्रह. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ, कुळवाडी भूषण शिवराय हे वैचारिक ग्रंथ. पडझड वाऱ्याच्या भिंती हा ललितलेख संग्रह, समकालीन साहित्य चर्चा, भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य आणि महानोरांची कविता ही संपादने आहेत. बोलावे ते आम्ही या काव्यसंग्रहास यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा केशवसूत पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

 

प्रश्न : बोलावे ते आम्ही’ या काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. याविषयी आपल्या काय भावना आहेत  ?

उत्तर : माझ्या साहित्य लिखाणाला विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त झाले. पण साहित्य क्षेत्रातील मानांकित असा साहित्‍य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे खूप आनंद होत असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी काव्यसंपदा आणि साहित्य पोहचण्यास मदत होईल असे वाटते.

 

प्रश्न : आपल्या साहित्य लेखनाच्या प्रेरणा काय आहेत ?

उत्तर : मी ग्रामीण भागात जगलो, शिकलो अन् काही काळ मी प्राध्यापकीही केली. नंतर महाराष्ट्र लोकसेवेच्या माध्यमातून शासकीय नोकरीत आलो. काम करत असताना ग्रामीण शेतकरी, त्यांचे जीवन, त्यांचे भावविश्व हे जवळून बघण्याचा योग आला. कविमन असल्याने हे निरीक्षण, चिंतन, काव्य शब्दात उतरवलं. मी स्वत: शेतकरी आहे. मला आतून जे वाटतं ते शब्दरुपानं व्यक्त करत गेलो. त्याचबरोबर सत्यशोधक चळवळीतील काही नेत्यांचे विचार, वडिलांचे विचार आणि कार्यातून मी घडत गेलो. एका अर्थाने ग्रामीण भागातील संस्कृती, विचार, झालेले बदल या सर्वांचा एक प्रतिनिधी म्हणून लिखाण आणि काम करीत आहे आणि ग्रामीण जीवन हेच माझ्या साहित्याची प्रेरणा बनत गेली, असं म्हणता येईल.

 

प्रश्न : आपण शासनात काम करताना साहित्यामधील आपल मुशाफिरी याविषयी काय सांगाल ?

उत्तर : माझे मूळ गाव बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी. या गावात माझे बालपण गेले. प्राथमिक शिक्षण येथेच झाले. अकरावी व बारावी चिखली येथे झाले. नंतर बीएचे शिक्षण जालन्याच्या बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयातून घेतल्यानंतर पदव्यूत्तर शिक्षणासाठी औरंगाबाद येथे शिक्षण घेतले. नंतर नांदेड येथे तीन वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. पण इतर कारणामुळे ही नोकरी सोडली आणि 1993 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन शासनात उपनिबंधक, सहकारी संस्था या वर्ग एकच्या पदावर निवड झाली. एक लेखक मन असल्याने प्रशासनात काम करताना आलेले अनुभव मी शब्दात मांडत गेलो. यातूनच बळीवंत आणि आषाढ मातीहे काव्यसंग्रह निर्माण झाले. यानंतर सध्या जो साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे, ‘बोलावे ते आम्ही’ आपणासमोर आलेला आहे. शासनात खूप चांगले काम करता येते. आपण लोकांसाठी जे काही देणं लागतो. ते विस्तीर्ण स्वरुपात काम करण्याची संधीच आहे, असं मला वाटतं.

 

प्रश्न : समाजातील लोकांच्या वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे याविषयी काय सांगाल ?

उत्तर : आज तंत्रज्ञानाने वेगवेगळे बदल स्वीकारुन संपूर्ण मानवी आयुष्य बदललेले आहे. याला कोणतेच क्षेत्र अपवाद नाही. समाजमाध्यमाच्या (सोशल मीडिया) मध्ये व्हॉटस्अप, फेसबुक, ट्विटरने माहितीचे आदानप्रदान मोठ्या प्रमाणावर केले. पण खरे ज्ञान कसे मिळेल याचा जर प्रयत्न झाला तर याचा खूप फायदा होतो. व्हॉटस्अपवर येणारे आपण वाचतो पण आज समाजाला शॉर्ट बट स्वीट (संक्षिप्त) हवे असते. साहित्यातील महाराष्ट्राचे मानबिंदू असणारी पुस्तके जगासमोर येतील. या अनुषंगाने मराठी साहित्यातील काही ग्रंथ, पुस्तके, विचारवंताचे लेख जर संक्षिप्त स्वरुपात वाचायला मिळाले तर हा या तंत्रज्ञानाचा फायदाच म्हणता येईल आणि या अनुषंगाने काहीजण प्रयत्न देखील करीत आहेत. त्याचप्रमाणे शासनात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी काहीतरी वाचावे. यामुळे विचार स्पष्ट होण्यास मदत होते. निकोप दृष्टी प्राप्त होऊन प्रशासन अधिक लोकाभिमुख बनेल, असे वाटते.

 

- मीरा ढास

सहायक संचालक (माहिती),

विभागीय माहिती कार्यालय, लातूर

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा