महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
एकत्र येऊन नवी शेतक्रांती घडवूया - डॉ. प्रशांत नारनवरे सोमवार, १७ एप्रिल, २०१७
महाराष्ट्र शासनाच्या ‘महान्युज’ या वेब पोर्टलवर आपण विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या अनेकांच्या मुलाखती घेत असतो. एकूणच समाजबांधणीत ज्यांनी आपल्या अधिकार क्षेत्रात व्यापक काम करून मोठा वाटा उचलला आहे अशांच्या अनुभवांची मांडणी आपण आपल्या वाचकांसाठी करतो. आज नेटभेट या सदरात शेतकऱ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवून उस्मानाबाद जिल्ह्याला वेगळा लौकिक मिळवून देणारे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याशी केलेली खास बातचीत.

उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी तुम्ही कुठे कार्यरत होता? त्या प्रवासाबद्दल काय सांगाल..?
उस्मानाबाद इथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी मी सांगली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी अनेक ग्राम विकासाच्या योजना आम्ही त्या जिल्ह्यात राबविल्या आहेत. विशेषतः स्वच्छ महाराष्ट्र या उपक्रमाद्वारे आम्ही ग्रामीण भागात पोहचलो. या अभियानातील यशाबद्दल महाराष्ट्र पंचायत राज पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते आम्हाला गौरविण्यात आले आहे. एकंदरीत ग्रामीण विकासही संकल्पना घेऊन मी नेहमी वाटचाल केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कामाची सुरूवात कशी झाली ?
मी जेव्हा जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो तेव्हा तिथे भीषण दुष्काळाचे तिसरे वर्ष सुरू होते. अत्यल्प पर्जन्यमान असल्याने अनेक समस्या आ वासून उभ्या होत्या. पहिल्यांदा जिल्ह्याला या दुष्काळाच्या फेऱ्यातून बाहेर काढण्याचे आम्ही ठरविले. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेची आम्ही प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. जलसंवर्धनासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. तसेच भूजल पातळी वाढविण्यासाठी शेततळ्यांच्या माध्यमातून त्यांचे एकत्रीकरण करून आम्ही प्रयत्न सुरू ठेवले. आणि त्याचा परिणाम म्हणून आम्ही जिल्हा टँकरमुक्त केला. पूर्वी जिल्ह्यात ४५० टँकरची गरज भासायची. तसेच शेतकऱ्यांच्या मालाचे वितरण, जाहिरात आणि निर्मिती यावर भर दिला. आज शेतकरी किमान दोन पिके घेऊ शकत आहे.

कृषीक्रांती व इतर उपक्रम आपण कशा प्रकारे साकारलेत ?
शेतकरी हा समाजाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा कणा असल्याने त्याच्या विकासावर भर देण्याचे आम्ही ठरविले. दुष्काळजन्य परिस्थितीवर मत करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना एकत्र करून कृषी गटाच्या माध्यमातून आम्ही त्यांना आत्मविश्वास दिला. वर्षभरात २ लाख ८८ हजार शेतकऱ्यांचे एकत्रीकरण करून आम्ही १४ हजार सहाशे शेतकरी गट तयार केले. शेतकऱ्यांच्या ५८ प्रायवेट कंपन्या तयार केल्या. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे त्यातील काही कंपन्यात पूर्ण महिला कामगार काम करत आहेत. काही डेअरीमध्ये पूर्ण महिला कामगार काम करत आहेत. आजवर आम्ही तीन डेअरींचे ब्रँड आणि एक बियाणे उत्पादक कंपनी सुरू केली. उस्मानाबाद जिल्हा सीड फेडरेशन अंतर्गत ३५ कंपन्या एकत्र येऊन सध्या काम करत आहेत.

कृषी क्षेत्रातील हा बदल आपण कशा प्रकारे घडवून आणलात ?
तसे पाहिल्यास आमच्या या यशस्वी वाटचालीमध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आम्ही इथपर्यंत पोहचू शकलो. आणि विशेष म्हणजे आमच्या अधिकारी वर्गाने दिलेल्या अभूतपूर्व सहकार्याने, समन्वयाने आम्ही प्रगती करू शकलो. आम्ही अधिकाऱ्यांचे गट तयार करून योजनांचे विकेंद्रीकरण केले. जि.प. विभागातील सर्व अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन वैचारिक बैठका घेतल्या. अनेक कार्यशाळा घेतल्या. मी स्वत: ४५० कार्यशाळा घेतल्या आहेत. तब्बल ३ हजार पाचशे बैठका घेऊन आम्ही पुढील वाटचाल ठरविली.

विकास योजनांची अंमलबजावणी कशी केलीत आणि त्यात कोणत्या समस्या जाणवल्या ?
आम्ही सुरूवातीला शेतकऱ्यांच्या गरजा समजावून घेतल्या. केवळ शेतमालाचे उत्पादन घेऊन उपयोग नाही याची जाणीव आम्हाला होती. शेतमालाचे ब्रँडीग आणि मार्केटिंग याचा आम्ही विचार केला. शेतकऱ्याला योग्य मोबदला कसा मिळेल याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष दिले. प्रक्रिया साठवणूक आदी बाबींवर आम्ही काम केले. शेतीचे व्यावसायीकरण करण्यावर भर दिला. उच्च तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. यात तरुणांचा मोठा सहभाग आम्हास मिळाला. एक सीड कंपनी उभा केली. भूममध्ये आम्ही खवा क्लस्टरच्या माध्यमातून निर्मिती आणि प्रक्रिया हा प्रकल्प कार्यरत केला. तसेच दुधातील तीन ब्रँड विकसित केले. पाडोळीकर दूध, भवानीशंकर दूध आणि मराठवाडा दूध हे ते ब्रँड होत. जिल्ह्यातून दुधाचे संकलन शेतकरी स्वतः करतात. या सर्व प्रक्रियेत संपर्कासाठी सोशल माध्यमांचा वापर करतात. ग्राहकांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला जातो. तसेच उस्मानाबादी शेळ्यांना खूप मागणी असल्याने उस्मानाबादी गोट ब्रिडर्स असोसिएशन स्थापना करून दीड वर्षात ३१५ उस्मानाबादी शेळीचे गोट फार्म तयार केले. त्याचबरोबर कडकनाथ कोंबड्यांना वाढती मागणी लक्षात घेता महिलांना कोंबड्यांचे वाटप केले. या कोंबड्यांची विक्री ओएलक्सवर केली जाते. या सर्व बाबींमुळे गावाचे अर्थकारण बदलण्यास मदत झाली. यासर्व बाबतीत सुशिक्षित तरुणांचा सहभाग महत्त्वाचा ठरला. पॉली हाऊसच्या माध्यमातून जरबेराचे उत्पादन घेऊन ४५० क्लस्टरच्या माध्यमातून विक्री केली. याकामी मुख्यमंत्री महोदय तसेच कृषिमंत्री यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सावकारी समस्येवर कशी मात केलीत?
रोजगाराची माध्यमे उपलब्ध झाल्याने शेतकऱ्याचे अर्थकारण सुधारण्यास मदत झाली त्यामुळे काही प्रमाणात आपण आत्महत्येस प्रतिबंध करू शकलो. आशा आणि अंगणवाडी सेविकांना समुपदेशन प्रशिक्षण दिल्याने शेतकऱ्यांशी थेट जोडले गेलो त्यामुळे समस्या चांगल्या पद्धतीने हाताळता आली. तसेच सर्वांसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन केला. सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी सावकारी प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरु केली. गहाण पडलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत त्यास दिल्या गेल्या. यासर्व कामामध्ये सामाजिक संस्थांचा मोठा हातभार मिळाला. महिलांच्या विशेष पुढाकारामुळे यासर्व बाबींवर काम करू शकलो. गटाच्या माध्यमातून सर्वजण एकमेकांशी जोडले गेल्याने त्यांच्यात आत्मविश्वास दुणावला. बीज उत्पादन ते शेतीचे यांत्रिकीकरण केल्याने व बचत गट आणि शेती गटांना खते तसेच बी बियाणे विक्रीचे परवाने दिल्याने त्यांच्यात आत्मविश्वास आल्याचे दिसून आले. या सर्वांचा अमुल्य सहभाग असल्याने आम्ही यशस्वी होऊ शकलो.

महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल ?
आम्ही केलेल्या यशस्वी उपक्रमामुळे अनेक जिल्ह्यांनी आमच्या पाऊलावर पाऊल टाकून वाटचाल सुरू केली आहे. मध्यप्रदेशातही कडकनाथ कोंबडीवरती संशोधन सुरू आहे. शेतकऱ्यांना मी हेच सांगेन कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल तरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवा. शासन आपल्या पाठिशी आहे. बदलत्या जगाचा मागोवा घेऊन उत्पादन ते मार्केटिंग आदी बाबींचा सखोल अभ्यास करून उत्पादनात योग्य बदल करा. चला तर मग एकत्र येऊन नवी शेतक्रांती घडवूया...

शब्दांकन
सचिन पाटील
९५२७७७७७३२
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा