महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
निवडणूक कामकाज जबाबदारीने अचूकरित्या करावीत - निवडणूक सर्वसाधारण निरिक्षक राहुल तिवारी गुरुवार, ०४ एप्रिल, २०१९

सिंधुदुर्ग : 46 – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील निवडणूक विषयक सर्व कामे अधिकारी वर्गाने जबाबदारीने व अचूकपणे पार पाडावीत, असे आवाहन निवडणूक सर्वसाधारण निरिक्षक राहुल तिवारी यांनी येथे आयोजित बैठकीत केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नुतन सभागृहात आज निवडणूक सर्वसाधारण निरिक्षक राहुल तिवारी यांनी अधिकारी वर्गाच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी प्रारंभी स्वागत करुन जिल्ह्यातील निवडणूक विषयक कामकाजाची सविस्तर माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे सहा लक्ष 60 हजार मतदार आहेत. 950 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात संवेदनशील मतदान केंद्र नाही. कायदा व सुव्यवस्था, आचार संहिता कक्ष आदी 16 नोडल ऑफिसरची नियुक्ती केली आहे. मतदार जागृती अंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच निवडणूक प्रशिक्षण व अधिकारी, कर्मचारी नियुक्ती याबाबत डाटाबेस तयार आहे, अशी माहिती यावेळी दिली.

निवडणूक सर्वसाधारण निरिक्षक राहुल तिवारी यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृहावर सकाळी 9 ते 10 या वेळेत संपर्क साधता येईल. रत्नागिरी सर्कीट हाऊसवर सकाळी 9 ते 10 या वेळेत रत्नागिरी येथे असताना संपर्क साधता येईल. श्री.तिवारी यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9421070929 असा आहे.

बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या सह अध्यक्षा के. मंजूलक्ष्मी, अपर पोलीस अधीक्षक निमित गोयल, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड, सहायक निवणडूक अधिकारी सुशांत खांडेकर, विकास सूर्यवंशी, सी.व्ही.मोहिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, कोषागार अधिकारी डॉ.शिवप्रसाद खोत, संतोष जिरगे तसेच नोडल ऑफिसर उपस्थित होते.

Share बातमी छापा