महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
वाटचाल सामाजिक न्यायाच्या दिशेने ; एक वर्ष सामाजिक न्याय मंत्रीपदाचे गुरुवार, ०३ ऑगस्ट, २०१७
    विद्यमान केंद्र सरकारला 26 मे 2017 ला 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळामध्ये देशाला सामाजिक न्यायाच्या दिशेने घेऊन जाण्यामध्ये सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे विशेष योगदान राहिले आहे. या विभागाचे मंत्री पद सामाजिक न्यायाची जाण असणाऱ्या आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी विचारांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या रामदास आठवले यांच्याकडे आहे. नुकताच दि.5 जुलै 2017 रोजी त्यांनी आपल्या मंत्री पदाची 1 वर्षे पूर्ण केली आहेत. श्री आठवले यांच्या कार्यकाळात सामाजिक न्याय विभागाला लोकाभिमुख करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती.

सामाजिक न्याय मंत्रालयाची मुख्य जबाबदारी देशामध्ये समानता प्रस्थापित करून शोषित, पीडित व्यक्तीला न्याय देण्याची आहे. न्याय देण्यासोबतच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी देखील मंत्रालय कार्य करते. त्यामध्ये भेदभावांच्या कक्षा दूर करून त्यांना सामाजिक समतेच्या मुख्य प्रवाहात आणणे हा मुख्य उद्देश आहे. श्री. आठवले यांनी वेगळ्या शैलीत मंत्री पदाची शपथ घेऊन साऱ्या देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. समाजकारण ते राजकारण असा प्रवास गाठणारा आणि दलित चळवळीचा शिलेदार म्हणून श्री. आठवले यांचे नांव मंत्री पदासाठी चर्चेत होते. मंत्री पदाचा कार्यभार घेतल्या नंतर आठवले यांनी सामाजिक न्यायाच्या दिशेने केलेली वाटचाल वाखाणण्याजोगी आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित निर्णयांना कार्यान्वित करून या विभागाला नवऊर्जा प्रदान करण्याचे काम श्री.आठवले यांनी केले आहे. केंद्र सरकारने सामाजिक न्यायाच्या दिशेने अनेक पाऊले उचलेली आहेत. नव्या धोरणांनुसार केन्द्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने कात टाकत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग व्यक्ती तसेच सफाई कामगारांसह इतर दुर्बल घटकांच्या कल्याणाच्या दृष्टीने ‘स्टार्ट अप’ व ‘स्टँड अप इंडिया’ यासारख्या योजनाना गतिमान केले. या घटकांतील लोकांना विभागाद्वारे सुरु करण्यात आलेल्या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देऊन त्यांचा आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न श्री.आठवले सातत्याने करीत आहेत.

देशातील 85% लोकसंख्येसाठी कार्यरत असलेल्यांमध्ये अनुसूचित जाती (एससी), इतर मागासवर्गीय (ओबीसी), वयोवृद्ध नागरिक, दिव्यांग, मदयपान व्यसनाधीन, ट्रान्सजेंडर व्यक्ती, विमुक्त जाती व भटक्या जमाती (डीएनटी) आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (ईबीसी) तसेच निराश्रीतांसाठी कार्यरत आहे. या विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजना –

ज्यामध्ये अनुसूचित जातीच्या मुलांसाठी मैट्रीक पूर्व शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती (एससी) च्या मुलांसाठी पोस्ट मैट्रीक शिष्यवृत्ती, विशेष केन्द्रीय सहायता (एससीए), अनुसूचित जाती (एससी ) च्या मुलांसाठी राष्ट्रीय फेलोशिप, अनुसूचित जातींच्या पात्र उमेदवारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय अनुसूचित वित्त विकास महामंडळ (एनएसएफडीसी) राष्ट्रीय मागासवर्ग वित्त विकास महामंडळ, राष्ट्रीय सफाई कामगार वित्त विकास महामंडळ यांच्या मार्फत कर्ज देण्याची सुविधा, तसेच नव्यानेच राष्ट्रीय फेलोशिप जी यूजीसीच्या माध्यमातून लागू करण्यात आलेली आहे, या योजनांचा समावेश आहे.

यासह श्री.आठवले यांनी समाजामध्ये जर समता प्रस्थापित करावयाची असेल तर आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले पाहिजे यावर विशेष भर दिला आहे. देशभरामध्ये या संदर्भात त्यांनी बैठकांमधून या विषयाचा प्रचार आणि प्रसार करून आपल्या मंत्रालयातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेला सशक्त करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी भरीव स्वरूपात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत नवविवाहीत आंतर जातीय दाम्पत्याला 2.50 लाख रुपये प्रोत्साहन म्हणून दिली जाते. या व्यतिरिक्त, वृद्धांना मदत, दिव्यांगाना विविध योजनांच्या माध्यमातून मदत, मदयपान ग्रसित व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी विविधांगी मदत केली जाते.

धर्म, जात, पंथ असा भेदभाव न करता समतावादी वातावरण निर्माण करण्यासाठी आणि जर अन्याय झाल्यास त्यावर दाद मागण्यासाठी अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार निवारण) कायदा कार्यरत आहे. या संदर्भात श्री. आठवले यांनी मंत्रालयात बैठक बोलावून संबंधीत अधिकाऱ्यांकडून वरील विषयाबाबत माहिती अद्ययावत केली. प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांना तात्काळ निवारण करण्याच्या सूचना दिल्या. देशामध्ये जातियवादी भावना निर्माण होऊ नये यासाठी विविधांगी जनप्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानातील समतावादी मूल्य देशभरात रूजले पाहिजे. याबाबत त्यांनी यंत्रणांना वेळोवेळी विविध उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांचे शालेय जीवन अंत्यत महत्वाचे असते व शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, विशेषत: अनुसूचित जातींच्या मुलांना आर्थिक टंचाईमुळे शिक्षण मध्येच सोडावे लागू नये म्हणून सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यास श्री.आठवले यांनी प्राधान्य दिले. या संदर्भात व्यापक बैठक बोलवून सर्व राज्यांना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाबाबत निर्देश दिले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला थेट त्याच्या बॅक खात्यामध्ये शिष्यवृती जमा करण्याचा नवा निर्णय देखील श्री.आठवले यांच्या नेतृत्वात घेण्यात आल्याने देशातील लाखो विद्यार्थ्याना त्याचा फायदा होत आहे.

‘शेड्यूल कास्ट कंपोनंट प्लान’ अंतर्गत राज्यांना दिलेल्या निधीची या विभागातर्फे प्रथमच देखरेख (मॉनिटरिंग) करण्यास श्री.आठवले यांच्या मार्गदर्शनात सुरुवात करण्यात आली. अनुसूचित जातींसाठी ऋण वृद्धी हमी योजना, दारिद्र्य रेषेखाली जीवनयापन करणाऱ्या एससी समुदायाच्या आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आर्थिक व विकास महामंडळ यांच्यामध्ये करार करण्यात आला.

दिव्यांग व्यक्तींसाठी विधेयक मंजूर करुन त्यांच्या आरक्षणात केलेली वाढ हे अलिकडे सामाजिक न्याय विभागाद्वारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे. दिव्यांगांसाठी आता 4 % टक्के आरक्षण करण्यात आलेले आहे. देशभरात 2.68 कोटी लोकसंख्येत असलेल्या दिव्यांगासाठी या विभागात स्वतंत्र सचिव दर्जांच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे त्यांचे प्रश्न लवकर मार्गी लागायला सुरुवात झाली आहे. मंत्रालयाद्वारे दिव्यांगाना विविध साधन-सामुग्री पुरविली जाते. जसे कर्ण बधिरांसाठी कर्ण यंत्र, कुत्रिम हात, पाय व इतर यंत्र सामुग्री दिली जाते. 17 सप्टेंबर 2016 रोजी गुजरातच्या नवसारी येथे आयोजित कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे 10, 330 कर्ण बधीरांना कर्ण यंत्राचे मोफत वाटप करण्यात आले. पहिल्यांदाच इतक्या मोठया प्रमाणात वाटप करून विभागाने विक्रम केला आहे. यासह दिव्यांगाना सुगम्य वाटचाल करता यावी व त्यांना सर्वच सार्वजनिक ठिकाणी जाणे-येणे सहज व्हावे, यासाठी सुगम्य भारत अभियान राबविण्यात श्री. आठवले यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.

- मनिष गवई (सामाजिक न्याय मंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी, नवी दिल्ली 9910971549)
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा