महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्याची विविध क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती - पालकमंत्री दिलीप कांबळे बुधवार, ०१ मे, २०१९


हिंगोली :
महाराष्ट्र राज्याची १ मे, १९६० रोजी स्थापना झाली. तेव्हा पासूनच राज्याने शिक्षण, आरोग्य, सहकार, कृषी अशा विविध क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली असून, त्यामुळेच आज आपले राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जात असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.

येथील पोलीस कवायात मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी श्री. कांबळे हे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, पोलीस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गोविंद रणवीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय वन अधिकारी केशव वाबळे, नगर परिषदेचे मुख्यधिकारी रामदास पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री कांबळे म्हणाले की, देशाच्या विकासात आपल्या महाराष्ट्र राज्याचा खूप महत्वाचा मोठा वाटा आहे. १ मे, १९९९ रोजी निर्माण झालेल्या आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या स्थापनेचा आज वर्धापन दिन आहे. विकासाकडे झेपावणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे, ही आनंदाची बाब असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता शासन कटीबध्द आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्वाचे असून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने परस्पर सहकार्याने काम केल्यास जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होण्यास मदत होईल. त्याकरिता समन्वय आणि सहकार्याची भावना ठेवत आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सर्व जण एकजुटीने प्रयत्न करु यात असे आवाहन ही श्री. कांबळे यांनी यावेळी केले.


तसेच जगात आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन ही साजरा होत असून, देशाला प्रगतीपथावर आणण्यामध्ये कामगार बांधवांचा खूप महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगुन श्री कांबळे यांनी कामगार बंधुना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी पोलीस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली. यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल, अग्निशमन दल, श्वान पथक, वज्र वाहन, दहशतवाद विरोधी वाहन, आपत्ती व्यवस्थापन आरोग्य विभागाचे आरोग्य पथक संचलनात सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि मान्यवरांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमांचे सूत्र संचालन मदन मार्डीकर यांनी केले. यावेळी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share बातमी छापा