महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
मानसिक आजार टाळणे शक्य- डॉ. संजय कुमावत मंगळवार, १४ मार्च, २०१७
डॉ. संजय कुमावत हे जेष्ठ मानसोपचार तज्ञ म्हणून ओळखले जातात. समाजात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मानसिक आजारांविषयी चिंता व्यक्त करुन ते म्हणतात, मानसिक आजार झाल्यावर उपचार घेण्यापेक्षा मानसिक आजार होणारच नाही याची आपण काळजी घेणे हे अधिक महत्वाचे आहे. यासाठी साधे सोपे उपाय म्हणजे आपली जीवनशैली, वेळेचे व्यवस्थापन, योग्य आहार, योग्य व्यायाम, नियमित विश्रांती व नियमित झोप, योगासने ध्यान धारणा, चांगली संगत, व विधायक कृतीमध्ये सहभागी होणे हे आहेत. डॉ.कुमावत यांच्याशी झालेली ही मार्गदर्शक नेटभेट ..

डॉ. संजय कुमावत यांचा जन्म दि. 23 फेब्रुवारी, 1960 रोजी पुण्यातील ससून रुग्णालयात झाला. त्यांचे वडील महाराष्ट्र शासनाच्या सेवेत, मुंबईत वरिष्ठ अधिकारी होते. त्यामुळे डॉक्टरांचे बालपण, वांद्रे येथील शासकीय वसाहत येथे झाले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण न्यू इंगिलश स्कूल, वांद्रे येथे झाले. सायन येथील एस.आय.ई.एस.महाविद्यालयातून विज्ञान शाखेत 12 वी झाल्यावर त्यांनी मुंबई येथील प्रसिध्द के.ई.एम वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस. व एम.डी. (मानसोपचार शास्त्र) या पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात 1 वर्ष अध्यापन केले. 

डॉ. कुमावत यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात मानसोपचार तज्ञ म्हणून 1989 साली निवड झाली. त्यांची प्रथम नेमणूक जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे झाली तेथे पुढे त्यांनी ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, आरोग्य उपसंचालक आदी महत्त्वाचे पदे भूषविल्यानंतर 2013 साली स्वेच्छानिवृत्ती स्विकारली. सध्या डॉ. कुमावत राज्य मानसिक आरोग्य परिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. कुमावत यांनी बॉम्बे सायकॅट्रिक असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य परिषेदेचे सदस्य सचिव आदी पदे भूषविली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोत्कृष्ट मानसोपचार तज्ञ म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे. आजपर्यंत त्यांनी डेनमार्क, चीन, दक्षिण कोरीया, मलेशिया, श्रीलंका, दुबई, सिंगापूर इ. देशामध्ये मानसोपचार विषयी झालेल्या जागतिक परिषदामध्ये सहभाग घेतला आहे. मानसिक आरोग्य विषयी जनजागृती व्हावी यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहे. आपल्या आजवरच्या निरक्षणाविषयी बोलताना डॉ. कुमावत म्हणतात, “समाजात दिवसेंदिवस मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. तथापि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये मानसोपचाराच्या विषयी जागरुकता व स्विकृती वाढीस लागत असून त्यामूळे मनोरुग्णाकडे बघण्याचा जो चुकीचा दृष्टीकोन होता तो दूर होत आहे. काही प्रमाणात नागरिकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत आहे ही चांगली बाब आहे.

पण मुळातच मानसिक आजार होण्याची कारणे काय आहेत असे विचारल्यानंतर डॉ. कुमावत म्हणाले वाढते स्पर्धात्मक युग, दैनंदिन जीवनातील ताणतणाव, सर्व क्षेत्रात जाणवणारा संयमाचा अभाव, मोडकळीस येत चाललेली कुटुंब व्यवस्था, वाढते शहरीकरण, आणि ग्रामीण भागात निसर्गाचा लहरीपणा, अनुवंशीकता हे मानसोपचाराची ही प्रमुख कारणे आहेत.

मानसिक आरोग्य म्हणजे काय हे विचारल्यानंतर डॉ. म्हणाले आपण कष्टपूर्वक उद्दीष्ट साध्य करीत असताना प्रसंगी अपयश आल्यास ते पचविणे तसेच यश मिळाल्यास यशाच्या नशेत न राहता वर्तमान जगताना भूतकाळाचा अनुभव व त्यादृष्टीने घेतलेला भविष्याचा सकारात्मक वेध म्हणजे मानसिक आरोग्य होय. व्यक्तीने नाती गोती जपलीच पाहिजेत. परंतू या नात्यागोत्यामध्ये गुंतन न राहता आपले सामाजिक तसेच व्यावसायिक भान ठेवत कोणत्याही प्रकारचे वैफल्य न बाळगता केलेली वाटचाल म्हणजेही मानसिक आरोग्य होय.

काही वेळा मुबलक साधनसामग्री उपलब्ध असूनही व्यक्तीच्या जीवनात एक प्रकारची शिथीलता येते. त्यामुळे संयम कमी होतो, कधी कधी नकार किंवा पराभव सहजपणे न स्विकारल्यामुळे अशी व्यक्ती नैराशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी जाते. अशा व्यक्तीने वेळीच योग्य वैद्यकीय उपचार व समूपदेशन न घेतल्यास त्या व्यक्तीचा कल आत्महत्या करण्याकडे जाऊ शकतो. काही वेळा अशी व्यक्ती प्रत्यक्षात आत्महत्या देखील करते.

एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आजाराची लक्षणे कशी ओळखावी याविषयी मार्गदर्शन करताना डॉ. कुमावत म्हणाले व्यक्तीची झोप बिघडणे, भूक कमी होणे, चिडचिड वाढणे, एक्कलकोंडे पणा, दैनंदीन कामकाजात टाळाटाळ किंवा चूका, वजन खूप कमी होणे किंवा वाढणे, खूप भिती वाटणे, आत्मविश्वास कमी होणे, जीव घाबरणे, कामकाजाची इच्छा कमी होणे, आत्महत्या करण्याची धमकी देत राहणे तथा प्रयत्न करणे इ. लक्षणे दिसून येतात. शिक्षणावर विपरीत परिणाम होणे, त्यांची संगत बिघडणे, खोटे बोलणे, स्वच्छता टापटीपपणाकडे दूर्लेक्ष होणे, चेहरा चिंताग्रस्त दिसणे मानसिक आजाराची आदी लक्षणे आहेत. त्यामध्ये कुटूंबातील व्यक्तीनी, कार्यालयातील सहकार्यानी व वर्गातील मित्र मैत्रिणीनी एखाद्या व्यक्तीत अशी लक्षणे दिसून आल्यास त्याकडे दूर्लक्ष न करता तात्काळ मानोसपचार तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक असते. मानसिक आजाराचे प्रमुख प्रकार काय व कोणते आहेत असे विचारल्यानंतर डॉ. कुमावत म्हणाले मनाची दूभंग अवस्था (स्किजेखिनीया) नैराश्य किंवा उदासिनता (डिप्रेशन), सतत वाटणारी भिती, आजारपणाबद्दल चिंता (ॲनेझिटी), मनोलैगींक विचार, मानासिक शारिरीक विकार, अतिआनंदी, अतिदु:खी अवस्था (बायोकलर), इ. प्रमुख प्रकार आहेत. याशिवाय जेष्ठ नागरिकांमध्ये सर्व साधारणपणे वरील विकारांबरोबर नैराश्य, स्मृतीभ्रंश आदी लक्षणे दिसतात. महिलांमध्ये मासिक पाळीशी संबंधित तसेच बाळंतपणापूर्वी, बाळंतपणानंतर उदभवणारे मनोविकार दिसून येतात. बालकातील मनोविकारामध्ये प्रामुख्याने वर्तणूकीतील दोष किंवा विकृती, नैराश्य, अनामिक भिती इ. लक्षणे दिसून येतात.

आज वाढत्या मनोविकाराविषयी प्रामुख्याने सोशल मीडियाला जबाबदार धरल्या जाते,याविषयी आपले मत काय आहे. असे विचारल्यानंतर डॉ. कुमावत म्हणाले सोशल मीडिया हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे तो टाळता येणार नाही म्हणून मुलांना त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न न करता आपल्या अभ्यासासाठी, माहितीसाठी, व्यक्तीमत्व विकासासाठी या माध्यमांचा कसा वापर करावा हे मुलांना शिकविणे गरजेचे आहे.

जगात मानसिक ताण-तणावामुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी आणि या विषयावर मोकळेपणाने बोलण्यासाठी जागतिक मानसिक आरोग्य संघटनेने 10 ऑक्टोबर या ‘मानसिक आरोग्य दिना’चं यावर्षीचं घोषवाक्यच ‘चला, काही बोलूया’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आपल्या अनुभवाचा व ज्ञानाचा समाजासाठी उपयोग व्हावा या सामाजिक बांधलकीच्या भावनेतून डॉ.कुमावत यांनी काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातील प्रमुख उपक्रम म्हणजे भारतीय जैवविज्ञान परिषदेच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील डहानू तालुक्यातील आदिवासी महिलांमध्ये बाळंतपणापूर्वी व बाळंतपणानंतर उदभवणारे ताणतणाव या विषयी सर्वेक्षण हाती घेतले आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर त्यावर आधारित नियमित उपचार सुरु करण्यात येणार आहेत तसेच मुले आणि मुली यांची कल चाचणी करुन त्यांना पुढील शिक्षणाविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच याभागातील व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहेत.

डॉ. कुमावत यांच्या पत्नी डॉ. वंदना ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात बालरोग विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांचा मुलगा पार्थ हा मॅकॅनिकल इंजिनीयर आहे. डॉ. कुमावत यांना भावी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा...

-देवेंद्र भुजबळ
(माहिती)(वृत्त व जनसंपर्क)
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा