महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सातवी आर्थिक गणना राज्यस्तरीय प्रशिक्षण ; महाराष्ट्रासह, केंद्रशासित प्रदेशातील साधन व्यक्ती सहभागी शनिवार, ०१ जून, २०१९


नवी मुंबई :  देशाच्या सातव्या आर्थिक गणनेसाठी प्रशिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम आज खारघर- नवी मुंबई येथील ग्रामविकास भवनात पार पडला. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य, दादरा नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील साधन व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर.श्रीनिवास, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक आर.आर.शिंगे, राष्ट्रीय प्रतिदर्श सर्व्हेक्षण संस्थांच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाच्या उप महानिदेशक श्रीमती सुप्रिया रॉय, नागपूर विभागाचे श्रीनिवास उपाला, दिल्ली येथील क्षेत्रीय कार्यालय विभाग उप महानिदेशक इ.के.तोपराणी, सह संचालक जयवंत सरनाईक, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विकास संस्थेच्या उपसंचालक भाग्यश्री साठे, आपले सरकार केंद्राचे राज्यस्तरीय प्रमुख वैभव देशपांडे, समीर पाटील, तसेच राज्यभरातील सांख्यिकी अधिकारी, आपले सरकार ई-सेवा केंद्राचे समन्वयक आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास म्हणाले की, देशाची आर्थिक गणना ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी अचूक व वस्तुनिष्ठ तथ्यसंकलन होणे आवश्यक आहे. या आर्थिक गणनेसाठी मोबाईल ॲपचा व माहिती तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याने ही गणना अधिक अचूक व्हावी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी ही आपले मनोगत व्यक्त करून कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. दिवसभरात तीन सत्रात विविध विषयांवर उपस्थित सहभागीना मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर हे प्रशिक्षक जिल्हास्तरावर प्रगणकांना प्रशिक्षित करतील,अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Share बातमी छापा