महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील- सदाभाऊ खोत मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९


नांदेड :
राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांना दिलासा देणारे अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून टंचाईग्रस्त गावांना मदत देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

बिलोली व देगलूर उपविभागातील कृषि, पाणीपुरवठा व दुष्काळ परिस्थितीचा आढावा राज्यमंत्री श्री. खोत यांनी बिलोली पंचायत समिती सभागृहात घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, डॉ. मिनलताई खतगावकर, पंचायत समिती सभापती श्री. बोधणे, विशेष कार्य अधिकारी मधु गिरगावकर, विभागीय कृषि सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे, तहसीलदार विक्रम राजपूत, अरविंद बोळगे, सुरेखा नांदे, अतुल जटाळे, राजेश लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. खोत म्हणाले, टंचाई काळात गावातील माणसाला पाण्याबरोबर जनावराला चारा व हाताला कामाची गरज असते. अशावेळी नागरिकांना दिलासा देण्यासाठी आपल्यास्तरावर निर्णय घेऊन एकोप्याने कामे त्वरित पूर्ण करावीत. टंचाई काळात उपाययोजनेसाठी निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा व विभागस्तरावर दिले आहेत. पाणी पातळी घटलेल्या गावातील पिण्याचे प्रश्न सुटतील असे प्रस्ताव त्वरीत तयार करावेत व जुन्या कामाच्या दुरुस्ती प्रस्तावाला लागणारा निधी दिला जाईल. बोगस कामे केलेल्या पाणीपुरवठा कंत्राटदारांची यादी करुन त्यांच्यावर कार्यवाही करावी. पाणीपुरवठा योजनेपासून गावे वंचित राहणार नाहीत तसेच शासन निर्णयाची अंमलबजावणी गावपातळीवर होण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहिले पाहिजे. दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी बिलोली व देगलूर उपविभागातील पाणीपुरवठा प्रश्नासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात लवकरच घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कृषि, पाणी पुरवठ्यासह विविध विषयांवर आमदार सुभाष साबणे व आमदार राम पाटील रातोळीकर यांनी चर्चा करुन उपयुक्त सुचना केल्या. बैठकीस विविध गावातील सरपंच, पदाधिकारी, नायब तहसीलदार संजय नागमवाड, ओमप्रकाश गोंड, पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक शुभांगी गोंड, उपअभियंता पाणीपुरवठा श्री. गायकवाड, वनअधिकारी कोळी, तालुका कृषि अधिकारी घुगे, शितोळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमावाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री पवार यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
Share बातमी छापा