महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विभागीय आयुक्तांनी प्रात्यक्षिकाद्वारे जाणून घेतली ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची माहिती मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८

उस्मानाबाद : आगामी लोकसभा निवडणूक-2019 साठीच्या निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या नवीन M-3 प्रकारच्या  मतदारयत्रांच्या (ईव्हीएम व व्हीव्हीपॅट) मशीनची माहिती प्रात्यक्षिकाव्दारे आज विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी जाणून घेतली. 

नवीन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनव्दारे प्रत्यक्ष मतदान कसे होणार? त्याविषयी सखोल माहिती जनतेला व्हावी यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील शिंगोली येथे आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या वेळी या मशीनवर मतदान कसे करायचे, हे मतदारांना समजले पाहिजे, त्यासाठी मतदारांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होण्यासाठी अधिकार्‍यांनी झटून प्रयत्न करावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.  

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण व प्रात्याक्षिकाचे आयोजन शिंगोली येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निलेश श्रींगी, तहसिलदार विजय राऊत तसेच निवडणुकीच्या कामकाजाशी संबधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.निलेश श्रींगी यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनद्वारे प्रत्यक्ष मतदान करुन घेऊन प्रत्येक उमेदवाराला किती मतदारांचे मतदान पडले तसेच त्याचे मशीन व  व्हीव्हीपॅट मशीनच्या चिठ्ठीद्वारे पडलेले मतदानाची मोजणी करुन दाखविली. तसेच या मशिनच्या माध्यमातून ज्या उमेदवाराला मतदान केले त्याची प्रत्यक्ष चिठ्ठी सात सेकंदासाठी व्हीव्हीपॅट मशीनवर पाहता येणार आहे, त्यानंतर ही चिठ्ठी या मशीनच्या बॉक्समध्ये संकलित होणार आहे, असे सांगितले.

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट द्वारे मतदान जनजागृती व प्रशिक्षण संदर्भात दि. 20 डिसेंबर 2018 पासून जिल्हयातील 06 मतदारसंघातील तालुकानिहाय प्रत्येकी दोन पथकांच्या माध्यमातून सर्व मतदान केंद्रे व प्रमुख ठिकाणी महाविद्यालय, बसस्थानक, आठवडी बाजार, मतदान केंद्रांवर अशा विविध ठिकाणी प्रात्याक्षिकाद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच निरक्षर, दिव्यांग,वृद्ध व इतर सर्वांनाच या मशिनद्वारे मतदान सोपे आहे,काही अडचण येणार नाही,असेही श्री.श्रींगी यांनी यावेळी सांगितले. प्रात्यक्षिकादरम्यान मशीनमध्ये मतपत्रिकेवर उमेदवारांचे नाव आणि त्यांची निशाणी (चिन्ह) यासाठी सांकेतिक शब्द आणि चिन्हांचा उपयोग करण्यात आला होता. या बैठकीस अधिकारी, कर्मचारी तसेच मतदार  मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Share बातमी छापा