महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
सकारात्मक विचारातून हमखास यशप्राप्ती- कोषागार अधिकारी गजानन पाटील सोमवार, १५ जानेवारी, २०१८
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना नकारात्मक विचार न बाळगता केवळ सकारात्मक विचार करावा. जिद्द व परिश्रमाची जोड दिल्यास यश हमखास मिळते. सकारात्मक विचारांच्या माध्यमातूनच यशाचे शिखर गाठता येते, असं सांगताहेत धुळे जिल्हा कोषागार अधिकारी गजानन पाटील. त्यांनी मिळविलेलं यश आणि कोषागार कार्यालयाचं कार्य याविषयीच्या माहितीसाठी त्यांच्याशी झालेली ही खास नेट भेट..

धुळे जिल्हा कोषागार अधिकारी गजानन पाटील हे धुळेकर आहेत. त्यांनी बारावी विज्ञान शाखेपर्यंतचे शिक्षण जयहिंद वरीष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर धुळे येथील कृषी महाविद्यालयातून बी. एस्सी. ची तर राहुरी, जि. अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून त्यांनी एम. एस्सी. ची पदवी घेतली. राहुरी येथील कृषी विद्यापीठाचा परिसर हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूरक आहे. तेथे कृषी एकता मंचच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा फोरम चालविला जातो. तेथेच स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक माहिती, संदर्भ ग्रंथ उपलब्ध असतात. त्यामुळे श्री. पाटील यांचा कल स्पर्धा परीक्षांकडे राहिला. जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांना यशही मिळाले.

सुरूवातीला ते आयडीबीआय बँकेच्या धुळे शाखेत कृषी विकास अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेतही त्यांनी यश मिळविले. त्यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. त्यांनी नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण अकादमीत एक वर्षाचे प्रशिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर 2007 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात निघाली. या परीक्षेचा अर्ज श्री. पाटील यांनी भरलेला होता. पूर्व, मुख्य आणि मुलाखतीच्या टप्प्यातून जात त्यांनी या परीक्षेत यश मिळविले. त्यांची 2010 मध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा अधिकारी म्हणून निवड झाली. त्यांची पहिली नियुक्ती नागपूर विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात सहाय्यक संचालक म्हणून त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेला सुरूवात केली. त्यानंतर त्यांची नंदुरबार येथे जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेथे तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर यावर्षी 24 ऑगस्ट, 2017 धुळे येथे जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून श्री. पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

शासनाची तिजोरी अथवा बँक म्हणून जिल्हा कोषागार कार्यालयाचा उल्लेख करता येईल. जिल्ह्यात वितरीत होणारा सर्व निधी, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवानिवृत्ती वेतनासह विविध देयके जिल्हा कोषागार कार्यालयाच्या माध्यमातूनच प्रदान केली जातात. याशिवाय मुद्रांकाची विक्री जिल्हा कोषागार कार्यालयाच्या माध्यमातून केली जाते.

संचालनालय, लेखा व कोषागारे आणि अधिनस्थ कार्यालये ही वित्त विभागाच्या अखत्यारीतील अत्यंत महत्वाची यंत्रणा आहे. या यंत्रणेतील कोषागारांमार्फत सर्व शासकीय प्रदाने केली जातात. तसेच सर्व प्रकारच्या शासकीय जमा रकमा जमा केल्या जातात. जमा-खर्चाच्या मुख्य लेखाशीर्षनिहाय नोंदी ठेवल्या जातात. कोषागारमार्फत विविध प्रकारच्या मुद्राकांची विक्री केली जाते. या सर्व नोंदींसह विविध शासकीय कार्यालयातून प्रदानाकरीता प्राप्त झालेली विविध शीर्षाखालील प्रमाणके महालेखाकार कार्यालयात लेखांकनाकरीता पाठविली जातात. या यंत्रणेतील अधिदान व लेखा कार्यालयाचे काम खर्चाचे प्रदान आणि जमा रकमांबाबतचे लेखे ठेवणे असे असून लेखांकन मात्र त्याच कार्यालयामार्फत केले जाते. स्थानिक निधी लेखा ही यंत्रणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीतून होणाऱ्या खर्चाचे लेखा परीक्षण करण्याकरीता अस्तित्वात आलेली आहे. विविध कोषागारे आणि अधिदान व लेखा कार्यालय यांच्यामार्फत केंद्र व राज्य शासनाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन प्रदानाचे कामही करण्यात येते.

लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना 1 जानेवारी 1962 रोजी करण्यात आली. या संचालनालयाच्या स्थापनेमुळे पूर्वी वित्त विभागाच्या प्रशासनिक नियंत्रणाखाली असलेली कोषागारे, स्थानिक निधी लेखा परीक्षा, लेखा अधिकारी (प्रशिक्षण), भांडार पडताळणी व दक्षता पथके यांच्याकडील लेखाविषयक कामे संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आली निरनिराळ्या शासकीय विभागांमधील लेखाविषयक कामांशी संबंधित अशी राजपत्रित तसेच अराजपत्रित पदे एकत्र आणता येतील, असे शासनाचे एकरुप लेखा सेवा स्थापन करण्याचे या मागील उद्दीष्ट होते. संचालक, लेखा व कोषागारे हे विभागप्रमुख आहेत. संचालनालयाचे मुख्यालय मुंबई असून पुणे, नाशिक, कोकण भवन, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथे प्रत्येकी एक या प्रमाणे त्यांची सहा प्रादेशिक कार्यालये आहेत.

सर्व शासकीय कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या देयकांचे लेखापरीक्षण करून पारीत करणे, मुद्रांक विक्री करणे, सेवानिवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, निवृत्तीवेतनधारक, संबंधित सेवानिवृत्ती वेतन बँकेत जमा करणे आदी कामे जिल्हा कोषागार अधिकारी व उपकोषागार अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून केली जातात. शासकीय देयके प्राप्त झाल्यापासून तीन ते चार दिवसांत आणि चलन भरल्यावर त्याच दिवशी ते पारीत केले जातात. तसेच महिन्याच्या शेवटच्या दिवशी निवृत्ती वेतन धारकास बँकेत मिळू शकेल मात्र मार्च महिन्याचे निवृत्तीवेतन एक एप्रिलनंतरच वितरीत केले जाते. जिल्हा कोषागार कार्यालयात जिल्हा कोषागार अधिकारी हे नियंत्रण अधिकारी असतात.

बदलत्या काळानुसार जिल्हा कोषागार कार्यालये आता ऑनलाइन झाली आहेत. कोषागार कार्यालयात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सेवार्थ प्रणाली, अनुदानाचे ऑनलाइन वितरणासाठी बीम्स प्रणाली, शासकीय इतर देयके ऑनलाइन तयार करण्यासाठी बिल पोर्टल प्रणाली, निवृत्तीधारकांसाठी निवृत्तीवेतन वाहिनी, कोषागारातील देयकांची सद्यस्थिती पाहण्यासाठी कोषवाहिनी, शासकीय भरणा ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यासाठी ग्रास प्रणाली तर निवृत्तीवेतन धारकांचे जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यासाठीची प्रणाली आदी अद्ययावत संगणक प्रणाली कार्यरत आहेत. त्यामुळे कोषागार कार्यालयांचे कामकाज सोपे व सुटसुटीत होण्यास मदत झाली आहे.

धुळे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या माध्यमातून सुमारे 16 हजार 456 निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतन अदा केले जाते. त्यात इतर राज्य, माजी आमदार, भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचा समावेश आहे. जिल्हा कोषागार कार्यालयात देयके प्राप्त झाल्यावर त्यांची शासन आदेशानुसार काटेकोरपणे पडताळणी केली जाते. त्यात काही आक्षेप आढळून आल्यास संबंधित विभागाला तसे कळविण्यात येते. आक्षेपांचे अनुपालन संबंधित विभागाने पूर्ण केल्यावर पुन्हा पडताळणी होऊन अनुपालन बरोबर केलेले आहे किंवा नाही याची पडताळणी केली जाते. डिजीटलायझेशनचा परिपूर्ण अवलंब करून कोषागाराच्या संपूर्ण कार्यशैलीमध्ये झालेल्या बदलामुळे कोषागार विभागाचे कामकाजात सुसूत्रतेसोबत तत्परता व पारदर्शीपणा दिसून येतो.

शब्दांकन : गोपाळ साळुंखे
जिल्हा माहिती कार्यालय, धुळे
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा