महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
कीर्तन, प्रवचनाव्दारे अखंड मानवसेवा - ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते (पाटील) गुरुवार, १३ जुलै, २०१७
वारकरी संप्रदयाचे अध्वर्यू, एक परखड वक्ते आणि राष्ट्रीय वारकरी सेनेचे संस्थापक ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते (पाटील) यांना राज्य शासनाचा “ज्ञानोबा-तुकाराम” पुरस्कार आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर जाहीर झाला आहे. यानिमित्ताने ह.भ.प.श्री.वक्ते यांच्याशी साधलेला संवाद..

  राज्य शासनामार्फत दिला जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आपल्याला घोषित झाला आहे, काय वाटतं आपल्याला?

राज्य शा
सनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन 2016 -17 चा “ज्ञानोबा-तुकाराम” पुरस्कार मला जाहीर झाला याचा आनंद आहे. आज मी 85 वर्षांचा आहे. वयाच्या 12 व्या वर्षापासून मी नित्यनियमाने पंढरपूर वारी करायला लागलो. संत साहित्यावर मी बरेच लेखन वर्षानुवर्षे करीत असून माझी काही ग्रंथ, पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. त्यामुळे कुठेतरी मी करीत असलेल्या कामाची दखल राज्य शासनाने घेतली आणि मला हा पुरस्कार दिला, याचा मला आनंद आहे.

आपला जीवनप्रवास कसा राहिला आहे?

माझा जन्म बुलडाणा येथे वारकरी कुटुंबात झाला. अवघ्या 9 व्या वर्षापासून मी माझ्या कुटुंबियांच्या सोबतीने मुक्ताबाई आणि पंढरीची वारी सुरु केली. प्राथमिक शिक्षणाबरोबर मला संत साहित्याची विशेष आवड असल्याने मी बालवयातच अडीच हजार अभंगांचे पठण केले. 1954 ते 1958 या काळात तर मी साखरे महाराज मठात श्री गुरु निलकंठ प्रभाकर मोडक यांच्याकडे अध्ययन केले. पुढे 1992 पर्यंत मी त्या काळातील थोर पंडित संत महात्मे, ह.भ.प. परभणीकर गुरुजी, भगवान शास्त्री धारुरकर, गोपाळ शास्त्री गोरे, एकनाथ महाराज देगलूरकर आदि संत महात्मांच्या मार्गदर्शनाखाली प्राकृत प्रस्थानत्रयी धर्मशास्त्र, स्मृती ग्रंथ पुराण इत्यादी ग्रंथाचा पंढरपूर येथे अभ्यास करुन चार्तुमासामध्ये 60 वर्षापासून अध्ययन व अध्यापनाचे कार्य करीत आहे.

आपण हिंदू धर्मपरंपरेचा, साहित्याचा जो अभ्यास केला आहे त्याबद्दल सांगा?

वारकरी परंपरेच्या जोडीला मी हिंदू धर्मपरंपरेतील वेद, उपनिषदे आणि पुराणे यांचाही अभ्यासक आहे. वारकरी परंपरेतील प्रसारासह वैदिक धर्माची जागृती करणे, तसेच सर्व स्तरांवर सातत्याने विचार मांडणे हे देखील काम मी करीत असतो. रामायण, महाभारत, भगवद्गीता यांचे वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व मी सातत्याने समाजासमोर मांडले आहे.

आपल्या कामाची सुरुवात कशी झाली ?

पंढरपूर वारी करणे, मुक्ताबाईच्या मठात जाऊन काम करणे, संतसाहित्य लोकापर्यंत पोहोचविणे असे गेले 48 वर्षांपासून करीत आहे, मी 48 पंडितांकडे जाऊन अध्ययन केले असून वारकरी संप्रदायाचा संपूर्ण अभ्यास मी केला आहे. धर्मकार्य कसे करावे, का करावे इथपासून मी मार्गदर्शन करण्याबरोबर स्वत:ही धर्मकार्य करीत असतो. आता नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीला मी मुक्ताबाईच्या मठात जाऊन कीर्तन केले. आज माझा हा वारसा पुढे नेण्याचे काम माझा नातू करीत आहे याचा मला अभिमान आहे.
ʻविठ्ठल कवचʼ, ʻविठ्ठल सहस्त्रणामʼ, ʻविठ्ठल स्तवराजʼ, ʻविठ्ठल अष्टोत्तरनामʼ, ʻविठ्ठल हृदयʼ, ʻमुक्ताबाई चरित्रʼ, ʻज्ञानेश्वर दिग्विजयʼ, ʻवाल्मिकी रामायणʼ, ʻसंत तुकाराम महाराज सदैह वैकुंठ गमनʼ अशा अनेक ग्रंथांचे संपादन मी केले आहे. कीर्तन, प्रवचनाव्दारे मानवतावादी सेवा अखंड सुरु ठेवून राष्ट्र जिर्णोद्धराचे कार्य पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे.

आपण धर्मकार्य आणि अन्नदान करीत असता याविषयी काय सांगाल ?

मी गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ अन्नछत्र चालवित आहे. तर मला मिळालेली देणगी विद्यार्थ्यांच्या उत्कर्षांसाठी वापरीत आहे. आज जवळपास 250 ते 300 विदयार्थी माझ्याकडे आहेत त्यांना शिकविण्याचे काम मी करीत आहे. मला मिळालेल्या पुरस्काराची रक्कमही धर्मकार्य करण्यासाठी वापरण्याचे माझे नियोजन आहे.

एकूणच कीर्तन आणि प्रवचनाबरोबरच संत साहित्याच्या अभ्यासातून प्रबोधन करणाऱ्या ह.भ.प. वक्ते महाराजांना जाहीर झालेला ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याचा राज्य शासनाने केलेला सन्मान आहे, हे निश्चित...!

वर्षा फडके,
मुंबई

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा