महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
अलिबागचा पहिला फ्लाईंग ऑफिसर दर्शन जैन शुक्रवार, ०५ ऑक्टोंबर, २०१८
अलिबाग शहरात राहणारे दर्शन हसमुख जैन यांची नुकतीच भारतीय हवाई दलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. उदरनिर्वाहासाठी भरपूर पगाराची नोकरी सोडून दर्शन जैन यांनी सैन्यदलात सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि जिद्द व चिकाटीच्या जोरावर सर्व कठीण निवड चाचण्या पार करुन ते फ्लाईंग ऑफिसर म्हणून आज हवाई दलात सेवा बजावत आहेत. त्यांच्या या जिद्दीच्या प्रवासाविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न- आपली शैक्षणिक वाटचाल कशी राहिली?
मी दर्शन जैन माझे वडील हसमुख व आई सुनिता हे राजस्थान राज्यातील पाली जिल्ह्यातील खिवानजी या छोट्या गावातून सोने चांदी व्यवसायासाठी अलिबाग येथे आले आणि माझा जन्म अलिबाग शहरात झाला. ज्या शाळेत भारताचे भूदलाचे तेरावे प्रमुख जनरल अरुण कुमार वैद्य शिकले त्या शाळेत म्हणजे कोकण एज्युकेशनच्या इंडस्ट्रियल शाळेत मी 10 वी पर्यंत शिकून 12 वी पर्यंत राजस्थान पाली येथे शिक्षण घेतले. त्यानंतर जयपूर येथील जयपूर इंजिनियरिंग कॉलेज मधून सिव्हिल इंजिनियरिंग डिग्री घेतली.

प्रश्न - आपण नोकरी की व्यवसाय केला ?
मी जयपूर इंजिनियरींग कॉलेज मध्ये शेवटच्या वर्षात असताना कॉलेजमध्ये कँम्पस मुलाखत हैद्राबाद येथील पाटील रेला ग्रृप प्रा.लि.चा झाला होता आणि निकाल लागताच माझी कंपनीच्या हरिद्वार येथील प्लॅटमध्ये सहायक इंजिनिअर म्हणून नेमणूक झाली.

प्रश्न- नोकरी उत्तम असताना आपण सैन्यात दाखल होण्याचा निर्णय का घेतला?
मी हरिद्वार येथे काम करीत असताना माझे दोन जयपूर कॉलेजचे सहकारी इंजिनियर मित्र सुभाष राव याने एअर फोर्स मध्ये पायलटची परीक्षा दिली होती. त्यामध्ये ते पास झाले नव्हते, त्यांना माझ्या इंजिनियरींग मधील अभ्यासाबाबत माहिती होती. आणि त्यांनी मला सुचविले की, येथे नोकरी करण्यापेक्षा आपण भारतीय सैन्यात दाखल होऊन देश सेवा करु या. त्याप्रमाणे आम्ही नेव्ही, कोस्ट् गार्ड आणि मी एअर फोर्स ची परीक्षा देण्याचे ठरविले.

प्रश्न- या परीक्षेचे स्वरुप कसे असते?
सन 2015 ला आम्ही तिघांनी आपापल्या क्षेत्रासाठी फॉर्म भरला. मी पहिल्याच परिक्षेत पास झालो. विशेष म्हणजे 300 मार्काच्या लेखी परिक्षेत 140 मार्काची पास होण्यास आवश्यकता असते मला 170 मार्क मिळाले. त्यानंतर 2 महिन्याने स्टाफ सिलेक्शन बोर्डाची परीक्षा द्यावी लागते. मी एअर फोर्स, सुभाष राव ने कोस्टगार्ड तर सौरभ इंडियन नेव्ही मध्ये दिली. आमची नोकरी हरिद्वारला सुरु ठेवली होती आणि 8 महिन्यांनी मेडिकलला बोलावण्यात आले. आपल्या देशात एअर फोर्स मध्ये फार वैमानिकाची गरज असल्याने मी येथे सेवा करण्याचे ठरविले होते. यासाठीची वैद्यकीय चाचणी अतिशय कडक घेण्यात येते. त्यानंतर मे 2016 ला या परिक्षेचा निकाल जाहीर झाला. आम्ही निवडले गेल्याबद्दल मला माझा मित्र सुभाष राव ने फोन केला, अतिशय आनंद झाला होता. कारण मी एअर फोर्स मध्ये पायलट म्हणजेच फ्लाईंग ऑफिसर तो सुभाष राव कोस्टगार्ड मध्ये कमांडर आणि सौरभ नेव्हीमध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्त झालो होतो. त्यानंतर मी बंगलोरला प्रशिक्षणास गेलो.

फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झाल्यावर कुटुंबियांची प्रतिक्रिया?
माझी निवड झाल्याची माहिती प्रथम मी अलिबागला आई वडिलांना कळविली. वडील सामाजिक कार्यकर्ते असल्याने त्यांनी अभिनंदन करुन उत्तम देशसेवा कर असे सांगितले तर काही नातेवाईक आपला पारंपरिक व्यवसाय, उत्तम नोकरी सोडून सैन्यात कशाला गेलास अशीही प्रतिक्रिया मिळाली असो. मी बंगलोरला प्रशिक्षणास जाण्यापूर्वी आई-वडीलांचा आशीर्वाद घेण्यास अलिबागला आल्यावर आमच्या समाजाच्या मंडळाने माझा गौरव केला याचा मला अभिमान आहे.

प्रश्न –फ्लाईंग ऑफिसर झाल्याचा तुमचा अनुभव काय?
ट्रेनिंग सेंटरमध्ये अधिकाऱ्यांच्यामुळे देशसेवा कशी असते आणि 'मेरा देश महान' कसा असतो याचा पावलोपावली अनुभव येऊ लागला. विशेषत: आमच्या समाजातील मुले सैन्यात भरती होत नाही पण मी अलिबागेतील पहिला सैन्यातील फ्लाईंग ऑफिसर झालो. आता मी देशभरातील युवक युवतींना सांगेन या क्षेत्रातही आपण येऊन देशसेवा करा. सध्या मी उत्तरप्रदेश मधील सहारापूर येथील भारतीय एअर फोर्स स्टेशनला कार्यरत आहे.
मी आकाशात झेप घेतो तेव्हा मला अभिमान वाटतो, मेरा देश महान...!!!

जयपाल पाटील,
ज्येष्ठ पत्रकार
मो. 9673727277
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा