महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
मराठी भाषेच्या नियमित वापराने भाषा संवर्धनाला अधिक चालना मिळेल- भाषा संचालक हर्षवर्धन जाधव बुधवार, १० जानेवारी, २०१८
भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्राची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. महाराष्ट्रात मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे नऊ कोटी असून मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी १ ते १५ जानेवारी या कालावधीत 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' आयोजित केला जातो. यानिमित्ताने मराठी भाषा संचालनालयाचे संचालक हर्षवर्धन जाधव यांची घेतलेली नेटभेट...

प्रश्न : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याविषयी काय सांगता येईल ?
उत्तर : राज्यात २०१३ पासून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो. पूर्वी तो १ मे ते १५ मे या कालावधीत होत होता. पण आता जानेवारी २०१५ पासून तो १ ते १५ जानेवारी या कालावधीत साजरा केला जातो.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात वाचन संस्कृती, व्याख्याने, ग्रंथप्रदर्शन, लोककला आदींचा समावेश असल्याने यामध्ये शाळा व महाविद्यालये यांचा सहभाग आवश्यक आहे. भाषा संवर्धन उपक्रमामध्ये शासकीय कार्यालयाबरोबरच शैक्षणिक संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी दि. १ ते १५ मे या कालावधीत बदल करून तो १ ते १५ जानेवारी या दरम्यान साजरा केला जातोय.

१९६४ ला मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. तिचा प्रशासकीय कामात वापर वाढावा, व्यवहारात ती जास्तीत जास्त यावी यासाठी शासनस्तवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अमराठी लोकांना मराठी भाषेची ओळख व्हावी, त्रिभाषा सूत्रानुसार केंद्रीय कार्यालयात मराठी भाषेतून परिपत्रक मिळावीत यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत व्यवहारात, रोजच्या जगण्यात मराठी भाषा वापरल्यास तिचे जतन व संवर्धन आपोआप होईल. मराठी भाषेचा गौरव वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे.

प्रश्न : मराठी भाषा पंधरवडा या कालावधीत कोण-कोणत्या उपक्रमांचे आयोजन केले जाते ?
उत्तर : या कालावधीत संचालनालयाच्या पुणे, औरंगाबाद, नागपूर, नवी मुंबई या वेगवेगळ्या विभागांमध्ये तज्‍ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्र, स्पर्धा, वाचन कार्यक्रम, लोककला, लोकसाहित्य, परिभाषा, संवाद, ग्रंथ प्रदर्शन, वेगवेगळ्या टिपण्या काढणे असे विविधांगी कार्यक्रम राबवले जात आहेत.

दि. ४ जानेवारी २०१८ ला मराठी भाषा संचालनालयाकडून मुंबईत 'मराठी भाषा गौरव दिंडी' काढण्यात आली. या दिंडीत भाषा संचालनालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर, वांदे (पूर्व) येथील विद्यार्थी, शिक्षक पारंपरिक वेशभूषेत अत्यंत उत्साहात सहभागी झाले होते.

दिंडीतील पालखीमध्ये मराठी भाषेच्या गौरवार्थ भारताच्या संविधानाची मराठी आवृत्ती व मराठी भाषेतील अन्य ग्रंथ ठेवण्यात आले होते. दिंडीमधील सहभागी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा गौरव करणारे अभंग, ओवी व कविता यांमधील ओळी लिहीलेले फलक हाती घेतले होते. मराठी भाषेच्या गौरवार्थ विद्यार्थी व अधिकरी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या घोषणांनी अत्यंत उत्साहवर्धक व चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते..

मुंबई उपनगर जिल्हा प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणातून या दिंडीचा शुभारंभ व सांगता झाली. ही दिंडी वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीतून काढण्यात आली.

याचबरोबर दि. ४ व ५ जानेवारी २०१८ या दोन्ही दिवशी ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले होते. भाषा संचालनालय, शासकीय मुद्रणालय चर्नीरोड, मुंबई व राज्य मराठी विकास संस्था यांनी या पुस्तक प्रदर्शन व विक्री कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. या ग्रंथ प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेले महापुरुषांचे गौरव ग्रंथ व अन्य साहित्य तसेच भाषा संचालनालयाने प्रसिद्ध केलेले विविध कोश व परिभाषा कोश आणि राज्य व केंद्रीय कायदे व नियम मांडले होते. या ग्रंथ प्रदर्शनास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणात ग्रंथांची व पुस्तकांची विक्री झाली. तसेच दि. ५ जानेवारी २०१८ रोजी प्रा. भालचंद्र पाठक यांचे 'मराठी भाषेच्या उद्गम व विकासात संतांची भूमिका व कार्य' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

१ ते १५ जानेवारी पर्यंत अशा विविधांगी उपक्रमांनी संचालनालयाच्या विविध कार्यालयांच्या माध्यमातून असा रंगतदार पंधरवडा साजरा होत आहे.

प्रश्न : हा पंधरवडा खूप उत्साहवर्धक पद्धतीने साजरा होत आहे. सर, मराठी भाषा संचालनालयाच्या स्थापनेचा मूळ उद्देश काय आहे तो सांगाल?
उत्तर- दि. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्य हे लोक कल्याणकारी राज्य ठरावे, महाराष्ट्रात अंतर्भूत झालेल्या घटक प्रदेशातील लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण व्हावी आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधता यावा यादृष्टीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिवशी त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शासनाची जी महत्वाची धोरणे जाहीर केली त्यापैकी महाराष्ट्राच्या राज्यकारभाराची भाषा मराठी राहील हे एक धोरण होय. मराठीचा शासन व्यवहाराची भाषा म्हणून विकास घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६० मध्ये सामान्य प्रशासन विभागांतर्गत भाषा संचालनालयाची स्थापना केली आणि मराठीतील नामवंत कोशकार, भाषातज्‍ज्ञ, पत्रकार व समाज प्रबोधक यांचा अंतर्भाव असलेले एक भाषा सल्लागार मंडळ नेमले. या सल्लागार मंडळाच्या मार्गदर्शनाखाली शासन व्यवहारातील मराठीची जडणघडण करण्याचे काम सुरू झाले. विविध विषयातील शास्त्रीय व तांत्रिक परिभाषा निर्मितीसाठी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विद्यापीठातील तज्‍ज्ञ प्राध्यापक प्रतिनिधींचा अंतर्भाव असलेल्या उपसमित्या स्थापन करण्यात आल्या व त्यांच्या साहाय्याने परिभाषा निर्मितीचे काम सुरु झाले.

प्रश्न : स्थूलमानाने भाषा संचालनालयातील कामकाजाचे वर्गीकरण कशा प्रकारे करता येईल ?
उत्तर- यामध्ये १) प्रशासनिक परिभाषा कोश व मार्गदर्शक पुस्तिका तयार करणे,
२) महाविद्यालयीन अभ्यासासाठी शास्त्रीय व तांत्रिक परिभाषा तयार करणे.
३) विधिविषयक अनुवाद व परिभाषा तयार करणे.
४) अर्थसंकल्पीय तसेच प्रशासनिक व विभागीय नियमपुस्तकांचा अनुवाद करणे.
५) शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एतदर्थ मंडळाच्या मराठी /हिंदी परीक्षा आयोजित करणे.
६) महाराष्ट्र राज्यातील केंद्र शासनाच्या कार्यालयात त्रिभाषा सूत्राचा वापर करणे.
७) इंग्रजी लघुलेखक, टंकलेखक, लिपिक-टंकलेखक यांच्यासाठी मराठी लघुलेखक व टंकलेखन परीक्षा आयोजित करणे.
८) शासन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर करण्यासंबंधीच्या धोरणाची अंमलबजावणी आणि त्यादृष्टीने कार्यालयांची तपासणी व त्यांना मार्गदर्शन करणे.
या कामांचा समावेश आहे.

प्रश्न : शब्दकोश व परिभाषा कोश यामध्ये नेमका फरक काय आहे?
उत्तर- शब्दकोश म्हणजे एका भाषेतील शब्दांचे दुसऱ्या भाषेत अर्थ व्यक्त करणारा शब्दार्थांचा संग्रह होय. शब्दकोश भाषानिष्ठ असतो. उदा. इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ किंवा मराठी शब्दांचे इंग्रजी अर्थ देणारा शब्दसंग्रह. शब्दकोशात सामान्य व नित्य उपयोगाचे शब्द असतात. शब्दकोशात एकाच शब्दास वेगवेगळे अर्थ, अर्थछटा, सजातीय शब्द व शब्दकुळे दिलेली असतात.

विशिष्ट कला, विज्ञान, शास्त्र, तंत्रज्ञान, व्यवसाय, व्यापार, उद्योग इ. क्षेत्रातील विषयांशी व ज्ञानशाखांशी संबंधित असलेल्या किंवा त्यात वापरल्या जाणाऱ्या शास्त्रीय व तांत्रिक स्वरूपाच्या संज्ञा व शब्द आणि त्यांचे त्याच भाषेतील किंवा अन्य भाषेतील अर्थ यांचा समावेश असलेल्या कोशास किंवा शब्दसंग्रहास 'परिभाषा कोश' म्हणतात.

पारिभाषिक शब्द नव्याने तयार केले जातात. दुसऱ्या भाषेतून किंवा विषयातून घेतले जातात. अस्तित्वात असलेल्या शब्दावर प्रक्रिया करून दुसरा शब्द तयार केला जातो किंवा वेगळा अर्थ देऊन तयार केले जातात..

परिभाषा कोशांचे प्रकार. उदाहरणार्थ :
१) कलाविषयक - स्थापत्यशास्त्र परिभाषा कोश, साहित्यशास्त्र परिभाषा कोश.
२) वैज्ञानिक- जीवशास्त्र, भौतीकशास्त्र, रसायनशास्त्र परिभाषा कोश.
३) तांत्रिक- यंत्र अभियांत्रिकी ,विदुत अभियांत्रिकी , माहिती तंत्रज्ञान व संगणकशास्त्र परिभाषा कोश .
४) शास्त्रीय- गणितशास्त्र, खगोलशास्त्र, भूगोलशास्त्र, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र परिभाषा कोश.

प्रश्न : आतापर्यंत किती परिभाषा कोशांची निर्मिती झाली आहे?
उत्तर- आतापर्यंत ३४ परिभाषा कोश/ शब्दकोश तसेच शासन मार्गदर्शन पुस्तिकांची निर्मिती केली आहे. सध्या पाच परिभाषा कोशांचे काम पूर्णत्वाकडे आहे. इथून पुढे २९ परिभाषा कोशांचे काम पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे.

या 29 परिभाषा कोशांच्या निर्मितीसाठी आम्ही योजना तयार करणार आहोत. यामध्ये त्या त्या विषयातील सेवानिवृत्त प्राध्यापक, अनुभवी प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांना तो विषय प्रकल्प स्वरूपात देऊन त्यांच्याकडून आम्ही पूर्ण करून घेऊ. विशेषतः विषयानुरूप संशोधक विद्यार्थ्यांना ही नामी संधी आहे.

प्रश्न : मराठी भाषा संवर्धनसासाठी संचालनालयाकडून भविष्यातील काय योजना आहेत?
उत्तर- आम्ही लवकरच हे कोश ऑनलाईन करणार आहोत.
- भ्रमणध्वनी अॅप आम्ही येणाऱ्या काही दिवसात लाँच करतोय. त्यामध्ये कार्यदर्शिका, प्रशासन, वाक्यप्रयोग, शासनव्यवहार कोश, न्याय व्यवहार कोश आदी सगळं एक क्लिकवर उपलब्ध होईल.
- यामध्ये मराठी व इंग्रजी वर्णमालेनुसार शब्दकोश तयार केला आहे.
- तसेच तुम्हाला हवा असणारा शब्द उच्चारताच ती अक्षरे स्क्रीनवर उमटतील, अशी सोयही या अॅपमध्ये आहे.
- कोश तयार करताना शब्दांना पर्यायी शब्द सुचवण्यासाठी आम्ही लोकांना आवाहन करून त्यांचे शब्द स्वीकारून कोष बनवण्यात त्यांना सहभागी करणार आहोत. पब्लिक डोमेन स्वरूपात हा उपक्रम असेल.

एकंदरीत फक्त पंधरवड्यापुरतेच नाही तर वर्षभर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, समृद्धीसाठी आपण हे वेगवेगळे उपक्रम राबवणं, आधुनिक सामग्रीची मदत घेणं, लोकांचा सहभाग वाढवणं हे सगळे प्रयत्न होत आहेत. यामुळे मराठी भाषेची गोडी अधिक वाढेल तसेच मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन होण्यासही निश्च‍ितच मदत होईल.

शब्दांकन- वृषाली वसंतराव बर्गे
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा