महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली टंचाईग्रस्त परिस्थितीची आढावा बैठक संपन्न मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८

उस्मानाबाद : दुष्काळी परिस्थितीत पाणी, गुरांना चारा व ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर अशा विविध विषयांबाबत जिल्हा प्रशासन करीत असलेल्या तयारीची आढावा बैठक विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शिंगोली येथील विश्रामगृहामध्ये संपन्न झाली.

या बैठकीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी रामचंद्र चोबे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.निलेश श्रींगी, उपजिल्हाधिकारी चारूशीला देशमुख,स्वप्नील मोरे,विठ्ठल उदमले,जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे हे उपस्थित होते.

यावेळी  विभागीय आयुक्त श्री.भापकर यांनी टंचाईसंदर्भात विविध बाबींचा आढावा घेताना मुख्यमंत्री पेयजल योजना व राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनस्तरावर करण्यात आलेल्या नियोजनाची संबधित अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष त्या-त्या गावात जाऊन पाहणी करावी, अधिग्रहित विहिरींमध्ये किती पाणीसाठा आहे व तो किती दिवसांपर्यंत पुरेल तसेच जिथे टॅंकरने पाणीपुरवठा होत असेल त्या गावातील पाणीसाठ्यासाठी उपलब्ध असलेली विहीर, हौद किंवा जी साधने उपलब्ध असेल त्यातील पाणी पिण्यासाठी शुद्ध आहे का? त्या पाण्याची तपासणी करावी व पाणी कमी पडणार नाही यावर अधिक लक्ष देऊन पाणी टंचाईची समस्या सोडवावी. गाळपेऱ्याचे क्षेत्र किती आहे? जनावरांसाठी किती महिन्यांपर्यंत हिरवा चारा पुरेल, हिरवा चारा कमी पडत असेल तर त्यासाठी किती हेक्टर क्षेत्र गाळपेऱ्यासाठी अधिग्रहित केले आहे? या क्षेत्रात बाजरी, ज्वारी, मका या बियाणांची पेरणी करुन जनावरांसाठी हिरवा चारा निर्माण करावा. 5 हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र हिरव्या चाऱ्यासाठी उपलब्ध झाले पाहिजे म्हणजे चाऱ्याची टंचाई भासणार नाही. रोजगार हमी योजनेवर जास्तीत जास्त मजूरांना काम द्यावे म्हणजे मजूरांचे स्थलांतर होणार नाही तसेच डिसेंबर महिना संपण्याच्या आत गावांमध्ये ग्रामसभा घेऊन व्हीव्हीपॅट मशीनद्वारे मतदारांमध्ये प्रात्याक्षिकाद्वारे जनजागृती करावी,त्यामुळे गावातील किती ग्रामस्थ व विद्यार्थी स्थलांतरीत झाले आहे,याचा नेमका अंदाज येईल. पंतप्रधान आवास योजनेमध्ये किती घरकुलांचे वाटप झाले? शेततळयाचे दिलेले उद्दिष्ट जूनपर्यंत पूर्ण करावे, प्रत्येक गावात कमीत कमी 10 विहिरींचे काम झाले  तर येणार्‍या काळात पाणी टंचाई भासणार नाही,यासाठी शासनाने दिलेली उद्दिष्टये वेळेत पूर्ण करावेत,अशा  आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.  

यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. चिमणशेट्टे, जिल्हा भूजल सर्वेक्षण अधिकारी श्री. गायकवाड,  जिल्हा परिषद लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता श्री.जगताप  पाणीपुरवठा विभागाचे श्री.देवकर, सहाक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. काळे-गोरे, कार्यकारी अभियंता श्री.मरकड,जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता श्री.पांडव, महावितरण चे कार्यकारी अभियंता श्री.पाटील, कृषी उपसंचालक श्री.चोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, सर्व तहसिलदार तसेच विविध विभागांचे संबंधित अधिकारीही उपस्थित होते.

Share बातमी छापा