महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी निवडणुकीमधील जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडावी- जी. श्रीकांत बुधवार, १३ मार्च, २०१९


लातूर :
लातूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या महसूल व पोलीस विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्यांने दिलेली जबाबदारी समजून घ्यावी. निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परस्परांमध्ये योग्य समन्वय ठेवून नि:पक्ष व पारदर्शकपणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ( दि. 12 ) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महसूल व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात श्रीकांत बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे, उपजिल्हाधिकारी (सा.) सुनील यादव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रदीप कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे आदी उपस्थित होते.

श्रीकांत म्हणाले की, एखादी बाब माहित असल्यासच त्यावर मत देणे अथवा कार्यवाही करणे उचित राहील. जर आपल्याला काही समजले नाही तर त्या बाबी समजून घेतल्या पाहिजेत. लोकसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महसूल व पोलिस विभागाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या व कर्तव्याची माहिती घेऊन त्या नि:पक्ष व पारदर्शकपणे पार पाडाव्यात. लोकशाहीच्या या महा उत्सवात प्रत्येक मतदाराला निर्भीड व शांततेत मतदान करता यावे याकरिता दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी श्री.पाठक यांनी महसूल व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना आदर्श आचारसंहिता, सुरक्षा आराखडा, प्रतिबंधात्मक कारवाई, अवैध शस्त्र जप्ती, अवैध मद्य निर्मिती, वाहनांची तपासणी, सी. व्हीजिल ॲप, जाहीर सभा परवानगी, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951, आयपीसी ॲक्ट 171 च्या अनुषंगाने निवडणूक कालावधीतील जबाबदारीची माहिती दिली. यावेळी श्री. डोळे व निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी ही मार्गदर्शन केले.
Share बातमी छापा