महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी यांनी प्रात्यक्षिकाद्वारे घेतली इव्हीएम, व्व्हीव्हीपॅट मशिनची माहिती रविवार, १४ एप्रिल, २०१९


रायगड :
रायगड लोकसभा मतदारसंघात नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षणाचे दुसरे सत्र सर्व विधानसभा मतदारसंघात पार पडले. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी प्रात्यक्षिकाद्वारे इव्हीएम, व्व्हीव्हीपॅट मशीन्सची कार्यपद्धती प्रत्यक्ष समजावून घेतली व आपल्या शंकांचे निरसन केले. येथील पीएनपी नाट्यगृहात झालेल्या येथे झालेल्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करताना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी यांनी पुरेशा गांभीर्याने परंतु ताण विरहीत काम करा असे सांगितले. उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले.

निवडणूक कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे काम सकारात्मकतेने आणि समन्वयाने करावे. केंद्राध्यक्ष हा केंद्राचा प्रमुख असतो. त्याच्या मार्गदर्शनाखाली केंद्रावरील सर्वांनी निवडणुकीचे काम करणे गरजेचे आहे असे जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी म्हणाले. निवडणूक आयोगाने प्रत्येक टप्प्यावर कशा पद्धतीने काम करावयाचे आणि कुठल्या अडचणी आल्या तर कोणती कृती करायची हे व्यवस्थित दिले आहे. मतदानाअगोदर अभिरूप मतदान कसे करायचे त्याविषयीही मार्गदर्शन केले आहे. भारत इलेक्ट्रोनिकचे तंत्रज्ञ पथक जिल्ह्यात दाखल झाले असून व्हिव्हिपॅट मशीन आणि त्याची कार्यपध्दती इव्हीएम मशीन व त्या अनुषंगाने सर्व तांत्रिक मदत मिळत आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

कर्मचारी आणि अधिकारी यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर मतदानाचे प्रमाण वाढीसाठी मतदार संघात घेतले जाणारे प्रयत्न सफल होतील आणि प्रमाण वाढेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दुसऱ्या टप्प्यात अंतर्गत काल अलिबाग, पेण, महाड, दापोली, श्रीवर्धन, गुहागर येथे पार पडले. या प्रशिक्षणात पहिल्या प्रशिक्षणात झालेल्या कामांची उजळणी करण्यात आली त्यासोबतच मतदान केंद्रावर घ्यायची खबरदारी आणि आयोगाच्या विविध सूचना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. टेंडर वोट चॅलेंज वोट तसेच मतदान केंद्रात दिव्यांगांसाठी करावयाच्या विशिष्ट सुविधा उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून घ्यायची खबरदारी या सर्व बाबतीत या प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना अवगत करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मायक्रो ऑब्झर्वर अर्थात सूक्ष्म निरीक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्यांचे प्रशिक्षण सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी होणार आहे हे निरीक्षक देखील या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतील.
Share बातमी छापा