महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकसभा निवडणूक २०१९ : खर्च निरीक्षकांनी घेतला आढावा बुधवार, ०३ एप्रिल, २०१९


ठाणे :
जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यात होत असलेल्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांमार्फत होणाऱ्या खर्चाचे निरीक्षण व खर्च नोंदणी प्रक्रियेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,२३ - भिवंडी लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक शंकर गुप्ता, २४ कल्याणचे निरीक्षक विवेकानंद आणि २५ ठाणेचे निरीक्षक डॉ. नलीनकुमार श्रीवास्तव, उपजिल्हाधिकारी निवडणूक अपर्णा सोमाणी आदी उपस्थित होते. तसेच यावेळी जिल्हा निवडणूक यंत्रणेतील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष व उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी व होत असलेला खर्च नोंदवून घेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा सज्ज आहेत. त्यासाठी निरीक्षण पथके, व्हीडिओ पथके कार्यरत असून ते विविध कार्यक्रमांवर लक्ष ठेवून असतात. निवडणूक काळात होणारे सार्वजनिक उत्सव आदींवरही आयोगाचे लक्ष आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज आहेत. जिल्ह्यात मद्यविक्रीबाबतही काटेकोर नियंत्रण ठेवण्यात येत असून प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याबाबत सी व्हिजील सारख्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचीही दखल घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

ठाणे चे निरीक्षक डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले की, खर्चाचे निरीक्षण आणि होत असलेल्या खर्चाची नोंद घेणे या गोष्टीला प्राधान्य देण्यात यावे, त्यादृष्टीने सर्व सज्जता असावी, असे निर्देश त्यांनी दिले.
Share बातमी छापा