महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
ग्राहकांच्या हक्कासाठी नेहमी प्रयत्नशील - महेश पाठक बुधवार, १५ मार्च, २०१७
‘जागो ग्राहक जागो’ सारख्या जाहिराती आपण विविध प्रसारमाध्यमांतून वाचतो आणि पाहतो. ग्राहकांमध्ये जनजागृती करण्याचे काम अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केल्या जाते. 1962 पासून 15 मार्च हा दिवस ‘ग्राहक हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. ग्राहक हितासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजना आणि त्याची केली जाणारी अंमलबजावणी यासंदर्भात आज आपण अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक तक्रार निवारण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्याकडून  जाणून घेऊया.

1. ग्राहक संरक्षणाकरिता असणाऱ्या यंत्रणाचे स्वरुप कसे आहे?
ग्राहकांच्या हक्कासाठी अनेक कायदे आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीत अन्न व नागरी पुरवठा विभागाची भुमिका महत्वाची आहे. याशिवाय राज्य आणि जिल्हा पातळीवर ग्राहक न्यायालये आहेत. या न्यायालयाचे कामकाज देखील आमच्या विभागाकडून पाहिले जाते. वैद्यमापन शास्त्र विभाग हा देखील महत्वाचा विभाग आहे. यामध्ये ज्या वस्तुंचे मापन केल्या जाते, तसेच लेबल लावले जाते यावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे काम हा विभाग करतो. याशिवाय ग्राहकांसाठी ग्राहक संरक्षण विभागाची आणि वैद्यमापन शास्त्र विभागाची अशा दोन हेल्पलाईन देखील चालविल्या जातात. अशी अनेक महत्त्वपूर्ण काम अन्न व नागरी पुरवठा विभाग करतो.

2. ‘ग्राहक’ या संकल्पनेत कोणाचा समावेश होतो?
यामध्ये कुठलाही भेदभाव अथवा फरक केलेला नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास ‘कुठल्याही सेवा घेणारा हा ग्राहक’ अशी साधी व्याख्या आहे. याबाबत ग्राहक कायद्यामध्ये सविस्तरपणे माहिती देण्यात आलेली आहे.

3. ग्राहकांकरिता आपल्या विभागाची यंत्रणा कशा प्रकारे काम करते?
ग्राहकांना असणाऱ्या हक्कांनुसार आमचा विभाग कार्य करतो. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा हक्क, निवडीचा हक्क, प्रतिनिधीत्वाचा हक्क हे मुलभूत हक्क आहेत. याशिवाय तक्रार निवारणाचा, ग्राहक संरक्षणाचा, मुलभूत गरजा पुरविण्याचा आणि पर्यावरणाचा हक्क असे एकूण 8 प्रकारचे हक्क सांगता येतील. यापैकी सहा हक्क हे ‘1986 भारतीयांसाठीचा ग्राहक संरक्षण कायदा’ यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आमचा विभाग कायम प्रयत्नशील असतो.

4. तक्रार नोंदविण्यासाठी कुठे आणि कसा संपर्क साधावा ?
यासाठी हेल्पलाईन हा सर्वात सोपा मार्ग आहे. ग्राहकांसाठी 18002222 ही हेल्पलाईन कार्यरत आहे. तसेच वैद्यमापन शास्त्र विभागाच्या हेल्पलाईनचा क्रमांक 022- 22886666 हा असून या क्रमांकावर वजने, मापे, लेबलबाबत काही तक्रार असेल तर संपर्क साधावा. तसेच आमच्या विभागाच्या हेल्पलाईनचा क्रमांक 1967 आणि 1800224950 हा आहे. वरील क्रमांकावर ग्राहकांनी फसगत झाल्यावर तक्रार नोंदवावी.

5. या क्रमांकावर तक्रार केल्यानंतर पुढे काय कारवाई केल्या जाते ?
या क्रमांकावर ग्राहकांचा फोन आल्यानंतर त्यांना तात्काळ मार्गदर्शन केल्या जाते. एखाद्या ग्राहकांची तक्रार असल्यास त्यांना त्या तक्रार नोंदविल्याचा एक क्रमांक दिला जातो. त्या नंबरच्या आधारे ग्राहक केलेल्या तक्रारींचा पाठपुरावा करु शकतो. यावरही तक्रारकर्त्यांचे समाधान नाही झाले तर आम्ही त्यांना ग्राहक न्यायालयात जाण्याचा सल्ला देतो. शिवाय अनेक कंपन्यांचे कस्टमर केअर क्रमांक, ई-मेल आयडी, फेसबुक अकाऊंट असतात यावर देखील ग्राहक आपली तक्रार नोंदवू शकतात.

6. वैद्यमापनशास्त्र हा आपल्या विभागांतर्गत येणारा महत्वाचा भाग आहे. या विभागाच्या कार्याची प्रसिद्धी कशा प्रकारे करण्यात येत असते?
आम्ही ग्राहकांच्या हितासाठी वैद्यमापनअंतर्गत नेहमीच जाणीव जागृती करत असतो. यासाठी विविध मोहिमा राबवतो. ग्राहकांनी वस्तुंची खरेदी करताना नेहमी किंमत, वैधता, वजन, स्टॅण्डर्ड, गॅरंटी आणि वॉरंटी तपासून खात्री करुन घेणे महत्वाचे असल्याचे त्यांना वारंवार सांगत असतो. तसेच संबंधित कंपन्यांचे सर्व्हीस सेंटर कुठे आहेत हे पाहणे देखील गरजेचे आहे. वरील सर्व गोष्टींचे ग्राहकांनी तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

7. ‘राज्य ग्राहक कल्याण निधी’ स्थापन केलेला आहे. याविषयी सांगाल?
या निधीच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीचे कामे करतो. पोस्टर्स बनवणे, बॅनर्स बनवणे यासह घोषवाक्य आणि इतर जनजागृतीचे उपक्रम आम्ही राबवतो. तसेच ‘जागो ग्राहक जागो’ ही महत्वानवची मोहिम देखील आम्ही या निधीतून राबवतो. महत्वाचे म्हणजे ग्राहक चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे काम देखील आम्ही करतो.

8. अनेक सामाजिक संघटना ग्राहकांसाठी खूप चांगले काम करत आहेत. या संघटनांचा देखील ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होऊ शकतो याविषयी काय सांगाल ?
Price Monitor Commitee ही भाववाढीवर नियंत्रण ठेवणारी समिती आहे. या समितीवर या संघटनांची आम्ही नियुक्ती करतो. त्यांच्या सदस्यांचा प्रशिक्षण कार्यक्रमात देखील समावेश करतो. कारण त्यांना या चळवळीचे ज्ञान असते. तसेच या संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा देखील आम्ही विचार करतो.

9. दूरचित्रवाणीवर अनेक फसव्या जाहिराती दाखविल्या जातात. याबाबत काय सांगाल ?
अशा जाहिरातींबाबत Advertisement Standard Council of India यावर देखील ग्राहक तक्रार करु शकतो. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे प्रसारमाध्यमांनी देखील संबंधित जाहिरातींची खात्री करावी जेणेकरुन ग्राहकांची होणारी फसवणूक टळू शकेल.

10. ग्राहकांना आपण काय आवाहन कराल ?
मी सर्वप्रथम ग्राहकांना हेच सांगेल की, ग्राहकांनी वस्तुंची खरेदी करताना नेहमी किंमत, वैधता, वजन, स्टॅण्डर्ड, गॅरंटी आणि वॉरंटी तपासून खात्री करुन घेणे महत्वानाचे आहे. जर फसगत झाली तर आमच्या हेल्पलाईनवर नक्की संपर्क करा तुमच्या तक्रारींचे आम्ही नक्कीच निराकरण करु.

जयश्री श्रीवास्तव
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा