महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
नाशिक विभागाची जलपरिपूर्णतेकडे वाटचाल- विभागीय आयुक्त महेश झगडे गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अतिशय महत्वाकांक्षी योजना म्हणून ‘जलयुक्त शिवार अभियान टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019’ या योजनेकडे पाहिले जाते. आज जलयुक्त शिवार अभियान ही लोकचळवळ बनली असून योजनेतील लोकांचा सहभाग वाढल्यामुळे या योजनेला शाश्वत स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळेच नाशिक विभागात या योजनेंतर्गत 2015-16 मध्ये निवडण्यात आलेल्या 941 गावांपैकी 941 गावे जलपरिपूर्ण झाली असून दुष्काळमुक्तीच्या दिशेने वेगाने वाटचाल होत आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत विभागीय आयुक्त महेश झगडे...

शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी जलसंधारण अंतर्गत उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करून राबविल्यास पिण्याचे पाणी व पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्चितपणे करता येईल, ही बाब लक्षात घेवून ‘सर्वांसाठी पाणी- टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019’ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

राज्यात साधारणपणे 82 टक्के क्षेत्र कोरडवाहू व 52 टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. या परिस्थितीवरून जलयुक्त अभियानाची आवश्यकता लक्षात येते. या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी नाशिक विभागात देखिल होत आहे.

नाशिक विभागात पावसाची सरासरी 695.9 मि.मी. असून प्रत्यक्षात 1 जून ते 30 सप्टेंबर अखेर 728.9 मि.मी. म्हणजेच 104 टक्के पाऊस झाला आहे. परंतू या पावसात असलेला खंडीतपणा, अनियमितता व सर्वत्र पाऊस पडण्याचे प्रमाण सारखे नसल्यामुळे हे अभियान राबविणे अत्यावश्यक आहे. नाशिक विभागात एकूण 5 जिल्हे, 28 उपविभाग व 54 तालुके असून 4 हजार 984 ग्रामपंचायती व 6 हजार 619 गावे आहेत.

गावांची निवड व झालेले काम :
नाशिक विभागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 2015-16 यावर्षात 941, 2016-17 मध्ये 900 व 2017-18 मध्ये 846 अशा एकूण 2 हजार 687 गावांची निवड करण्यात आली आहे. 2015-16 मध्ये निवडण्यात आलेल्या 941 गावांत 39 हजार 345 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. याअंतर्गत लोकसहभाग व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तलाव व नाल्यातील 164.39 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांसाठी 697 कोटी 51 लाख निधी खर्च करण्यात आला आहे.

या अभियानात 2016-17 मध्ये 900 गावांमध्ये 28 हजार 226 विविध जलसंधारण कामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामधील आजअखेर 22 हजार 962 कामे पूर्ण झाली असून 2 हजार 814 कामे प्रगतीत आहेत. उर्वरीत 2 हजार 409 कामे मार्च, 2018 अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत. लोकसहभागातून व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तलाव व नाल्यातील 213.70 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. 2016-17 यावर्षासाठी तयार करण्यात आलेल्या 858.64 कोटीच्या आराखड्यापैकी आजअखेर 482.19 कोटी खर्च करण्यात आला आहे.

अभियानाची फलनिष्पत्ती :
जलयुक्त शिवार अभियान 2015-16 मध्ये निवडण्यात आलेली सर्व गावे जलपरिपूर्ण झाली असून यावर्षी जलयुक्त अभियानाच्या विविध उपचारामुळे 2 लक्ष 9 हजार 221 सहस्त्र घनमीटर (टीसीएम) पाणीसाठा निर्माण झाला असून त्यात 1 लक्ष 60 हजार 193 हेक्टर क्षेत्र दोन पाणी देण्यासाठी संरक्षित सिंचनाखाली आले आहे.

2016-17 यावर्षातील निवडलेल्या 900 गावांपैकी 542 गावांमध्ये 100 टक्के कामे पूर्ण करण्यात आली असून 282 गावांमध्ये 80 टक्के, 61 गावांमध्ये 50 टक्के तर 15 गावांमध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त कामे झाली आहेत. या पूर्ण झालेल्या कामांत विविध उपचारामुळे 1 लक्ष 41 हजार 426 सहस्त्र घनमीटर (टीसीएम) पाणीसाठा निर्माण झाला असून 1 लक्ष 14 हजार 820 हेक्टर क्षेत्र दोन पाणी देण्यासाठी संरक्षित सिंचनाखाली आले आहे.

2017-18 वर्षाचे नियोजन :
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 2017-18 या वर्षासाठी नाशिक विभागात 846 गावांची निवड करण्यात आली असून गावपातळीवर पाणलोटाचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. गावस्तरावरील प्रशिक्षण सप्टेंबर, 2017 अखेर पूर्ण करण्यात आले असून या प्रशिक्षणाअंतर्गत गावातील सरासरी सहा प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 2017-18 यावर्षापासून निवडलेल्या गावाचे शिवार ऐवजी निवडलेल्या गावाचे पाणलोट क्षेत्र हे जलयुक्त शिवार अभियानाचे घटक ठरविण्यात आले आहेत.

याअनुषंगाने निवडलेल्या गावांचा संपूर्ण पाणलोट क्षेत्राचा विकास, माथा ते पायथा या तत्वावर करण्यात येत आहे. त्यामुळे वरच्या भागात 70 टक्के क्षेत्र विकासाच्या कामांसोबतच खालच्या भागात 30 टक्के ड्रेनेज लाईन (ओघळ नियंत्रण) उपचाराच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या जलसाठ्यांमध्ये गाळ साचणार नाही. यानुसार 2017-18 च्या गाव आराखड्यांमध्ये नव्याने सुधारणा करण्यात आल्या असून त्यानुसार जिल्हा आराखडे तयार करण्यात आले आहेत.

-शब्दांकन : अर्चना वि. देशमुख
सहायक संचालक (माहिती),
विभागीय माहिती कार्यालय, नाशिक
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा