महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकमान्य टिळकांनी देशाचा वैचारीक पाया रचण्याचे कार्य केले - प्रभाकर ढगे मंगळवार, ०१ ऑगस्ट, २०१७
गोवा : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देशाचा राजकीय, सामाजिक आणि वैचारिक पाया रचण्याचे कार्य केले. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याच्या प्रेरणेसाठी वाणी आणि लेखणी झिजवल्याचे प्रतिपादन दैनिक गोवन वार्ताचे सहयोगी संपादक प्रभाकर ढगे यांनी केले.

महाराष्ट्र परिचय केंद्र आणि भगवती हायस्कूल पेडणे यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

महात्मा फुले यांनी समाजात शिक्षणाची गंगा आणली तर आगरकर यांनी समाज सुधारणा आणली, गोखले यांनी राजकीय सुधारणा तर लोकमान्यांनी आक्रमकपणे स्वातंत्र्याची मागणी समाजासमोर मांडल्याचे श्री. ढगे म्हणाले. ब्रिटिशांनी देश सोडून जावा यासाठी कार्य करणाऱ्या सर्व नेत्यांमध्ये लोकमान्य हे अग्रणी असल्याचे त्यांनी सांगितले. लेखनीने एक उन्मत्त सत्ता झुकवता येते हे लोकमान्यांनी दाखवून दिले. लोकमान्य टिळक हे जहाल नेत्यांचे प्रमुख होते. देशातील राजकारणात कोणत्या सुधारणा असाव्यात याचा वस्तूपाठ त्यांनी मांडल्याचे ते पुढे म्हणाले. शिक्षण काय असावे, ते कसे असावे हे त्यांनी मांडले होते. ते एक द्रष्टे नेते होते. त्यांचे थोर विचार हे आजच्या पिढीची शिदोरी आहे. आजची पिढी ही तंत्रज्ञानाला सहाय्यक यंत्र मानव झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत तंत्रज्ञानासाठी जगत असून विद्यार्थ्यांनी वाचन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पेडणे येथील भगवती हायस्कूल या संस्थेला ५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संस्थेतर्फे वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. उत्तम कोटकर यांनी स्थापन केलेली ही संस्था गेली 50 वर्षे अव्याहतपणे विद्यार्थी घडवण्याचे कार्य करत आहे. पेडणे तालुक्यातील साधारण 5000 विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेऊन समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम कोटकर, शाळेच्या मुख्याध्यापिका आनंदवल्ली इंद्राणी, सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष राजमोहन शेट्ये तसेच महेश चोडणकर व शाळेचा शिक्षकवृंद उपस्थित होते.
Share बातमी छापा