महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मुक्त आणि पारदर्शक निवडणुकांसाठी सर्वांनी दक्षता घ्यावी - निवडणूक निरीक्षक रविंद्रा पी.एन. बुधवार, १० एप्रिल, २०१९


पालघर :
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततामय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना २२- पालघर (अज) लोकसभा मतदारसंघाचे सामान्य निरीक्षक रविंद्रा पी.एन. (भाप्रसे) यांनी दिल्या. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी पोलीस निवडणूक निरीक्षक आनंदकुमार (भापोसे), जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे उपस्थित होते.

श्री.रविंद्रा म्हणाले, भारत निवडणूक आयोगाला मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका अपेक्षित आहेत. त्या अनुषंगाने मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. या सूचनांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे. आयोगाने सुरू केलेल्या विविध ॲप चा वापर करावा तसेच त्यावर आलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी. एकूणच प्रक्रियेत सर्वांनी त्रयस्थपणे काम करावे. मतदार हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याने त्याला मतदानासाठी प्रोत्साहित करावे. त्याचबरोबर मतदारांची संख्या लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या तसेच उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे संनियंत्रण करण्यासाठी नियुक्त पथकांनी उमेदवाराच्या प्रत्येक खर्चाची नोंद घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विविध समित्यांचे सुरू असलेले काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

पोलीस निवडणूक निरीक्षक आनंदकुमार यांनी मार्गदर्शन करताना तपास नाके, कायदा व सुव्यवस्था आदींबाबत आढावा घेऊन दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी प्रारंभी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, सहायक जिल्हाधिकारी अजित कुंभार, सौरभ कटियार, श्रीमती वसुमना पंत यांच्यासह सर्व संबंधित समन्वय अधिकारी उपस्थित होते.लोकराज्यच्या निवडणूक विशेषांकाचे निवडणूक निरीक्षकांच्या हस्ते प्रकाशन
लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने लोकराज्यच्या विशेषांकाची निर्मिती करण्यात आली आहे. एप्रिल-मे महिन्याच्या या विशेषांकाचे प्रकाशन पालघर येथे सामान्य निवडणूक निरीक्षक रविंद्रा पी.एन., पोलीस निरीक्षक आनंद कुमार तसेच जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, सहायक जिल्हाधिकारी अजित कुंभार, सौरभ कटियार, श्रीमती वसुमना पंत, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनीषा पिंगळे यांच्या सह सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि समन्वय अधिकारी उपस्थित होते.

या अंकामध्ये निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व बाबींची व्यापक माहिती देण्यात आली आहे. मतदारांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, आदर्श आचारसंहिता म्हणजे काय, आचारसंहितेमध्ये घ्यावयाची काळजी, निवडणूक आणि निवडणूक यंत्रणा, निवडणूक प्रशिक्षण, निवडणुकीतील परिवर्तन युग, निवडणुकांचे बदलते तंत्र तसेच अन्य अनुषंगिक माहिती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक २००९ आणि २०१४ ची आकडेवारी तसेच cVIGIL ॲप, मतदाराने बाळगावयाचे ओळखपत्र आदी बाबींची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

Share बातमी छापा