महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
मराठी शब्दांना उर्दू प्रतिशब्द देणारा हा पहिला कोश - डॉ. एहसानूल्ला कादरी बुधवार, २८ मार्च, २०१८
मराठी भाषा समृध्द करण्यासाठी इतर भाषांचा देखील तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. मराठी भाषेत उर्दू भाषेतून विविध शब्द रुढ झालेले आपणास आढळतात. पण मराठी-उर्दू यामधील काही शब्दांचा अर्थ समजावून घेऊन उर्दू प्रमाणेच मराठी भाषिकांना उर्दू शिकण्यासाठी मराठी-उर्दू शब्दकोश प्रथमच प्रकाशित झाला आहे. स्वर्गीय देविसिंग चव्हाण यांच्या प्रेरणेतून डॉ. एहसानूल्ला कादरी यांनी या शब्दकोशाचे काम पूर्ण केले.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने नुकताच उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मराठी-उर्दू शब्दकोश प्रकाशित केला.

मराठी उर्दू शब्दकोशाचे कार्यकारी संपादक डॉ. ए. एच. कादरी यांच्यासोबत या शब्दकोशाची निर्मिती, प्रेरणा, तयार करीत असताना आलेले अनुभव या शब्दकोशाचे महत्त्व आणि उपयोग याविषयी केलेला हा संवाद.

प्रश्न:- भारतातील पहिला मराठी-उर्दू शब्दकोश आपण तयार केला आहे यामागची प्रेरणा काय आहे ?
उत्तर - मराठी-उर्दू शब्दकोश तयार करण्यासाठी 30 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने ठरविले होते. यासाठी औसा तालुक्याचे प्रथम आमदार डॉ.देविसिंग चव्हाण यांनी पुढाकार घेतला. एक कुशल प्रशासक आणि बहुभाषा अभ्यासक ही त्यांची ओळख होती. भाषा व्यासंगातून उर्दू-मराठीचा अभ्यास करीत असल्यामुळे ते स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाड्यात निजाम राजवटीत उर्दू ही राजभाषा होती. तसेच मराठी बोलणाऱ्या बहुसंख्य प्रजेचा उर्दू-मराठीचा स्नेहसंबध अनेक वर्षाचा असल्याने मराठी-उर्दू शब्दकोश करावा अशी डॉ.देविसिंग चव्हाण यांची इच्छा होती. यातून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने 1981 साली हा शब्दकोश तयार करण्याची जबाबदारी देवीसिंग चव्हाण यांच्यावर सोपवली. सहाय्यक संपादक म्हणून मी काही काम पाहिले. नंतर देविसिंग चव्हाण यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे हे काम पूर्णपणे मी जबाबदारीने स्वीकारले आणि ते पूर्ण केले. देविसिंग चव्हाण यांच्या इच्छेमुळे व मराठी-उर्दू भाषेच्या समृध्दतेसाठी हा शब्दकोश तयार करण्याच्या तळमळीतून हे शब्दकोश तयार झाला.

प्रश्न - मराठी-उर्दू शब्दकोश हा दोन्ही मराठी आणि उर्दू भाषा शिकणाऱ्यासाठी कसा सहाय्यभूत ठरणार आहे?
उत्तर -
या मराठी शब्दकोशाची वैशिष्ट्ये म्हणजे मराठी शब्दांना उर्दू प्रतिशब्द देणारा हा पहिला कोश असून यात आठ हजार शब्द आहेत. देवनागरी लिपीतील उर्दूच्या प्रतिशब्दाची संख्या 24 हजार (चोवीस हजार) असून तेवढीच शब्दसंख्या उर्दूची फारशी लिपीतील आहे. सर्व मिळून 50 हजार शब्दांचा हा मराठी-उर्दू कोश तयार झाला. यामुळे भाषा अभ्यासकांना याची मोलाची मदत होणार आहे. वर्णक्रमानुसार शब्दकोशाची ‘अ’ पासून ‘अं’ पर्यंत क्रमाने शब्द लावण्यात आलेले आहेत. ज्यांची मातृभाषा मराठी आहे अशा अभ्यासकांना उर्दूत लिहिताना किंवा मराठीतून उर्दूत अनुवाद करताना मराठी शब्दासाठी योग्य प्रतिशब्द मिळतील अशी सोय आहे. यामुळे उर्दूचे मराठीत आणि मराठीचे उर्दूत अनुवाद करण्यासाठी हा मोलाचा शब्दकोश आहे.

प्रश्न - या शब्दकोशाचे विशेष काय सांगता येईल?
उत्तर -
या मराठी -उर्दू शब्दकोशाचे विशेष म्हणजे अक्षराचा क्रम मराठी प्रमाणेच ठेवण्यात आला आहे. (क्ष व ज्ञ ) ही जोडाक्षरे त्यांच्या मूळ स्वरुपात स्वीकारुन जोडाक्षरांच्या नियमानुसार ती या अक्षरामध्ये देण्यात आली आहेत. तसेच अनुस्वारयुक्त शब्द प्रथम देऊन त्यानंतर अनुस्वार रहित शब्द अकारवेल्हेप्रमाणे देण्यात आले आले आहेत. वाक्यप्रचार आणि म्हणी त्या-त्या शब्दाच्या शेवटी देण्यात आल्या आहेत. तसेच अमराठी भाषकांना अरबी-फारशी (उर्दू) लिपी तसेच उर्दू भाषकांना देवनागरी लिपीची कल्पना येण्यासाठी दोन्ही भाषेची वर्णमाला यामध्ये आहेत. हे या शब्दकोशाचे विशेष म्हणता येईल.

प्रश्न - या शब्दकोशाचा फायदा सध्याच्या काळात कशाप्रकारे होऊ शकतो?
उत्तर- उर्दू ही भाषा भारतातील अन्य भाषाचा अभ्यास आणि संशोधन करणाऱ्याला उपयोगी आहे. उर्दू भाषा असणारे प्रशासक अनेक वर्षे देशात राज्यकारभार करीत होते. त्यामुळे साहित्य व संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी त्या भाषेचा ज्ञान असणे आवश्यक होते. मराठवाड्यात जुन्या कागदपत्राचा अभ्यासात आधार घेतला जातो आहे आणि बरेच संदर्भ उर्दू भाषेतील ऐतिहासिक कागदपत्रात सापडतात. म्हणून संशोधनासाठी उर्दू भाषा अवगत असण महत्त्वाचं आहे. पण उर्दू भाषा येणारी पिढी लोप पावत आहे. भविष्यातील 20-25 वर्षात उर्दू येणारे शक्यतो सापडणार नाहीत. यासाठी उद्याच्या भावी पिढीसाठी उर्दू भाषेच्या अभ्यासासाठी गैरसोय होऊ नये म्हणून मराठी –उर्दू शब्दकोशाची निर्मिती झाली आहे.

प्रश्न :- या शब्दकोश निर्मितीमध्ये कोण कोणाचे सहकार्य लाभले आहे?
उत्तर -
स्वर्गीय डॉ. देविसिंग चव्हाण यांच्या प्रेरणेतून व त्यांच्या अध्यक्षतेखाली या शब्दकोशाचे काम सुरु झाले. यामध्ये या कोशाच्या निर्मितीसाठी गठित केलेल्या समितीमध्ये दयानंद महाविद्यालय लातूर चे तत्कालीन प्राचार्य शिवाजीराव पाटील तसेच तत्वज्ञान विभाग प्रमूख वसंतराव जगताप, हिंदी विषयासाठी सूर्यनारायण रणसुभे यांनी काम पाहिले. तसेच माझे कुटुंबिय यात माझी पत्नी, मुलगा आणि मुलगी यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

प्रश्न :- मराठी उर्दू शब्दकोश कोठे मिळू शकतो या विषयी माहिती सांगा?
उत्तर -
हा शब्दकोश शासकीय मुद्रणालय, नेताजी सुभाष रोड मुंबई, शासकीय मुद्रणालय फोटोझिंको प्रेस एरिया, जी.पी.ओ जवळ पुणे, शासकीय मुद्रणालय सिव्हील लाईन्स नागपूर, शासकीय मुद्रणालय रेल्वे स्टेशन जवळ औरंगाबाद या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असून यांचे दूरध्वनी क्रमांक मुंबई (022) 23630695, 23632693, 23631198, 23634049, पुणे (020) 26125808, नागपूर (0712) 25626115, औरंगाबाद (0240) 2331468 या ठिकाणी संपर्क करुन शब्दकोश मिळू शकतो. याची किंमत 683 रुपये आहे. पृष्ठसंख्या 760 आहे.

-मीरा ढास
सहाय्यक संचालक
विभागीय माहिती कार्यालय,
लातूर
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा