महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
स्वप्ने पाहा.. ती जगा.. एक दिवस ती पूर्ण होतात- मुमताज काजी शुक्रवार, १० मार्च, २०१७
स्वप्ने पाहा, ती जगा.. एक दिवस ती पूर्ण होतात, असे म्हणतात. मुंबई महानगरी तर स्वप्नांची नगरी मानली जाते. मुंबई ही स्वप्न पहायला आणि जगायला शिकवते. या स्वप्ननगरीत रेल्वे पटऱ्यांलगत बालपण गेलेल्या मुमताज काझी यांनीही असेच एक स्वप्न पाहिले. हे स्वप्न काही पठडीतले नव्हते.. ते काहीसे हटके होते. बालपणापासून घरापासून जोरात धावणाऱ्या लोकल गाड्या आपणही चालवाव्यात, अशी एका स्वप्नाची चाहूल मुमताज यांच्या बालमनाला लागली आणि आज हे स्वप्नच त्यांना थेट देशाच्या राष्ट्रपती भवनात नारी शक्ती पुरस्कारासाठी घेऊन आले आहे. मुमताज यांच्या स्वप्नांच्या लोकोपायलट ला राष्ट्रपती भवनाने कर्तबगारीचा हिरवा कंदील दाखविला असेच म्हणावे लागेल. या निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राने आयोजित केलेल्या मुलाखतीत आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे चालक मुमताज यांच्याशी साधलेला हा संवाद..

मुमताजजी सर्वप्रथम आपले अभिनंदन..

मुंबई ही स्वप्नांची महानगरी आहे. इथे अनेकजण स्वप्न पाहत असतात. आपल्याकडे ड्रायव्हिंग चे क्षेत्र पुरूषांचे मानले जाते. मात्र, लोको पायलट सारख्या पुरूषी वर्चस्व असलेल्या क्षेत्राकडे नेमके तुम्ही कशा वळल्या ?
मुमताज- माझे वडील रेल्वेमध्ये होते. माझे बालपण रेल्वे पटऱ्यांच्या सानिध्यातच गेले. रेल्वेशी एक अनोखे नाते जोडले गेले. माझ्या वडिलांना भेटायला येणारी मोटारमन मंडळी नेहमी गाडी गाडीचा वेग, याबाबत चर्चा करायची. सुसाट वेगाने धावणाऱ्या लोकल्स नेमक्या कशा चालवतात याबद्दलची उत्सुकताही माझ्या मनात लहानपणापासूनच होती. ही उत्स्कुताच मला इथवर घेऊन आली.

प्रश्न- मुंबई लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. आपल्या गाडीतून हजारो प्रवाशांना वाहून नेतानाचा आपला अनुभव नेमका कसा आहे ?
मुमताज- माझ्यासाठी हा खरोखरच खूप मोठा अनुभव होता. सेंट्रल रेल्वेला मी अगदी पिक अवरमध्ये पण गाडी चालविली आहे. मागे बसलेले हजारो प्रवाशी तुमच्यावर विश्वास ठेवून प्रवास करत असतात, या जबाबदारीचे भान ठेवून काम करावे लागते. अनेकदा बाका प्रसंगही गाडी चालवताना मला आला आहे. मात्र, त्यातून तावूनसुलाखून निघाले.

प्रश्न- या क्षेत्रात काम करताना काय अडचणी आल्या ?
मुमताज- अडचणी थोड्याफार आल्या पण मला मदत करणारे अनेक सहकारी मिळाले. मला सगळ्यांनी प्रेम आणि प्रेरणा दिली हे मला आवर्जून सांगावे लागेल. महिला म्हणून कोणताही भेदभाव माझ्याबाबतीत तरी झाला नाही.

प्रश्न- राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार स्वीकारताना काय भावना आहेत ?
मुमताज- मी लहानपणी आजोबांची खूप सेवा केली. त्यावेळी त्यांनी मला आशिर्वाद दिला होता. एक दिवस तुझे नाव जगभर होईल. हा पुरस्कार स्वीकारताना मला त्या आशिर्वादाची आठवण नक्कीच झाली. माझ्या कष्टाचे चीज झाले.

आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शन- उद्योजिका रीमा साठे

कार्पोरेट सारख्या प्रतिष्ठेच्या सुरक्षित क्षेत्रातील सुखवस्तू नोकरीला लाथ मारून ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा निर्णय रीमा साठे यांनी घेतला. ‘बी बोल्ड फॉर चेंज’ ही यंदाच्या महिला दिनाची संकल्पना आहे. ही संकल्पना रीमा यांनी काही वर्षांपूर्वीच अंमलात आणली. आज त्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हॅपी रूट च्या माध्यमातून झटत आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात सुखसमृद्धीची पहाट यावी, यासाठी प्रयत्नशील असेलल्या रीमा यांचा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. रीमा यांची महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी साधण्यात आलेला संवाद.

रीमाजी आपले अभिनंदन..

प्रश्न: कार्पोरेटसारखे लब्धप्रतिष्ठितांचे सुखवस्तू जीवन सोडून खेड्याकडे चला ही गांधीजींची संकल्पना तुम्ही कशी काय अंमलात आणली ?
रीमा साठे - खरे तर कार्पोरेटसारख्या क्षेत्रात काम करत असताना, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे, असे सुरूवातीपासूनच वाटत होते. शेतकऱ्यांच्या अनेक समस्याही होत्या. अखेर कार्पोरेट सोडून मी या चळवळीत झोकून द्यायचे ठरवले.

प्रश्न - थेट कृषी उत्पादन नेटवर्किंग ही संकल्पना नेमकी काय आहे ?
रीमा साठे - अनेकदा शेतकरी मोठ्या कष्टाने आपले पीक पिकवतो. मात्र, बाजारपेठेअभावी किंवा मर्यादित बाजारपेठेअभावी त्याला नुकसान सहन करावे लागते. उदाहरणार्थ विदर्भातील एखाद्या पिकाला मराठवाड्यात मागणी असते मात्र, पुरेशा ज्ञानाअभावी तसेच साधनाअभावी शेतकरी आपले पीक तिकडे पाठवू शकत नाही. अशा शेतकऱ्यांना आम्ही मदत करतो.

प्रश्न - कुक्कुटपालनाअंतर्गत १५ हजार महिलांना रोजगार मिळाला, अजून कोणत्या माध्यमातून असा रोजगार उपलब्ध होऊ शकतो ?
रीमा साठे - कम्युनिटी पोल्ट्री फार्म हा प्रकल्प मी राबवला, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे १५ हजारांच्या वर महिलांना यातून रोजगार मिळाला. शेतीपूरक उद्योगातून होणाऱ्या अशा अर्थार्जनामुळे शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे.

प्रश्न - तुम्ही ग्लोबल ते लोकल असा प्रवास केला आहे. ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावला तरच, त्या खऱ्या अर्थाने स्वावलंबी होणार आहेत. ती पहाट कधी उगवेल, असे तुम्हाला वाटते ?
रीमा साठे - ती पहाट नक्कीच उगवेल. अमरावती, अकोला आणि यवतमाळ अशा शेतकऱ्यांचे बिकट प्रश्न असलेल्या जिल्ह्यांमध्ये मी काम करत आहे. तिथल्या शेतकऱ्यांचे व विशेषतः महिला शेतकऱ्यांचे मनौधेर्य आता वाढताना दिसत आहे. कोणताही चुकीचा मार्ग अवलंबण्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आम्ही त्यांना दिशादर्शन करण्याचे काम करत आहोत.

-निलेशकुमार कुलकर्णी,
दिल्ली ब्युरो चिफ, दैनिक सामना.
०९९११५६२९२५
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा