महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सिंधुदुर्ग जिल्ह्याची वैभवशाली व गौरवशाली परंपरा जपूया - पालकमंत्री दीपक केसरकर बुधवार, ०१ मे, २०१९


सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्ह्याची वैभवशाली व गौरवशाली परंपरा अधिक वृध्दींगत करण्‍याचा व जोपासण्याचा आज संकल्‍प करुया, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्य ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समांरभात केले. पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहन संभारभास जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक निमीत गोयल, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे तसेच अधिकारी- कर्मचारी, पत्रकार, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज भाषिक, प्रांतिक स्‍वरुपाची तेढ उत्‍पन्‍न करणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, अखंड महाराष्‍ट्र, बलदंड महाराष्‍ट्र आणि सुराज्य निर्माण होण्‍याचे स्‍वप्‍न छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाहिले होते. आज आपण एका सामर्थ्‍यवान, बलशाली व पुरोगामी राज्‍यात रहात असल्‍याचा मला सार्थ अभिमान आहे. संयुक्‍त महाराष्‍ट्रासाठी आपले सर्वस्‍व अर्पण करणाऱ्या थोर वीरांना, हुतात्म्यांन्या त्यांनी यावेळी अभिवादन केले.

पालकमंत्री म्हणाले की, त्रिराज्या योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठी जनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनले. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस.एम.जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. एस.एम.जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्र्यांनी आपल्या मराठा या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार प्रचार केला तर विरोधकांवर कठोर टीका केली. त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर यांनी आपल्या शाहीरी कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली. 1956 मध्ये केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यांवर उतरले. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण 105 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्‍ह्याची निर्मीती 1 मे, 1981 रोजीबरोबर 38 वर्षांपूर्वी झाली. आज सिंधुदुर्ग स्‍वच्‍छता, पर्यटन यांसारख्‍या अनेक महत्‍वाच्‍या क्षेत्रांमध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍याला दिशादर्शक अशी कामे करीत आहे. याचाही मला सार्थ अभिमान आहे.

यावेळी पोलीस दल (महिला व पुरुष), डॉन बास्को शाळेच्या विद्यार्थी- विद्यार्थींनीचे पथक यांनी शानदार संचलनाव्दारे राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली.
Share बातमी छापा