महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राज्यातील दुष्काळासाठी केंद्राने १२ हजार ५२२ कोटी वितरीत करावेत- पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर मंगळवार, ११ जून, २०१९
 

 

 

मराठवाडा वाटर ग्रीडसाठी विशेष सहाय देण्याचे आवाहन
       
नवी दिल्ली, दि. 11 : राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत (एनआरडीडब्ल्‍युपी) मंजूर केलेले 12 हजार 522 कोटी रूपये त्वरीत वितरीत करण्याची मागणी आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली. ‘मराठवाडा वाटर ग्रीडसाठी’ 10 हजार 500 कोटींचे  विशेष सहाय देण्याचे आवाहनही त्यांनी  केले.
 
विज्ञानभवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली  देशातील सर्व  राज्यांच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. लोणीकर यांनी ही मागणी केली. केंद्रीय जलसंसाधन सचिव यु.पी.सिंह आणि पेयजल पुरवठा सचिव परमेस्वरन अय्यर यावेळी मंचावर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल या बैठकीस उपस्थित होते.
 
यावेळी श्री. लोणीकर म्हणाले,  मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्राला दुष्काळाची झळ पोहोचत असून यावर्षी राज्यातील 50 टक्के भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. हे पाहता दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनाने एनआरडीडब्ल्‍युपीमधून मंजूर केलेले 12 हजार 522 कोटी रूपये त्वरीत वितरीत करावे.  एनआरडीडब्ल्‍युपी हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून राज्यात 2009-10 पासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील वाड्या / वस्त्यांची स्थिती सुधारण्यात येते. वर्ष 2019 -20 साठी या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात 10005 पेयजल योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असून यावर येणारा अंदाजित खर्च 12 हजार 522  कोटी आहे. हा निधी राज्याला त्वरीत उपलब्ध झाल्यास पेयजल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करता येईल व राज्याला दुष्काळी परिस्थितीवरही मात करता येईल, असा विश्वास श्री. लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला.
 
मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी’ 10 हजार 500 चे सहाय द्यावे
 
दुष्काळाच्या सर्वाधिक झळा सोसणाऱ्या मराठवाडा विभागात दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने  वॉटर ग्रीड तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून विभागातील 11 मोठ्या व मध्यम धरणांना जोडण्यात येणार असून या भागाचा दुष्काळाचा कायमचा प्रश्न संपेल असा विश्वासही श्री. लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला. वॉटर ग्रीडच्या कार्यक्रमांतर्गत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांतील 79 शहर आणि सर्व गावांचा समावेश करण्यात आला आहे.  केंद्र शासनाने या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मदत करावी  आणि 10 हजार कोटी 500 रूपयांची अर्थसहाय करावे, अशी मागणीही  त्यांनी यावेळी केली.
 
जलशुद्धीकरणासाठी 150 कोटी द्यावेत
 
राज्यातील 82 टक्के जमीन ही बेसाल्ट खडकयुक्त  तर 10 टक्के जमीन ग्रॅनाईटयुक्त आहे. तसेच 916 वस्त्यांमध्ये खारे पाण्याची समस्या आहे ही परिस्थिती पाहता राज्यात जलशुध्दीकरण प्रक्रियेसाठी 150 कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही श्री. लोणीकर यांनी यावेळी केली. 

Share बातमी छापा