महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
पंडितजींच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझा सन्मानच – माणिक भिडे मंगळवार, ०३ ऑक्टोंबर, २०१७

राज्य शासनामार्फत भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना नुकताच जाहीर झाला आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद ...

पुरस्काराबददल आपली भावना..

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा नावाचा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहेच पण ज्या संगीत क्षेत्रात त्यांनी इतके मोठे काम करुन ठेवले आहे त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळणे हे म्हणजे मी आतापर्यंत केलेल्या संगीत सेवेची दखल घेतल्यासारखे आहे असे मला वाटते. कोणताही गायक मग तो शास्त्रीय गायन करत असेल सिनेमासाठी गात असेल नेहमीच शिकत असतो. पण माझ्यासारख्या शिष्येचा सन्मान झाला याचा आनंद आहे. ज्या दिवशी मला पुरस्कार जाहीर झाला हे कळाले त्या दिवशी किशोरीताईंची खूप आठवण झाली. कारण ज्या गुरुंनी माझ्यावर मेहनत घेतली त्याचे आज चीज केले असे त्यांना वाटले असते. आज या पुरस्कारामुळे मला जेवढा आनंद झाला आहे त्याच्या कित्येक पटीने त्यांना आनंद झाला असता.

आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी..

भारतीय शास्त्रीय संगीतात जयपूर अत्रौली या घराण्यात मी संगीत शिकले. उस्ताद अल्लादियाँ खाँ पासून ते भास्करबुवा बखले, भुर्जी खाँ, केसरबाई केरकर, वामनराव सडोलीकर, मोगूबाई कुर्डीकर, किशोरी आमोणकर यांनी अत्रौली घराण्याचा वारसा समर्थपणे चालवला. याच घराण्यात मी शिकले. मी किशोरीताईंकडे साधारण 15 वर्षे शिकत होते. पण किशोरी ताई सुध्दा गुरु म्हणून मला योगायोगानेच मिळाल्या. मोगूबाई कुर्डीकरांकडे मी जेव्हा गेले होते तेव्हा माई घरात नव्हत्या त्यावेळी किशोरी ताई होत्या. त्यांनी मला गायला लावून माझी परीक्षा घेतली आणि मग त्यांच्याकडेच मी शिष्य म्हणून गाणे शिकू लागले... असा किशोरी ताईंबरोबर माझ्या शिष्या म्हणून प्रवास सुरु झाला.


तुम्ही अनेक कार्यक्रमांमध्ये किशोरी ताईंना साथसोबत करायचा याविषयी..

हो मी किशोरीताईंबरोबर अनेक सांगितिक कार्यक्रम केले आहेत. मी किशोरीताईंना मैफलीत तंबोऱ्यावर साथसंगत करायचे. किशोरी ताईंबरोबर आमची मैफल खूप रंगायची... मैफीलीत गाताना गाणे कसे अधिकाधिक रंगवायचे, गाणं कसं फुलवायचं याचे शिक्षण त्यांनीच मला दिले आणि त्यांच्यामुळेच माझी संगीत बैठक पक्की झाली. आज हा पुरस्कार जाहीर झाल्यांनतर मला खूप प्रकर्षाने किशोरीताईंची आठवण येते आहे. आज जर त्या असत्या तर त्यांना नक्कीच आनंद झाला असता...

तुम्ही आज गेली अनेक वर्षे मुंबईत राहत आहात, कोल्हापूराची कधी आठवण येते का ?

हो नक्कीच येते ना.. शेवटी आज जरी मुंबईत राहत असले तरी माझे लहानपण कोल्हापूरात गेले आहे. लहानपणाच्या आठवणी आजही मला अनपेक्षितपणे कोल्हापूरात घेऊन जातात. आज मी जे काही आहे ते माझ्या वडलांमुळेच. माझे वडील कोल्हापूरात वकीली करायचे. पण त्यांना संगीताची खूप आवड होती. त्याकाळी अल्लाउद्दीन आणि त्यांचे पुत्र भुर्जी खाँ, अब्दुल करीम आमच्याकडे मुक्कामला येत असत. मग मी मधुकरराव सडोलीकर यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकवायला सुरुवात केली. त्यावेळी माणिक वर्मा त्यांच्याकडे येत असल्याने मला माणिक ताईंचाही सहवास काही काळ लाभला. कालांतराने माझा गोविंद भिडे यांच्याशी विवाह झाला आणि मी मुंबईत आले. पण माझ्या सासरच्यांनी माझ्या संगीत शिक्षणाला नेहमीच प्रोत्साहन मिळाले. आणि त्यामुळेच मग मी आकाशवाणीवर गाऊ लागले. आणि पुढे अनेक कार्यक्रम करु लागले.


आज आपली मुलगी आपला सांगितिक वारसा पुढे नेण्याचे काम करीत आहे याविषयी..

हो हे खरे आहे की आज आश्विनी घराण्याचा वारसा पुढे नेण्याचे काम करीत आहे. लहानपणापासूनच आश्विनीला घरात संगीताचे वातावरण मिळाले आणि त्यामुळे आपसुकच तिची ओढ संगीताकडे वाढली. लहानपणी तर आश्विनी माझ्याकडे हटट करायची की मला तु तुझ्यासारखे गाणं गायला शिकव. सुरावरून सुराकडे जायचे कसे आणि परतायचे कसे हे मी माझ्या शिष्यांना सांगत असे. आश्विनी बरेाबरच माया धर्माधिकारी, प्रीती तळवलकर, ज्योती काळे, संपदा विपट, गीतिका वर्दे या सुध्दा माझ्याकडे गाणं शिकल्या.

दरवर्षी राज्य शासनामार्फत शास्त्रीय गायन आणि वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रुपये पाच लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. यापूर्वी हे पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं.जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं.राम नारायण, श्रीमती परवीन सुलताना यांना प्रदान करण्यात आलेला आहे. लवकरच माणिकताईंना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

- वर्षा फडके, विभागीय संपर्क अधिकारी (सांस्कृतिक कार्य)
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा