महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकराज्य मतदार जागृती सायकल रॅलीच्या निमित्ताने लोकराज्य निवडणूक विशेषांकाचे विमोचन बुधवार, १० एप्रिल, २०१९

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
 

उस्मानाबाद : मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेतील संबंधित विस्तृत माहिती असलेला लोकराज्यचा  राष्ट्रीय महोत्सव मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज” हा लोकसभा निवडणूक विशेषांक उमेदवारांसह सर्वांसाठीच मार्गदर्शक व उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आज येथे केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या लोकराज्यच्या लोकसभा निवडणूक या विशेषांकाचे विमोचन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक, सहायक जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, आंतरराष्ट्रीय सायकलपटू अभय वाघोलीकर, आंतरराष्ट्रीय खो-खोपटू सारिका काळे, तहसिलदार व स्वीपचे नोडल अधिकारी अभय मस्के, रवी मोहिते यांच्या उपस्थितीत झाले.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात आज मतदार जागृती अभियानाकरिता जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत लोकराज्य मतदार जागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी शासनाचे मुखपत्र असलेले  लोकराज्य विशेषांकाचे विमोचन मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. या रॅलीला “लोकराज्य मतदार जागृती सायकल रॅली” म्हणून संबोधण्यात आले.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील मतदान प्रक्रिया संदर्भातील विविधांगी माहिती लोकराज्यच्या या विशेषांकाच्या माध्यमातून जनतेसाठी एकत्र उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियासंबंधी विविध गोष्टींची विस्तृत माहिती या अंकात देण्यात आली आहे.

मतदार नोंदणी केलेली कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगातर्फे विशेष प्रयत्न केले जात असून यासाठी स्वीप मोहीम जिल्ह्यात व राज्यात यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. या सोबतच दिव्यांगांनाही आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

Share बातमी छापा