महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मतदार जनजागृती सायकल रॅली उत्साहात संपन्न बुधवार, १० एप्रिल, २०१९

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 :

जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक आणि सीईओ स्वत: सायकलस्वार होऊन सहभागी

उस्मानाबाद : जिल्हा प्रशासनातर्फे आज मतदार जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला संबोधित करताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी उपस्थितांना “18 एप्रिलला मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे मतदान करा, असे आवाहन केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर.राजा, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक, तहसिलदार व स्वीपचे नोडल अधिकारी अभय म्हस्के, सहायक जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, आंतरराष्ट्रीय सायकलपटू अभय वाघोलीकर, आंतरराष्ट्रीय खो-खोपटू सारिका काळे, रवी मोहिते आदी उपस्थित होते.

या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून सकाळी 8 वाजता झाली. ही रॅली जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरु होऊन  छत्रपती शिवाजी हायस्कूल मार्गे बार्शी नाका-भोसले हायस्कूल-आंबेडकर चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे  संपन्न झाली. या सायकल रॅलीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर. राजा हे स्वत: सायकल चालवित सहभागी झाले होते.

निवडणूक प्रक्रियेतील मतदारांचा सक्रिय सहभाग, यशस्वी व सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी येत्या 18 एप्रिल रोजी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सायकल रॅलीकरिता उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरीक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी या सर्वांचे आभार मानले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर.राजा यांनीही उपस्थितांशी संवाद साधून 18 एप्रिल रोजी सर्वांनी निश्चितपणे मतदान करावे, संविधानाने दिलेली ही अमूल्य संधी वाया घालवू नये असे आवाहन केले.

जिल्ह्यात मतदानाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करुन मतदानाचे प्रमाण वाढावे, याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. देशाच्या विकासाला दिशा देण्‍यासाठी आपण मतदान करणे, हे प्रत्येक मतदाराने लक्षात घेऊन जाणीवपूर्वक मतदान केले पाहिजे, यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी यांची मतदार जागृती सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती.

या सायकल रॅलीत शहरातील विविध सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, क्रीडा संघटना, सामाजिक संघटना, श्रीपतराव भोसले हायस्कूल, आर्य चाणक्य विद्यालय, आर.पी.कॉलेजमधील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share बातमी छापा