महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ठाणे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा बुधवार, ०१ मे, २०१९


ठाणे :
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,(सार्वजनिक उपक्रम),सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे,यांच्या हस्ते पोलीस क्रीडासंकुल,साकेत मैदान, ठाणे येथे ध्वजवंदन करुन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

महाराष्ट्र् राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती मंजुषा जाधव, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक राहुल बजाज, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस अधीक्षक ग्रामीण शिवाजी राठोड, अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, आदी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी ठीक आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस बॅंड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. उपस्थितानी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर श्री. शिंदे यांनी उघड्या जीप मधून परेडचे निरीक्षण केले. यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थिताना संबोधित केले. ते म्हणाले की, ठाणे जिल्ह्याचा विस्तार झपाट्याने होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक याठिकाणी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने येऊन स्थायिक झाले आहेत. विविध जाती-धर्माच्या लोकांचा सलोखा-स्नेहाचे वातावरण हेच ठाणे जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे.


त्यानंतर झालेल्या शानदार संचलनाने उपस्थित रोमांचित झाले. यावेळी झालेल्या संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर महादेव गडदे यांनी व सहाय्यक परेडा कमांडर राजेंद्र कुळसंगे यांनी केले. या संचलनात पोलीस मुख्यालय ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, महिला पोलीस दल, शहर वाहतूक शाखा, मध्यवर्ती कारागृह, ठाणे, अग्निशमन दल, ठाणे महानगरपालिका सुरक्षा दल, पोलीस बॅंड पथक यांनी पोलीस बॅंडच्या तालावर संचलन केले. या सोबतच या संचलनात जलद प्रतिसाद दल पथक, वज्र वाहन, आर. सी.पी, पब्लिक कॉल रिसिव्हर, वरुण वॉटर कॅनन, अग्निशमन वाहन रुग्ण वाहिका आदी वाहनांचे प्रदर्शन करण्यात आले. रस्ते सुरक्षा, जागतिक क्षय रोग निर्मूलन मोहिम, वन विभागाचे वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगणारे चित्ररथ साकारण्यात आले.

त्यानंतर श्री. शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांना व सामाजिक कार्यकर्त्यांना भेट देऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचलन स्नेहा आघारकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील, जलसिंग वळवी, तहसिलदार सर्जेराव पाटील, लोखंडे आदी वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Share बातमी छापा