महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून ‘ससून’ चे स्वरुप बदलण्याचा प्रयत्न !- डॉ. अजय चंदनवाले मंगळवार, ०९ जानेवारी, २०१८
पुणे येथील बै.जी. शासकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून काम करणारे डॉ.अजय साहेबराव चंदनवाले हे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेने काम करीत आहेत. त्यांच्या कारकिर्दीत या वैद्यकीय महाविद्यालयाचे आणि रुग्णालयाचे स्वरुप बदलून गेले आहे. रुग्णसेवेला प्राधान्य तसेच सामान्य माणसांना दिलासा देण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, वैद्यकीय साधने उपलब्ध करण्याबरोबरच ११ मजली इमारत, खाटांची संख्या वाढविणे, रुग्णांच्या नातेवाईकांची सोय आणि वैद्यकीय पेशात येणाऱ्या शिकाऊ डॉक्टरांना माणुसकीचे व नैतिकतेचे प्रशिक्षण ते आपल्या आचरणातून तसेच उपक्रमातून दाखवून देत आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या कार्याचा अल्पसा परिचय या नेटभेट सदरातून...

प्रश्न : आपला जन्म, कौटुंबिक पार्श्वभूमी, शालेय व महाविद्यालय शिक्षण याबाबत काय सांगाल ?
उत्तर : माझा जन्म ४ जानेवारी १९६२ रोजी जळगांव जिल्ह्यात एका सामान्य कुटुंबात झाला आहे. माझे वडील कारकून होते. माझे शालेय व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमात जळगांवमध्ये झाले. बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयातून एम.बी.बी.एस. व एम.एस. (ऑर्थोपेडिक) १९९० मध्ये पूर्ण केले.

प्रश्न : आपण वैद्यकीय शाखेकडे कसे वळलात ? आतापर्यंत आपण कोण-कोणती पदे भूषविलेली आहेत ?
उत्तर : बालपणापासून रुग्ण म्हणून रुग्णालय व डॉक्टरांच्या संपर्कात आल्यामुळे वैद्यकीय शाखेचे आकर्षण निर्माण झाले. रुग्णसेवा ही खरी मानवसेवा आहे. मी सामान्य कुटुंबातील असल्यामुळे खासगी वैद्यकीय व्यवसायापेक्षा महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागात सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदाच्या माध्यमातून रुग्णसेवा केली आणि डॉक्टरांवर रुग्णसेवेचे उत्तम संस्कार करण्याचा प्रयत्न केला. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज ॲन्ड जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे ११ वर्षे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अधिष्ठाता पदावर निवड झाली. १३ मे २०११ रोजी बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे रुजू झालो आणि गेल्या सहा वर्षापासून ससून रुग्णाभिमुख करण्याचा प्रयत्न करीत आहे.

प्रश्न : बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे कोणकोणते अभ्यासक्रम आहेत ?
उत्तर : दरवर्षी गुणवत्तेनुसार शासन नियमानुसार पदवीसाठी २०० एम.बी.बी.एस. जागा आहेत. पदव्यूत्तर एम.डी., एम,एस., डिप्लोमाच्या १४६ जागा आहेत. अतिविशेषोपचार अभ्यासक्रम (प्लॅस्टिक सर्जरी आणि कॉर्डिओव्हॅस्‍क्यूलर थोरॅसिक सर्जरी या दोन विभागात) सुरु आहेत. तसेच नर्सिंग व पॅरामेडिकल अभ्यासक्रम सुरु आहेत.

प्रश्न : ससूनमध्ये आपण कोणत्या सुधारणा केल्या आहेत ?
उत्तर : ससून सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांसाठी १२९६ खाटा आहेत. महाराष्ट्रातून निदान व उपचारासाठी रुग्ण येतात. येथे ट्रॅामा केअर सेंटर, मणक्याची शस्त्रक्रिया (Spine surgery), खुब्याच्या शस्त्रक्रिया (Total Hip Replacement) आणि सांध्याची रोपण शस्त्रक्रिया (Total Knee Replacement) ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी, अत्याधुनिक कॅथलॅब, डायलेसीस, रुग्णांसाठी अत्याधुनिक पाकशाला (किचन) या सुधारणा केल्या आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती न्यास, पुणे यांनी दीड कोटी रुपये खर्च करुन अन्नपूर्णा भवन सुरु केले. हा प्रकल्प रोल मॉडेल म्हणून राज्यात गौरविण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्था, विविध उद्योग यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलीटी अंतर्गत दहा कोटीहून अधिक रकमेची Defibrilator, अतिदक्षता विभागात कृत्रीम श्वसन यंत्रणा (Ventilator), प्रत्येक कक्षात ईसीजी मशीन, विविध कक्षाचे नूतनीकरण, मातृदुग्ध पेढी, बुब्बळ रोपण शस्त्रक्रिया या सुविधा ससूनमध्ये आहेत. नुकताच गेल्यावर्षी ५९ खाटांचा नवजात अर्भक अतिदक्षता कक्ष ससूनमध्ये सुरु झाला आहे. मागील सहा वर्षात एकूण ७५ कोटी रकमेच्या देणगीतून ससूनला कॉर्पोरेट लूक देण्याचा व मध्यमवर्गीयांसाठी हक्काचे रुग्णालय अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. नुकतेच ससूनला आयकर खात्याचे ८० जी प्रमाणपत्र मिळाले आहे. ससूनमध्ये वैद्यकीय सामाजिक अधीक्षक विभाग उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना समुपदेशन व पुनर्वसन यासाठी कार्यरत आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन मध्यमवर्गीय रुग्णांसाठी ११ मजली इमारत व शासकीय कर्करोग निदान व उपचार रुग्णालय प्रगतीपथावर आहे. वैद्यकीय शिक्षण, रुग्णसेवा आणि संशोधन या सर्व स्तरावर ससूनमधील सहकारी डॉक्टर, परिचारिका, अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये कार्यप्रेरणा निर्माण करुन, जबाबदारीची जाणीव करुन ससूनमध्ये सकारात्मक सुधारणा केल्या. वेदनेने पिडीत असलेला रुग्ण बरा होऊन हसतमुख चेहऱ्याने घरी जावा यासाठी ससून टीम अहोरात्र परिश्रम घेत आहे.

प्रश्न : वैद्यकीय संशोधनाला आपण कसे प्रोत्साहन दिले ?
उत्तर : मी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन प्रसिद्ध केले. सध्या बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवेबरोबर वैद्यकीय संशोधनासाठी एमबीबीएसपासून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहे. रिसर्च सोसायटीच्या माध्यमातून अध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे.

प्रश्न : नवीन पिढीतील डॉक्टरांना काय संदेश द्याल ?
उत्तर : सध्या बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी समुपदेशन व मेंटरशिप योजना सुरु केली आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी अखंड ज्ञानसाधना करुन आवडीच्या क्षेत्रामध्ये अखिल मानवासाठी वरदान ठरणारी निदान पद्धती आणि औषधे, लशी अशी उपचार पद्धती यावर अधिकाधिक संशोधन करावे. आपण केलेल्या संशोधनाचा सर्व मानवासाठी उपयोग व्हावा. विद्यार्थ्यांनी ध्येयवादी बनून ‘मेक इन इंडिया’ वैद्यकीय संशोधनासाठी यशस्वी प्रयत्न करावा, असे मी आवाहन करतो.

- संग्राम इंगळे
माहिती सहायक,
विभागीय माहिती कार्यालय, पुणे
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा