महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
बहुभाषिक साहित्य वाचकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न - डॉ.सुनीलकुमार लवटे मंगळवार, १८ एप्रिल, २०१७
सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूरचे डॉ. सुनीलकुमार लवटे यांना महाराष्ट्र भारती अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव हिंदी सेवा पुरस्कार देण्यात आला. यानिमित्ताने डॉ.लवटे यांच्याशी साधलेला संवाद...

आपल्याला देण्यात आलेल्या पुरस्काराविषयी महाराष्ट्र भारती अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव हिंदी सेवा पुरस्काराविषयी..
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे आयोजित वार्षिक पुरस्कार कार्यक्रमात अहिंदी भाषी हिंदी साहित्यिक श्रेणीतील अखिल भारतीय महाराष्ट्र भारती पुरस्कार मला प्रदान करण्यात आला आहे. १ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मी आतापर्यंत लिहिलेल्या मराठी साहित्याची हिंदी भाषांतरे, वि. स. खांडेकरांच्या अप्रकाशित, असंकलित साहित्याच्या २५ ग्रंथाच्या संपादनाचा बृहद प्रकल्प, हिंदी अभ्यासक्रमात मौलिक लेखनाद्वारे योगदान, आदी स्वरूपातील कार्याची नोंद घेत राज्य शासनाने या पुरस्काराने मला सन्मानित केले आहे.

अनाथ मुलांशी लगेचच आपली नाळ जोडली जाते आणि अनाथ मुलांचे नाथ असे आपल्याला म्हटले जाते याविषयी..
मला असे वाटते की, मी स्वतः निराधार असल्याने मला निराधार किंवा अनाथ असण्यामागे नेमके काय दु:ख काय असते हे माहित होते. आणि त्यामुळे १९८० पासून मी अनाथ, निराधार मुलांमुलीच्या व महिलांच्या संगोपन, शिक्षण आणि पुनर्वसनासंबंधातील काम सुरु केले.

अनाथ मुलांना सनाथ कुटुंब देण्यासाठी सदोदित कार्यरत असणारे असे अनेक ठिकाणी माझी ओळख करून दिली जाते. पण मुळातच मला असे वाटते की, समाजाप्रती आपले देणे आहे अशी भावना निर्माण होणे गरजेचे आहे. छोटीशी परंतु सकारात्मक प्रयोगशील कृतीही जग बदलवू शकते. मला असे वाटते की, मी घेतलेले शिक्षण लोकांना देण्याची जास्त गरज मला वाटू लागले. मी अनाथपणाचे चटके सोसलेले होते. मला असे वाटते की माणसाला संपूर्ण आयुष्यात केवळ दोन गोष्टींचा मुख्य आधार लागतो तो म्हणजे पैसा आणि माणुसकी. माझे बालपण रिमांड होम येथे गेले आणि तेथून बाहेर पडल्यावर पुन्हा एक अनाथ म्हणून जगावे लागणार याची जाणीव झाल्यावर मी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक शिक्षकाची नोकरी करीत असताना पीएचडी पूर्ण केली. रिमांड होम मध्ये वाढलेला मुलगा त्यावेळी डॉक्टर होणे ही त्यावेळी एकमेव घटना असेल.

आपण रिंमाड होम सुधारण्यासाठी काम केले आहे याविषयी काय सांगाल..
पीएचडी झाल्यावर जेव्हा माझा सत्कार झाला तेव्हाच मी ठरवले की, रिमांड होममध्ये काम करुन त्याबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन बदलायचा. प्रत्येक जिल्ह्यात मुलांबरोबरच मुलींचेही रिमांड होम स्थापन करुन त्याची रुपरेषा बदलली. रिमांड होम तुरुंग न वाटता मुलांना घर वाटावे म्हणून ड्रेस कोड बदलला. जे मुल शिकत होते, त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या मुलाला आसरा दिला. मुलांचा कौटुंबिक विकास साधताना अनाथ मुलांची सनाथ घरे उभारली. तुटणारी नाती जोडण्याचे काम करण्याचे ध्येय आता आयुष्य बनले आहे. आपल्या हक्कांबरोबरच इतरांमध्येही अधिकारांची भावना जागवणे, हीच मानवाधिकाराची संकल्पना असून, मानवी हक्क ही मनुष्याच्या विकासाची ओळख आहे. त्यामुळे आगामी काळात आपले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी लढाई लढावी लागणार आहे असे मला वाटते.

आपले बरेचसे लेखन हे वास्तवाशी निगडीत आहे याविषयी काय सांगाल..
सर्वसामान्यांपेक्षा वंचितांचे जीवन वेगळे असते. समाजाने बहिष्कृत केलेल्या या लोकांना माणुसकीची वागणूक मिळत नाही, परंतु प्रतिकूल परिस्थतीही ही माणसे मोडून पडत नाहीत आणि जिद्दीने कशी कशी उभी राहतात, याचे वास्तव आणि कथात्म दर्शन मी माझ्या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वच गोष्टींचा वेध घेण्याचा प्रयत्न मी ‘निराळं जग, निराळी माणसं’ या पुस्तकात केला आहे. नव्याने काहीतरी करण्याची जिद्द बाळगतात. दु:खाला न गोंजारता आपले मार्ग शोधणाऱ्या शौर्यगाथा ‘दु:खहरण’ या कथासंग्रहात मी मांडलेल्या आहेत. एकविसाव्या शतकातील समग्र शिक्षण या पुस्तकात भारतीय शिक्षणव्यवस्थेत आज आमूलाग्र बदल होत आहेत त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या बदलांचा स्वीकार करतानाच पारंपरिक शिक्षणव्यवस्थेला अनेकदा दुय्यम स्थान दिलं जातं. वरवर पाहता हे बदल शिक्षणव्यवस्थेत मोठी क्रांती घडवून आणतील, असं वाटत असलं तरीही ते किती फोल आहेत, याची जाणीव हे पुस्तक वाचताना होते.

आपण मराठी आणि हिंदीतील बरेच साहित्य लिहिले आहे याविषयी काय ?
सुरुवातीच्या काळात मी विविध शाळामध्ये अध्यापनाचे कार्य केले. त्यामध्ये हिंदी हा माझा आवडता विषय असल्याने मी पीएच.डी हिंदी भाषेमध्येच केली. हिंदी भाषेतील १९८२ साली नाटकार शंकर शेष हा समीक्षाग्रंथ लिहला आहे त्यानंतर यशपाला, शेवडे हे समीक्षा ग्रंथ लिहिले. मराठीत खाली जमीन वर आकाश ही आत्मकथा तसेच भारतीय साहित्यकार हा समीक्षा ग्रंथ लिहिला. विविध लेखसंग्रह, कथासंग्रह, चरित्रसंग्रहही लिहिले. वि.स.खांडेकरचे साहित्य हिंदी भाषिक वाचकप्रेमी पर्यंत पोहचवण्यासाठी त्यांची विविध पुस्तके अनुवादित केली. त्यामध्ये वि.स. खांडेकर की श्रेष्ट कहानिया (१९८३), स्वप्नभंग (१९८४) आणि शांति (१९९७) या साहित्याचा अनुवाद केला तर वि.स.खाडेकरांच्या समग्र अप्रकाशित व असंकलीत साहित्याचे संपादन केले आहे. वि.स. खांडेकरच्या साहित्य बरोबरच मी कोल्हापूर विद्यापीठातील अनेक पाठ्यपुस्तकाचे संपादन केले आहे. मराठी मध्ये तीस आणि हिंदी मधील वीस अशा एकूण पन्नास ग्रंथाचे प्रकाशन केले आहे आणि त्यात परसाई की श्रेष्ठ व्यंग काहनिया (१९९८) गद्य के रंग (२००४) काव्य अभिलाषा (२००४) वाणिज्य व्यवहार (२००४) व्यावहारीक हिंदी (२००४) इत्यादी पुस्तकाचे संपादन केले आहे.

आपण विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे त्या बद्दल काय सांगावेसे वाटते?
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविणे हे तसे थोडे जिकरीचे काम आहे. तरी त्यातून खूप काही शिकायला आणि नवनवीन दर्जेदार साहित्य पाहायला आणि अनुभवायला मिळते. २००६ साली कर्नाटक (सांबरा) येथील मराठी साहित्य संमेलन, २००७ सालचे सीमाभाग साहित्य संमेलन कर्नाटक (बेळगुंदी) २००९ साली ग्रामीण मराठी युवा साहित्य संमेलन चिंचवड तसेच राधानगरी तालुका ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी मी काम केले. २०१० साली कर्नाटक येथील कारदगा साहित्य संमेलनाचा अध्यक्षही होतो. हिंदी भाषाही आपली राष्ट्र भाषा आहे त्याचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे. त्यासाठी मी हिंदी भाषेमध्ये विविध साहित्य लिहिले आहे. अनाथ, निराधार मुला आणि मुलीच्या व महिलाच्या संगोपन आणि शिक्षण व पूनर्वसन कार्याची नोंद घेऊन राज्यस्तरीय लोकशिक्षक पुरस्कार, कोल्हापूर भूषण, नवी दिल्ली तर्फे रोल ऑफ ऑनर असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. साहित्य लेखनासाठीही अनेक पुरस्कार मिळाले असून आजवर पुरस्कार रूपाने मिळालेली सर्व रक्कम विविध सामाजिक शैक्षणिक साहित्यिक संस्थाना प्रदान केली आहे. आज राज्य शासनाने माझ्या कामाचा, कार्याचा गौरव केला याचा आनंद आहे. यापुढेही बहुभाषिक साहित्य वाचकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न लेखनातून करणार आहे.

वर्षा फडके
varsha100780@gmail.com
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा